जाणिवेचा प्रवास जाणणारा प्रवासी दुर्गमित्र !

पालघर जिल्ह्यातील गडकोट अभ्यास, संवर्धन, उपक्रम आणि माझा अभ्यासक मित्र श्रीदत्त राऊत यांचे एक वेगळे नाते आहे. सध्या सर्वत्र कोरोना आजारामुळे वाढणारे संकट ही एक महत्वाची बाब आहेच, यातच वृत्तपत्रे उपलब्ध होत नसल्याने टिव्ही प्रसार माध्यमातून सर्व काही कळत आहे. जिल्ह्यातील काही वृत्तपत्रे इंटरनेट माध्यमातून, व्हाट्सउप माध्यमातून भेटीस येत असतात.

कालच जंजिरे अर्नाळा २८३ व्या स्मरण दिनानिमित्त काही तरी वेगळे वाचता आले. अर्थातच श्रीदत्त राऊतचे रोजच येणार संशोधनपर, संवर्धन जागृती, मोडी लिपी वर्ग इत्यादी लेखांची आम्ही सर्वच जेष्ठ नागरिक रोज आठवण काढत आहोत. आज सकाळी माझ्या जेष्ठ नागरिक संघातील मित्रानं आवर्जून फोन करून सांगितले की, आज आपल्या श्रीदत्तचा लेख आहे वृत्तपत्रात. व्हाट्सउप माध्यमातून मला सदर उपक्रम जंजिरे अर्नाळा बाबत असल्याची कळली. सर्वप्रथम तर वृत्तपत्रांचे आभार !! जंजिरे अर्नाळा स्मरण दिनास यावर्षी जाणे अशक्य अथवा उपक्रमात खंड पडू नये म्हणून मोडी लिपीच्या माध्यमातून गडास अर्पण केलेली ही मानवंदना मला फार आनंद देऊ गेली. एखादी व्यक्ती अबोलपणे आपली गड संवर्धन जागृती व जबाबदारी कोणत्याही प्रतिकूल परिस्थितीत कशी पूर्ण करू शकते याचे उत्तम उदाहरण म्हणजे श्रीदत्त. आजची प्रतिकूल समाज मानसिकता, भावना असताना आपल्या गडकोटांच्या महत्वाच्या दिनांचे व सणांचे आत्मभान राखणाऱ्या या तरुणाचे मला सदैव कौतुक वाटत आलेले आहे. मोडी लिपी संवर्धनासाठी त्याने गेली १३ वर्षे केलेले जिद्दीने प्रयत्न सर्व माध्यमातून कळत आहेत व त्यातील कष्ट आम्ही लिहून व्यक्त करणे हेही अपूर्णच ठरेल. आ

मानवंदनेत रेखाटलेले चित्र व त्याभोवती १०० हुन अधिक आरमारी परिभाषा, नावे, गलबते, शिलालेख इत्यादी मजकूर नक्कीच कौतुकास्पद आहे. यातील आरमारी परिभाषा हा शब्दही माझ्या सारख्या व्यक्तीस नवीन आहे. खात्रीपूर्वक हा जाणिवेचा व आत्मसमर्पित जीवनाचा भाग आहे. गेल्या कित्येक वर्षांतील सातत्याने सुरू असणाऱ्या समर्पित जीवनाच्या विचारचक्राचा हा भाग आहे. आज गडावर प्रत्यक्षात जाता आले नाही याची खंत नक्कीच आहे श्रीच्या मनात, पण त्याच्या चित्ररूपी गलबतात स्वार होऊन व मोडी मजकूर लिपी भावनेत सर्व काही सामावलेले आहे असे मला वाटते. उत्तर कोकण मोडी लिपी मंडळाच्या साधनेस त्रिवार नमन. तुझ्या गडकोटांच्या साधनेबाबत आम्ही जेष्ठ सदैव तुला आशीर्वाद देत राहूच, पण गडदेवता वास्तुदेवता तुला कधीच अंतर पडू देणार नाही याची खात्री देतो. लवकरच देशावरील व जगावरील कोरोनाचे संकट मुक्त होवो व आपल्या सर्वांना गडकोटांची भ्रमंती, अभ्यास, संवर्धन, जागृती करण्यास चांगले आरोग्य प्राप्त होवो हीच सदिच्छा व्यक्त करून थांबतो.

यशवंत कैलास बुरुडकर : नारळीबाग वसई पश्चिम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!