जागतिक जल दिनानिमित्त आमची वसई चा संदेश

आपल्या जिवनात पाण्याच्या प्रत्येक थेंबाचे महत्व समजण्यासाठी प्रत्येकाने गिर्यारोहण व शिवकार्यात सहभागी होणे आवश्यक ! – आमची वसई

वसई : जनसामान्यांना आपल्या परिसरातील ऐतिहासिक वास्तूंची माहिती व्हावी व त्या वास्तूंच्या संवर्धनासाठी विविध सामाजिक कार्यात अग्रेसर असणारी “आमची वसई” सामाजिक संस्था अनेक मोहिमा राबवत असते. रविवारी आमची वसई तर्फे वज्रेश्वरी जवळील दुर्गम अश्या मंदाग्नी गडावर तिसरी संवर्धन मोहीम राबवण्यात आली. मोहिमेत आबाल वृद्धांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. मोहिमे अंतर्गत गडावरील बुजलेल्या पाण्याच्या अनेक टाक्या शोधून त्यातील गाळ काढण्याचे काम सुरू आहे.

मंदाग्नी गड संवर्धन मोहिमेत अनेक आबालवृद्ध सहभागी झाले. सहभागींना ट्रेकिंगची सवय असली  तरी त्यातील अनेकजण पहिल्यांदाच संवर्धन कार्यात भाग घेत होते. त्यामुळे गड चढून त्यावरील पाण्याच्या टाकीत साठलेला गाळ(दगड-माती) कुदळ, टिकाव, पहार व फावड्याच्या मदतीने काढून नियोजित ठिकाणी नेउन टाकणे इत्यादी मेहनतीची कामे केल्यामुळे नेहमीप्रमाणे प्रत्येकाने आणलेले २-३ लिटर पिण्याचे पाणी कधी संपले कळलेच नाही. मग गड उतरताना बाटल्यांमधे उरलेल्या १-२ घोट पाण्याची किम्मत सोन्यापेक्षाही मौल्यवान वाटू लागली. “जल ही जीवन है” याचा प्रत्यय सगळ्यांना त्याक्षणी आला. पाण्याचे अनन्यसाधारण महत्व आपल्याकडे पाणी नसतानाच समजते. तेव्हा सर्वांनी काटकसरीने पाणी वापरणे ही काळाची गरज आहे . तसेच  पाण्याचे महत्व समजण्यासाठी-जलसंवर्धनासाठी प्रत्येकाने गिर्यारोहण व शिवकार्यात सहभागी होणे आवश्यक आहे.

आपण साफ केलेल्या पाण्याच्या टाकीत येत्या पावसाळ्यात पाणी साठेल व अनेक गिर्यारोहकांना त्याचा लाभ घेता येइल हा विचारच सगळ्यांना आनंदाचा गारवा देत होता. गड उतरून खाली ओढ्यात पाणी पिउन आंघोळ केल्यावर सगळा क्षीण निघाला व पाण्याचे आपल्या जिवनात असलेले अनन्यसाधारण महत्त्व आणखी जाणवले. आमची वसईचे देवेंद्र कांबरे व जयकांत शिक्रे यांच्या नेतृत्वाखाली गडकोट मोहीम राबविण्यात येत आहे. ज्यांना अश्या शिवकार्यात सहभागी व्हायचे असेल त्यांनी आमची वसई शी ९३२३३९५५९८ या क्रमांकावर संपर्क साधावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!