जागतिक संग्रहालय दिन

आज आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिवस आहे. त्या निमित्ताने संग्रहालये,त्यांची वैशिष्टये आणि संग्रहालय दिन आदींबद्दलची ही माहिती… आपल्या सर्वसामान्य ज्ञानाचा परीघ वाढविण्यासाठी म्युझियम किंवा वस्तुसंग्रहालये, विज्ञान केंद्रे मदत करतात. समाजात घडत असणारे नित्य नवे बदल आणि पूर्व इतिहास या संग्रहालयातील वस्तूंमधून ज्ञात होतात. जागतिक संग्रहालय दिनाच्या निमित्ताने संबंधित विषयाच्या माहितीत भर घालणाऱ्या देशातील महत्त्वाच्या काही वस्तुसंग्रहालयांची ओळख करून देण्यासाठी हा लेखप्रपंच…

आज १८ मे, आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिवस. प्रत्येक देशाला आणि त्यातील प्रत्येक प्रांताला आपला असा एक स्वतंत्र ऐतिहासिक वारसा आहे, प्राचीन संस्कृती आहे. या प्राचीन संस्कृतीची ओळख आणि आपल्या सांस्कृतिक वारशाच्या अस्तित्वाची जाणीव नागरिकांना व्हावी, इतिहास, संस्कृती, रूढी-परंपरा ज्ञात व्हाव्यात आणि इतिहासकालीन वस्तूंचा ठेवा जतन व्हावा या उद्देशाने संग्रहालये उभारली जाऊ लागली. जगभरात असलेल्या या विविध प्रकारच्या संग्रहालयांची संकल्पना,संग्रहित केलेल्या ठेव्याची माहिती, इतिहासातील घडामोडींची माहिती मिळावी या उद्देशाने आंतरराष्ट्रीय संग्रहालय परिषदेने (इंटरनॅशनल कौन्सिल ऑॅफ म्युझियम) १८ मे १९७७ पासून दर वर्षी १८ मे हा जागतिक संग्रहालय दिन म्हणून साजरा करण्यास आरंभ केला.

जगात ज्ञात असे पहिले संग्रहालय ख्रिस्तपूर्व तिसऱ्या शतकात इजिप्तमध्ये अलेक्झांड्रीया विद्यापीठात स्थापन झाले. खरे पाहता सुरुवातीच्या काळात संग्रहालयांचे महत्त्व हे केवळ धार्मिक आणि ऐतिहासिक स्तरावरच जास्त होते. मात्र आज आधुनिक जीवनशैलीचे जीवन जगताना इतिहासाशी आपली नाळ कायम राहण्याच्या दृष्टीने ही संग्रहालये आपल्याला मदत करतात.

ऐतिहासिक वस्तूंचा ठेवा जतन करण्याचे, त्याचा संग्रह करण्याचे आलय (घर) म्हणजे संग्रहालय.. आणि याच संकल्पनेच्या आधारावर आज जगभरात विविध प्रकारची संग्रहालये पाहायला मिळतात. आपापल्या प्रांताचा सांस्कृतिक ठेवा जतन करणे हे संग्रहालय उभारण्यामागचे विशेष उद्दिष्ट असते. पुरातन चलनातील नाणी, भांडी, शिल्पे, हत्यारे, पुरातन वाडे, किल्ले, पुरातन चित्रे आदी वास्तू आणि वस्तू यांचे जतन करण्यास सुरुवात झाली. बदलत्या काळानुसार या संग्रहालयातील वस्तू जतन करण्याच्या संकल्पनेतही बदल होत गेले. कालांतराने बऱ्याच ठिकाणी वॅक्स म्युझियमची निर्मिती केली गेली. विविध क्षेत्रातील कतर्ृत्ववान व्यक्तिमत्त्वांचे मेणाचे पुतळे बनवून त्यांचा संग्रह या वॅक्स म्युझियममध्ये करण्यात येऊ लागला. या पार्श्वभूमीवर लंडनमध्ये जगातील पहिले वॅक्स म्युझियम मादाम तुसाँ यांच्या नावाने सुरू करण्यात आले. या संग्रहालयात आंतराराष्ट्रीय स्तरावर लोकप्रिय असलेल्या व्यक्तींचे पुतळे साकारण्यात आले आहेत. जगभरातील अनेक संग्रहालयांचा पर्यटनस्थळांमध्ये समावेश करण्यात आला आहे.

कलात्मक, ऐतिहासिक, वैज्ञानिक, औद्योगिक अशा विविध विषयांशी संबंधित वस्तूंचे शास्त्रशुध्द, शिस्तबध्द आणि नियमानुसार संग्रह व संवर्धन करणारी संस्था, असेही खरे तर संग्रहालयांचे वर्णन करता येईल. कोणत्याही प्रकारचा फायदा मिळविण्याची अपेक्षा न करता जमवलेल्या वस्तूंची योग्य प्रकारे मांडणी करणे, आकर्षक पध्दतीने त्यांचे प्रदर्शन करणे, त्यांची नियमितपणे काळजी घेणे, त्यांचे जतन व संरक्षण करणे,अशी कामे या संस्था करतात. सर्वसामान्य लोकांना, विद्यार्थ्यांना, अभ्यासकांना, संशोधकांना संग्रहालयातील वस्तूंच्या अवलोकनातून मार्गदर्शन व्हावे; त्यांच्यात राष्ट्रीय अस्मितेची भावना जागृत व्हावी यासाठी प्रयत्न व्हावेत, अशी बहुविध उद्दिष्टे लक्षात घेऊन संग्रहालयांची स्थापना करण्यात आली.

एका विशिष्ट काळातील किंवा देशातील किंवा समाजाचा एखादा ठराविक घटक डोळयासमोर ठेवून त्याच्याशी निगडित पुरातन ऐतिहासिक वस्तूंचे,  माहितीचे जतन करून, जनसामान्यांपर्यंत ती संग्रहालयांमार्फत पोहोचवणे हे संग्रहालयांचे मुख्य लक्ष्य असते. संग्रहालये ही मुख्यत्वे राष्ट्रीय वारसा जतन करणारी असतात. म्हणून आक्रमणकर्त्यांनी नेहमी संग्रहालयांना नष्ट करण्याचे प्रयत्न प्रथम केले. आपल्या देशातील मौल्यवान वस्तूंचा ठेवा सुरक्षित ठेवणे, आपल्या काळातील सांस्कृतिक आदर्श, पुढच्या पिढीपर्यंत पोहोचविणे, हे प्रत्येक पिढीचे कर्तव्य आहे, ही जाणीव जिवंत ठेवण्याचे काम संग्रहालये करत आहेत. आपल्या पूर्वजांची कृतिशीलता, सौंदर्यदृष्टी, पराकम यांची जाणीवही करून देण्याचे काम संग्रहालये करताना दिसतात.

आपल्या प्रांताचा सांस्कृतिक वारसा सांभाळणे हे संग्रहालयांचे एक महत्त्वाचे व प्रमुख उद्दिष्ट आहे. देशाची घटना व कायदे लक्षात घेऊन सर्वप्रथम वारसा स्पष्ट करणाऱ्या वस्तूंची यादी निश्चित करणे अनिवार्य ठरते. या यादीतील वस्तूंच्या निर्देशनाने देशाची, राज्याची ठळक वैशिष्टये कोणती ते निश्चित होते. देशादेशांतील संस्कृतींमधील वेगळेपण लक्षात येते. देशातील समाजाची तत्त्वज्ञानावरील निष्ठा आणि धारणा यांतून निर्माण झालेली श्रध्दास्थाने, जीवन जगण्याच्या पध्दती, वस्त्रप्रावरणे,राहण्याची घरे व त्यांची व्यवस्था, जेवणखाण्याच्या पध्दती, विवाहविधी, बालसंगोपन, स्त्रीसंरक्षण, धर्मविषयक कल्पना, धार्मिक संस्थांच्या प्रतिमा, साधने, साहित्य, कला, मनोरंजनाची साधने, प्रवासाच्या पध्दती,महान पुरुष व त्यांचे आचारविचार, पूजाअर्चा अशा अनेकविध गोष्टींतून समाजाची ओळख होत असते व इतर समाजगटांपासूनचे त्याचे वेगळेपण स्पष्ट होते.

आधुनिक संग्रहालयांमध्ये वस्तूंची विविधता विस्तारलेली आहे. प्रदर्शित करावयाच्या वस्तूंचे सौंदर्य, सांस्कृतिक, ऐतिहासिक महत्त्व प्रेक्षकांच्या लक्षात झटपट आणून देणे, ही वाढती गरज निर्माण झाली आहे. याच दृष्टिकोनाला आंतरशास्त्रीय दृष्टिकोन असेही म्हटले गेले आहे. या सर्व उद्दिष्टांच्या विविधतेमधून ‘ संग्रहालयातील वस्तूंचे प्रदर्शन’ हेच एक शास्त्र निर्माण झाले आहे.

काही काळापूर्वी म्हणजेच साधारणत: सतराव्या शतकापूर्वी जगातील संग्रहालये कलात्मक वस्तूंचा संग्रह करत असत. संग्रहालयांचे महत्त्व लक्षात आल्यावर नंतरच्या तीनशे वर्षांच्या कालखंडात विविध प्रकारची संग्रहालये स्थापन करण्यात आली.(१) कला संग्रहालये, (२) इतिहासविषयक संग्रहालये आणि (३) विज्ञान व तंत्रविद्या संग्रहालये.

असे संग्रहालयांचे प्रामुख्याने तीन प्रकार आहेत. याशिवाय इतर काही सर्वसामान्य संग्रहालये असून, त्यामध्ये अनेक विषयांची सामग्री प्रदर्शनार्थ मांडली जाते. कला संग्रहालये चित्रे, शिल्पे आणि अन्य कलावस्तू यांचे संवर्धन, संरक्षण व प्रदर्शन करतात; तर इतिहास विषयक संग्रहालये भूतकाळातील जीवन आणि घटना यांसंबंधीचे पुरावे, प्राचीन हत्यारे, वस्तू, पुरातत्त्वीय अवशेष इत्यादींचे संवर्धन-प्रदर्शन करतात. विज्ञान व तंत्र विद्या विषयक संग्रहालयांतून निसर्ग विज्ञान व तंत्र विद्येशी संबंधित सामग्री प्रदर्शित केलेली असते. अशा संग्रहालयांचा उल्लेख म्युझियम्स ऑॅफ नॅचरल हिस्ट्री असाही केला जातो. त्यांत प्राणी,वनस्पती, जीवाश्म, खडकांचे नमुने आणि निसर्गाशी संबंधित अन्य सामग्री असते. याशिवाय काही एकाच विषयाला वाहिलेली किंवा फक्त मुलांसाठी अशी संग्रहालये आहेत. त्यांत इंग्लंड मधील नॅशनल रेल्वे म्युझियम, स्कॉटलंड मधील म्युझियम ऑॅफ चाइल्डहूड, एडिंबरोमधील कलेक्शन ऑॅफ ओल्ड टॉइज वगैरे प्रसिद्ध आहेत. अशा विविध प्रकारांमुळे संग्रहालये आता पूरक शिक्षण केंद्रे बनली असून, त्यांच्यामुळे राष्ट्रीय आणि सांस्कृतिक वारसा स्पष्ट करणे, हे उद्दिष्ट साध्य झाले. काही भव्य संग्रहालये बहु-उद्देशीय स्वरूपाची असतात.

कलावस्तू संग्रहालये : प्राचीन काळापासून सुंदर, मौल्यवान, घाटदार आणि प्रमाणबद्ध आकर्षक वस्तूंचा, चित्रांचा संगह करण्याची मानवी प्रवृत्ती दिसून येते. संग्रहालयांची सुरुवात या प्रकारच्या संग्रहातूनच झाली. एकोणिसाव्या शतकानंतर अशा संग्रहांना काही संकेत जोडले गेले व त्यामुळे त्यांची दर्जात्मक आणि संख्यात्मक वाढ होऊ लागली. जगातील अस्तित्वात असलेल्या संग्रहालयांतील ८० टक्के संस्था या प्रकारात मोडतात. या वस्तूंच्या शास्त्रीय मांडणीतून समाजाची जीवनदृष्टी, सौंदर्याची ओढ, सांस्कृतिक पातळी यांचा बोध होतो. अशा समाजाचे सांस्कृतिक वेगळेपण पटकन लक्षात येते व त्यांची ओळख स्पष्ट होते. संग्रहातील वस्तूंची मांडणी चोखंदळपणे केली, तर त्यांचे उद्दिष्ट स्पष्ट होते.

१८७० साली अमेरिकेतबोस्टन म्युझियम ऑॅफ फाइन आर्टस्आणि मेट्रोपॉलिटन म्युझियम ऑॅफ आर्ट (न्यूयॉर्क) ही भव्य कलावस्तू संग्रहालये निर्माण झाली.फिलाडेल्फिया म्युझियम ऑॅफ आर्ट (१८७१) वब्रुकलिन म्युझियम (१८९३) ही अशीच भव्य संग्रहालये नंतरच्या काळात स्थापन झाली.

ऐतिहासिक संग्रहालये : संग्रहालयांच्या प्रगतीत महत्त्वाचा टप्पा ऐतिहासिक संग्रहालये स्थापन झाल्यामुळे गाठला गेला. कलावस्तू जमविणे ही माणसाची सहज प्रवृत्ती असते; पण ऐतिहासिक संग्रहालये निश्चित धोरण ठरवून निर्माण झाली. ऐतिहासिक वस्तू जमवून त्या प्रदर्शित करणे, हे केवळ एकच उद्दिष्ट येथे नव्हते. या वस्तूंच्या प्रदर्शनातून इतिहास जिवंत स्वरूपात प्रेक्षकांना दाखवणे अशी अपेक्षा आहे. महाराष्ट्रात श्री छत्रपती शिवाजी महाराजांची तलवार ही भावनात्मक वस्तू आहे. ती इतर तलवारींपेक्षा वेगळी असणारच; पण या तलवारीच्या निमित्ताने इतिहासातील राष्ट्रधर्माची जाणीव लोकांना अनुभवता आली,तर या तलवारीच्या प्रदर्शनाचा हेतू साध्य झाला असे वाटेल.

अमेरिकेत १७७६ साली पहिले ऐतिहासिक संग्रहालय स्थापन झाले. फिलाडेल्फिया या शहरात यूगेर द्यू सिमितीएर (१७३९-९४) या इंग्रज व्यक्तीने ते स्थापन केले. या संग्रहालयाला कालौघात अनेक चढउतार अनुभवावे लागले व त्याचाच एक इतिहास तयार झाला.

विज्ञान आणि औद्योगिक संग्रहालये : अठराव्या शतकापासून विज्ञानाची प्रगती झपाटयाने होत गेली. युरोपीय देशांतून अनेक विद्यापीठे आणि प्रयोगशाळा यांमधून विज्ञान या ज्ञानशाखेचा अभ्यास वाढला. विज्ञानाचे शोध नंतर औद्योगिक क्षेत्रात वापरले गेले व कारखानदारी वाढत गेली. यातून जीवनोपयोगी नवीन वस्तूंची निर्मिती वाढली व लोकजीवन समृद्ध होत गेले. विज्ञानाच्या प्रगतीचा वेग वाढावा, कारखानदारीमुळे आलेली संपन्नता आणखी वाढावी, यांसाठी विज्ञान आणि औद्योगिक संग्रहालये स्थापन होऊ लागली. त्या काळी कलात्मक वस्तूंची व ऐतिहासिक संग्रहालये होतीच. त्यांत या नवीन प्रकारच्या संग्रहालयांची भर पडली. इटलीतील फाएन्झा या शहरात सिरॅमिक टाइल्सचे (फरश्यांचे) एक भव्य संग्रहालय उभारले. हे पहिलेच आगळेवेगळे संग्रहालय ‘कंपनी संग्रहालय’ या नावाने ओळखले जाऊ लागले. अमेरिकेत न्यूयॉर्क राज्यात कॉर्निग या गावी ‘कॉर्निगवेअर’ हे काचसामानाचे संग्रहालय निर्माण झाले. जगात आता लोह, पोलाद,कोरीव वस्तू , फर्निचर, शस्त्रास्त्रे, विमान, रेल्वे, टपाल तिकिटे अशी वस्तुगणिक संग्रहालये निर्माण झाली आहेत.

वेगळी संग्रहालये : लोककला, संदेशवहन, जलवाहतुकीचा इतिहास वगैरे विषयांवरील आणि संग्रहाच्या ऐतिहासिक वा भौगोलिक स्रोतांनुसार वेगळी असणारी खास संग्रहालयेही असतात. वस्तू प्रेक्षकांपर्यंत नेऊन त्यांना संग्रहालयांमध्ये रुची उत्पन्न करणे व सहभागी करून घेणे यांकरिता संग्रहालये फिरती प्रदर्शने आयोजित करतात. उदा. विश्वेश्वरय्या इंडस्ट्रियल ऍंड टेक्नॉलॉजिकल म्युझियम (बेंगळुरू) आणि म्युझियम ऑॅफ सायन्स ऍंड इंडस्ट्री (कोलकाता) ही संग्रहालये काही वस्तू व सामग्री वाहनांवरून दूरवरच्या खेडयांपर्यंत नेतात आणि तेथे प्रतिकृती दाखवून व लोकांना प्रयोगात सहभागी करून घेऊन लोकशिक्षण करतात. रशियात नदीमार्गे जहाजांवरील फिरती प्रदर्शने दूरवर नेली जातात. उघडया संग्रहालयांमध्ये सर्व गामीण इमारती अथवा ऐतिहासिक किंवा धार्मिक स्मारके व जवळचा परिसरही येतो. काही संग्रहालये आपले कार्यक्रम शाळांपर्यंत नेतात.

यंदाच्या संग्रहालय दिनाची संकल्पना : संग्रहालये आणि स्पर्धात्मक इतिहास (म्युझियम ऍंड काँटेस्टेड हिस्ट्रीज : सेइंग द अनस्पीकेबल इन म्युझियम्स) अशी यंदाच्या म्हणजेच जागतिक संग्रहालय दिनाची संकल्पना आहे. ही संकल्पना विशेषत: अशा संग्रहालयांसाठी आहे, जी सामाजिक भावनेतून कार्य करत आहेत. सामाजिक संतुलन राखण्यात,देशात शांतता, सुव्यवस्था राखण्यात आपला वाटा उचलणाऱ्या संग्रहालयांच्या अनुषंगाने ही संकल्पना ठरवण्यात आली आहे. याशिवाय आपल्या इतिहासात अशा प्रकारच्या सामाजिक जाणिवेला वाहिलेल्या घटना आणि वस्तूंवर आधारित असलेली संग्रहालये यंदाच्या या दिनाचे विशेष आकर्षण असणार आहेत.

संग्रहालये आणि स्पर्धात्मक इतिहास (म्युझियम ऍंड कॉन्टेस्टेड हिस्टरिज : सेईंग द अनस्पीकेबल इन म्युझियम्स) अशी यंदाच्या म्हणजेच’जागतिक संग्रहालय दिन २०१७’ (इंटरनॅशनल म्युझियम डे २०१७) ची थीम आहे…. या अनुषंगाने देशातील महत्त्वाच्या १० लोकप्रिय संग्रहालयांचा हा धावता आढावा…

१. राष्ट्रीय संग्रहालय, दिल्ली

भारताच्या केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयांतर्गत कार्यरत, दिल्लीच्या १० जनपथ मार्गावर असलेले राष्ट्रीय संग्रहालय दिल्ली (नॅशनल म्युझियम न्यू् दिल्ली) हे देशातील सर्वोत्कृष्ट संग्रहालयांपैकी एक आहे. १९४८ मध्ये दिल्लीत स्थापित झालेल्या या संग्रहालयात अनेकविध वस्तूंचे प्रदर्शन पाहायला मिळते. ऐतिहासिक काळापासून आजच्या आधुनिक काळापर्यंत सर्व बाबींशी संलग्नित असलेल्या वस्तूंचे हे एक भव्य संग्रहालय समजले जाते. आजघडीला या संग्रहालयात भारतीय आणि विदेशी अशा एकत्रित जवळपास दोन लाख वस्तू संग्रहित आहेत.

२. सालारजंग संग्रहालय, हैद्राबाद

सालारजंग संग्रहालय हे भारताच्या हैदराबाद शहरातील एक प्रसिध्द कलासंग्रहालय आहे. अनेक निजामकालीन ऐतिहासिक व दुर्मिळ वस्तू या प्रदर्शनात पाहायला मिळतात. सालारजंग हे भारतातील तिसरे मोठे संग्रहालय असून केवळ एका व्यक्तीने जमवलेल्या वस्तूंपासून तयार झालेले हे जगातील सर्वात मोठे संग्रहालय आहे. सालारजंग संग्रहालयात अंदाजे ४३ हजार वस्तू व ५० हजार पुस्तके आहेत.

हैद्राबादच्या सातव्या निजामाचे पंतप्रधान नवाब मीर युसुफ अली खान सालारजंग (तिसरे) ह्यांनी ३६ वर्षे मेहनत घेऊन या दुर्मीळ वस्तू जमवल्या आहेत. त्यासाठी त्यांनी आपल्या मिळकतीतील मोठा हिस्सा खर्च केला आहे.

३. व्हिक्टोरिया स्मारक, कोलकाता

व्हिक्टोरियास्मारक (व्हिक्टोरिया मेमोरिअल) हे भारतातील कोलकाता शहरातील एक स्मारक आहे. १९०६ ते १९२१ दरम्यान उभारण्यात आलेले हे स्मारक राणी व्हिक्टोरियाला समर्पित आहे. भारतातील प्राचीन शिल्पकलेचे उत्तम मिश्रण याठिकाणी पाहायला मिळते. या स्मारकामध्ये एक संग्रहालय आहे, जिथे राणी व्हिक्टोरियाच्या स्टडी डेस्क, पियानो यांसह इतर तीन हजारांहून अधिक वस्तू प्रदर्शनात आहेत.

४. बौध्द गया संग्रहालय, पाटणा

बौध्द गया हे संग्रहालय बिहारची राजधानी पाटणा येथे स्थित आहे. १९१७ मध्ये इंग्रजांच्या शासनकाळात या संग्रहालयाची निर्मिती करण्यात आली. पाटणा आणि परिसरातील ऐतिहासिक वस्तूंच्या संग्रहाच्या उद्देशाने हे निर्माण केले गेले. येथील स्थानिक लोक यास ‘जादू घर’ नावाने संबोधतात. मुघल आणि राजपूत यांच्या शैलीत निर्माण झालेल्या या संग्रहालयाला बिहारच्या बौध्दिक समृध्दीचे प्रतिक मानले जाते. केंद्रस्थानी आकर्षक छत्री, चारही कोपऱ्यात झरोख्यांच्या खिडक्या अशी काही या संग्रहालयाची खास वैशिष्टये आहेत.

५. नेहरू स्मारक संग्रहालय व ग्रंथालय, नवी दिल्ली

नेहरू स्मारक संग्रहालय व ग्रंथालय हे नवी दिल्ली परिसरात असलेले एक संग्रहालय आणि ग्रंथालय आहे. भारतीय स्वंतंत्रता संग्रामाच्या आठवणींना उजाळा देण्याच्या आणि त्या सदैव जागृत ठेवण्याच्या उद्देशाने या संग्रहालयाची निर्मिती करण्यात आली आहे. येथील तीन मूर्ती भवन प्रांगणात हे संग्रहालय आहे. १९६४ मध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या निधनानंतर त्यांच्या स्मरणार्थ हे संग्रहालय उभारले गेले. भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयांतर्गत असलेली ही एक स्वायत्त संस्था आहे. संग््रहलायाबरोबरच याठिकाणी आधुनिक भारताशी संबंधित विषयांवरील पुस्तकांचे ग्रंथालय आहे. शिवाय अध्ययन केंद्र आणि नेहरू तारामंडल ही आहे.

६. भारतीय रेल्वे संग्रहालय, नवी दिल्ली

दिल्ली येथील चाणक्यपुरीत भारतीय रेल्वे संग्रहालयात रेल्वेचा तब्बल १४० वर्षांचा इतिहास मांडण्यात आला आहे. विविध इंजिन आणि रेल्वेच्या डब्यांसह देशातील पहिल्या रेल्वेचे मॉडेल या संग्रहालयात पाहायला मिळते. ब्रिटीश वास्तुकार एम. जी. सेटो यांनी इ.स. १९५७ मध्ये या संग्रहालयाचे बांधकाम केले. १० एकरात हे संग्रहालय आहे.

७. सारनाथ संग्रहालय, वाराणसी

वाराणसीच्या जवळ असलेल्या सारनाथ याठिकाणी सारनाथ संग्रहालय स्थित आहे. भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणाचे अतिप्राचीन असे हे संग्रहालय आहे. या संग्रहालयात ६ हजार ८३२ मूर्ती आणि कलाकृती आहेत.

८. राष्ट्रीय आधुनिक कला संग्रहालय, नवी दिल्ली

नवी दिल्लीमध्ये इंडिया गेटजवळ असलेले राष्ट्रीय आधुनिक कला संग्रहालय हे एक अद्भुत संग्रहालय आहे. १९४९ मध्ये कोलकाता येथे झालेल्या कला संमेलनात असे एखादे संग्रहालय असावे यावर विचार करण्यात आला. त्यानुसार २८ मार्च १९५४ मध्ये जयपूर हाऊसमध्ये याची स्थापना करण्यात आली. या संग्रहालयात १६ हजारांहून अधिक कलाकृती समाविष्ट आहेत. मागील १५० वर्षांमधील सांस्कृतिक आणि समकालीन ललितकलेचे हे एक खूप मोठे भांडार समजले जाते.

दिल्ली व्यतिरिक्त मुंबई आणि बेंगलोर याठिकाणी या संग्रहालयाच्या शाखा आहेत. १८५७ पासून सुरू करण्यात आलेल्या या संग्रहालयातील दृश्य आणि शिल्प कलांमध्ये वेळोवेळी बदल करून ते लोकांपर्यंत पोहोचवण्याचे कार्य या संग्रहालयामार्फत केले जाते.

९. भारतीय संग्रहालय, कोलकाता

कोलकाता येथील भारतीय संग्रहालय हे देशातील एक भव्य आणि जुने असे संग्रहालय आहे. पुरातन वस्तू, चिलखत, दागिने, जीवाश्म,कवच, ममीज आणि मुघल चित्रकारांची चित्रे यांचा संग्रह असलेले हे एक प्राचीन आणि वैशिष्टयपूर्ण संग्रहालय आहे. नथानिएल वॉलिच या डॅनिश वनस्पतिशास्त्रज्ञाने याची निर्मिती केली. त्यानंतर १८१४ मध्ये बंगालच्या एशीयॅटिक सोसायटीने याची स्थापना केली.

१०. लक्ष्मीविलास महाल, बडोदा

लक्ष्मीविलास महाल हा गुजरात राज्यातील बडोदा येथे आहे. महाराज सयाजीराव गायकवाड यांच्या हुकमावरुन इ. स. १८९० साली ही वास्तू बांधण्यात आली. मेजर चार्ल्स मॉन्ट या इंजिनिअरच्या संकल्पनेतून ही मनमोहक वास्तु साकारली आहे. एकुण ७०० एकरच्या विस्तीर्ण परिसरात हा महाल असून महालाच्या आत धातूंच्या अनेक मनमोहक मूर्ती आहेत.

–  कवितासागर अलायन्स ऑफ म्युझियम, जयसिंगपूर. 9975873569, 8484986964, sunildadapatil@gmail.com

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!