चोवीस वर्षानंतर…! – योगेश वसंत त्रिवेदी

२८ नोव्हेंबर २०१९ रोजी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव बाळ ठाकरे यांनी शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस सह मित्रपक्षांच्या महाविकास आघाडी चे नेते म्हणून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या कडून पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. बरोबर २४ वर्षे आठ महिन्यांपूर्वी १४ मार्च १९९५ रोजी डॉ. मनोहर गजानन जोशी यांनी शिवतीर्थावर शिवशाही सरकार चे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. मुंबई च्या अरबी समुद्राला लाजवेल असा प्रचंड जनसागर तेंव्हा उसळला होता. शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष यांच्या युतीचे ते सरकार अस्तित्वात आले होते आणि भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ पांडुरंग मुंडे यांनी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते डॉ. मनोहर जोशी यांच्या सह उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती.

१९९५ च्या निवडणुकीत मतदान आणि  मतमोजणी यात एक महिन्याचे अंतर होते. शरदचंद्र गोविंदराव पवार हे त्यावेळी मुख्यमंत्री होते आणि राजकारणातील शह-काटशहाचे डाव टाकीत त्यांनी विलासराव देशमुख यांना लातूर मतदारसंघात शिवाजीराव कव्हेकर यांच्या कडून पराभूत करविले होते. विलासराव देशमुख आणि सुधाकरराव नाईक यांनी त्यावेळी पवार विरोधकांना गोपीनाथ मुंडे यांच्या मार्फत मातोश्रीवर बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीशी उभे केले होते. त्यामुळे शिवसेना भारतीय जनता पक्ष आणि पंचेचाळीस अपक्ष यांच्या शिवशाही सरकारचा शिवतीर्थावर शपथविधी मोठया जल्लोषात पार पडला होता. अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, बाळासाहेब ठाकरे, किसन बाबूराव उर्फ अण्णा हजारे, गोविंद राघो खैरनार आणि असंख्य मान्यवर या देवदुर्लभ सोहोळयाचे साक्षीदार होते. हिंदुत्वाची भगवी पताका फडकत होती. राजकारण पुढे पुढे झेपावत होते आणि प्रेम, युध्द आणि राजकारणात सारे काही क्षम्य आहे/काहीही होऊ शकते, या न्यायाने पंचवीस तीस वर्षाच्या हिंदुत्ववादी युतीला तीलांजली दिली गेली. परस्परविरोधी विचारांचे राजकारणी/ राजकीय पक्ष एकत्र आले. लोकनायक जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस विरोधी विचारसरणी ची मंडळी एकत्र येऊन भारतीय जनसंघ, समाजवादी, भारतीय लोकदल, संघटना काँग्रेस हे चार पक्ष जनता पक्षाच्या झेंडयाखाली एक झाले. इंदिरा गांधी यांची एकछत्री राजवट उलथवून टाकली. ‘जनता आयी हैं, सिंहासन खाली करो !’ असा इशारा देण्यात आला आणि संपूर्ण क्रांती अब नारा हैं, भावी इतिहास हमारा हैं, असे म्हणत मोरारजी देसाई यांच्या नेतृत्वाखाली जनता पक्षाचे सरकार केंद्रात सत्तेवर आले. पण दुहेरी निष्ठेच्या खडकावर जनता पार्टीची बोट फुटली.

६ एप्रिल १९८० रोजी अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, राजमाता विजयाराजे शिंदे/सिंधिया आदी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारधारा मानणाऱ्या नेत्यांनी भारतीय जनता पक्षाची स्थापना मुंबईत केली. भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना युती १९८९ च्या सुमारास झाली आणि हा युतीचा संसार २५ सप्टेंबर २०१४ पर्यंत चालला. नरेंद्र मोदी यांच्या लाटेत बरेच काही घडले. एकनाथराव खडसे यांनी २५ सप्टेंबर रोजी युती तोडण्याची घोषणा केल्यानंतर अर्ध्या तासात काँग्रेस बरोबरची आघाडी राष्ट्रवादी काँग्रेसने तोडली. चारही पक्ष वेगवेगळे लढले आणि २८८ च्या विधानसभेत भारतीय जनता पक्षाचे १२३ आमदार निवडून आले. पण केवळ तडजोड म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या बरोबर हातमिळवणी केली. पाच वर्षे सरकार चालले. पुन्हा १८ फेब्रुवारी २०१९ रोजी युती/महायुती च्या आणाभाका घेण्यात आल्या. २१ ऑॅक्टोबर २०१९ ला मतदान आणि २४ ऑॅक्टोबर २०१९ ला मतमोजणी झाली. महायुती ला.जनादेश मिळाला परंतु सत्तेच्या समान वाटपावरुन देवेंद्र फडणवीस आणि उध्दव ठाकरे यांच्यात बिनसले. कोण खरे कोण खोटे यावर काथ्याकूट झाला अखेर भारतीय जनता पक्षाच्या विरोधात असलेल्या सर्वांची मोट उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली बांधण्यात आली महाविकास आघाडी स्थापन करण्यात शरदचंद्रजी पवार यशस्वी ठरले आणि २४ वर्षानंतर शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. २४ वर्षापूर्वी पवार विरोधक शिवतीर्थावर एकवटले होते तर २८ नोव्हेंबर २०१९ रोजी उध्दव ठाकरे, शरद पवार आणि सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाच्या विरोधात असलेले राजकीय पक्ष एकवटले. शिवसेनेचे एक वर्तुळ पूर्ण झाले. नवीन सरकार ला मन:पूर्वक शुभेच्छा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: