चाचण्या आणि बेडची क्षमता वाढविण्याची केंद्रीय पथकाची सूचना

वसई (वार्ताहर) : कोरोना रुग्णांच्या मोठ्या प्रमाणात वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर एकंदर पालघर जिल्हा आणि वसई-विरारच्या कोविड उपचार परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्र सरकारच्या गृह विभागातर्फे सचिव दर्जाच्या अधिकाऱ्यांचे एक पथक वसईत येऊन गेले. पालघर जिल्हा आणि वसई-विरार मधील कोविड उपचार करणारे दवाखाने, तसेच क्वारंटाईन सेंटर आणि उपचार पद्धतीचा आठवा घेऊन, कोविडच्या चाचण्या आणि रुग्णांसाठी बेडची क्षमता वाढविण्याची सूचना केंद्रीय पथकाने जिल्हा प्रशासन, महापालिका आणि शासनाच्या आरोग्य विभागास केली आहे.

वसई-विरार महापालिका मुख्यालयात केंद्र सरकारच्या गृह विभागाच्या अधिकाऱ्यांच्या या पथकाने एकंदर कोरोना रुग्णांच्या सोयी-सुविधा आणि अन्य पूरक प्रश्नांवर चर्चा करून माहिती घेतली. पालघरचे जिल्हाधिकारी कैलास शिंदे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.कांचन वानेरे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.दयानंद सूर्यवंशी, पालिका आयुक्त गंगाथरण डी., अतिरिक्त आयुक्त रमेश मनाळे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजयकांत सागर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.बाळासाहेब जाधव, महापालिका वैद्यकीय अधिकारी डॉ.तबस्सुम काझी आदी अधिकारी वर्ग उपस्थित होता.
पालघर जिल्हा आणि वसई तालुक्यातील शहरी, तसेच ग्रामीण क्षेत्रातील वाढत्या रुग्ण संख्येवर चिंता व्यक्त करून, या पथकाने उपाययोजनेबाबत मार्गदर्शक सूचना केल्या. जिल्हा आणि महापालिका स्थरावर कोविडच्या चाचण्या आणि रुग्णांसाठी बेडची क्षमता वाढविण्याची सूचना केंद्रीय पथकाने महापालिका आणि शासनाच्या आरोग्य विभागास केली. या पथकाने वसईतील जी जी कॉलेज मधील कोविड उपचार केंद्रास भेट देऊन पहाणी केली. या केंद्रात सुमारे ५०० बेडची, तर लवकरच कार्यान्वयीत होणार असलेल्या वरुण इंडस्ट्रीज मधील कोविड उपचार केंद्रात १५०० बेडची व्यवस्था करण्यात येत असल्याचे महापालिका आरोग्य विभागातर्फे यावेळी सांगण्यात आले. वसई विरार मधून दर दिवशी सुमारे 100 स्वाब घेतले जातात. मात्र नेमून दिलेल्या जे.जे. हॉस्पिटलच्या चाचणी लॅबवर असलेल्या भारामुळे तेथून दरदिवशी केवळ 50 ते 60 अहवाल प्राप्त होतात. त्याच बरोबर एन. आय. व्ही.,  हाफकीन आणि मेट्रोपोलीस या लॅबचीही मदत घेण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!