जिज्ञासूंसाठी डॉ.श्रीदत्त नंदकुमार राऊत ; मुक्त संवादरुपी मुलाखत

१. किल्ले वसई मोहीम परिवाराच्या आजवरच्या प्रवासाबद्दल काय सांगाल ? आपण सविस्तर ओळख दिलीत तर सदर ओळख सर्वांना मार्गदर्शक ठरेल !! 

महाराष्ट्र प्रांतातील दुर्गसंवर्धन विषयावर सातत्याने कार्यरत असलेली सर्वांत जुनी व अनुभवी संघटना परिवार म्हणून किल्ले वसई मोहीम परिवाराची ओळख आहे. उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातील गडकोटांच्या अस्तित्वासाठी व संवर्धनासाठी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत सातत्याने श्रमदान करणाऱ्या किल्ले वसई मोहीम परिवाराने संपूर्ण महाराष्ट्रात दुर्गसंवर्धनाच्या प्रामाणिक जिद्दीचा एक आदर्श निर्माण करून दिलेला आहे. कोणतीही राजकीय मदत न घेता व कोणतीही आर्थिक मदत न घेता सुरू असलेली गडकोट संवर्धन मोहीम उत्तर कोकणातील गडकोटांना जीवदान ठरलेली आहे. यात सामील झालेले तरुण व प्रत्येक वयोगटातील व्यक्ती किल्ले संवर्धनासाठी सातत्याने तत्पर असल्याची वेळोवेळी प्रचिती आलेली आहे. ज्ञात व अज्ञात असणाऱ्या गडकोटांची ऐतिहासिक शोधयात्रा व त्यांची संवर्धनाची गरज या बाबत जागृत असणाऱ्या किल्ले वसई मोहीम परिवाराने नुकताच दुर्गसंवर्धनाची यशस्वी १८ वर्षे पूर्ण केली. या परिवाराने दुर्गसंवर्धन व इतिहास संकलन हे एकमेव प्रामाणिक उद्दिष्ट आहे. सन २००३ ते २०२० सालापासून अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत प्रामाणिकपणे, सातत्याने, श्रमदानाने किल्ले वसई मोहीम परिवार सर्व पातळीवर जंजिरे वसई किल्ल्यातील परिस्थिती बदलण्यासाठी मोहिमा राबवत आहे. या मोहिमांची संख्या काही हजाराहुन अधिक निश्चितपणे आहे. गेल्या काही वर्षांत किल्ले वसई मोहिमेने २००० हुन अधिक वृत्तपत्र लेखमाला, १०० हून अधिक लेखी निवेदने, १००० हुन अधिक इतिहास सफरी, माहिती अधिकार पाठपुरावा इत्यादी उपक्रम करीत वसई किल्ल्यातील प्रतिकूल परिस्थिती बदलण्यासाठी अथक प्रयत्न केलेले आहेत. यात दारूबंदी साठी सातत्याने पाठपुरावा, महाराष्ट्रातील दुर्गांवर प्रत्यक्ष श्रमदान मोहिमा, प्रेमीयुगलांचा धिंगाणा बंदोबस्त, जंजिरे वसई व जंजिरे अर्नाळा भुयारी मार्गाविषयी पसरलेले गैर समज निर्मूलन, ठाणे परिसरातील गडकोटांवर संशोधन, भुयारी मार्गाविषयी धोकादायक स्थिती आव्हान जागृती, किल्ल्याची सातत्याने इतिहास सफर, दुर्गमित्रांसोबत गेली १८ वर्ष प्रत्यक्ष श्रमदान मोहिमा, प्लास्टिक व दारूबंदीसाठी चित्रकला मोहिमा, मोडी लिपीचे १४ वर्ष अभ्यास वर्ग, ब्राम्ही लिपी प्रशिक्षण वर्ग, श्री वज्रेश्वरी व श्री हनुमान पालखी उत्सव, दुर्ग अभ्यास व्याख्यानमाला, जंजिरे अर्नाळा दारूबंदीसाठी प्रयत्न, दिपपूजन व मशाल महोत्सव, विजयदिना निमित्ताने मशाल मानवंदना सप्ताह, गडकोटांवरील अश्लील छायाचित्रणावर बंदीसाठी सातत्याने प्रयत्न, हजारो शालेय कॉलेज विद्यार्थ्यांना वसई किल्ला प्रोजेक्टसाठी मार्गदर्शन, छायाचित्रे व शस्त्र प्रदर्शन, गडकोटांवरील शिलालेख संवर्धन, पहिला राष्ट्रध्वज मानवंदना मोहीम, गडकोटांवर दुर्गमित्रांना संवर्धनाचे आव्हान करणारे फलक, इतिहास संकलन पुस्तक प्रकाशने, दारूबंदीसाठी वाळूच्या प्रतिकृती द्वारे आव्हान, शिलालेख जतनीकरण अभियान, उत्तर कोकण गडकोट अभ्यास व दुर्गसंवर्धन मोहीम, तांदुळवाडी गडावरील जागृती बाबत सातत्याने लेखमाला, केळवे भुईकोट संवर्धनासाठी अथक श्रमदान, गडकोटांवर सुरू असणाऱ्या विनापरवाना चित्रीकरण व अश्लील छायाचित्रणाबाबत एल्गार, श्री वज्रेश्वरी कुंडे स्वच्छता मोहीम, किल्ल्याचे मूळ दरवाजे संवर्धन, किल्ल्याच्या सुरुवातीस चौकी उभारण्याबाबत निवेदने, मांडवी कोट मुर्त्या संवर्धन, जंजिरे वसई अर्नाळा सेवगागड अशेरीगड बल्लाळगड इ विजयदिन आयोजन, गडकोटांवर टाके सफाई मोहीम, गडकोट जागृती चित्रकला मोहीम, गडकोटांवर दसरा दीपावली गुढीपाडवा पूजन मोहीम, गडकोटांवर नियमित अभ्यासपूर्ण लेखमाला, उत्तर कोकण गडकोट श्रमदान मोहीम, नरवीर चिमाजी आप्पा पुण्यतिथी पूजन पुणे शनिवारवाडा व वसई चिमाजी अप्पा स्मारक, पुण्यस्थळांना अभिवादन मोहीम, खारबाव मांडवी वज्रगड हिराडोंगरी तुंगार केळवे कोट दांडा कोट भवानीगड केळवे कष्टम कोट केळवे जीवधन गड इ नामशेष होणाऱ्या गडकोटांसाठी जागृती व श्रमदान, पुणे गणेश उत्सवात गडकोटांवर दारूबंदीसाठी आव्हान फलक, किल्ल्यातील अनधिकृत बांधकामावर अंकुश, नरवीर चिमाजी आप्पा स्मारकात दर सोमवारी दीप पूजन मानवंदना उपक्रम, शिरगाव किल्ल्यातील बेताल संवर्धन व विनापरवाना छायाचित्रणाबाबत जागृती, वसईतील ऐतिहासिक स्थळांची नियमित अभ्यास सफर आयोजन, वसईतील ज्ञात अज्ञात दुर्गांचे पहिल्यांदा नोंदीकरण, बाजी बेलोसे समाधीस्थळ पूजन व मानवंदना, दुर्गसंवर्धन कार्यशाळा आयोजन व सहभाग, सेवगा सारख्या अपरिचित गडकोटाच्या अस्तित्वासाठी पुढाकार, तुंगार व हिराडोंगरी दुर्ग यांची शोधयात्रा, दुर्गसंवर्धन जागृती अभियान वर्ष उपक्रम, शालेय विद्यार्थी मित्रांसाठी गडकोट चित्रकला जागृती अभियान, उत्तर कोकण लिपी मंडळाची स्थापना, पालघर जिल्ह्यातील दुर्लक्षित ऐतिहासिक वास्तूंच्या संवर्धन व इतिहास मार्गदर्शन सफरी, पारोळ प्रांतातील गतवैभवाची साक्ष देणारे शिवमंदिर संवर्धन, इतिहास संशोधनपर व्याख्यानमाला सत्र इत्यादी शेकडो मोहीम माध्यमे अंतर्भूत होतात. याच उपक्रमाचे एक सोनेरी यश म्हणजे उत्तर कोकणातील गडकोटांची बदलती परिस्थिती !!

२. पालघर जिल्ह्यातील ऐतिहासिक अवशेष व त्यांच्या संवर्धनाची सध्या परिस्थिती काय सांगाल ? 

जिल्ह्यातील गडकोटांची, दुर्गांची, लहान मोठे कोट, न उमगलेले डोंगर, एकटे बुरुज, प्राचीन मंदिरे यांची संख्या पाहता सर्व अवशेषांचे संवर्धन नियोजन अत्यंत महत्वाचे ठरते. यात आजही सर्व अवशेषांचे नोंदणीकरण झालेले नाही ही बाब लक्षात घेतली पाहिजे. यातच स्थानिक, शासकीय, चिकित्सा इत्यादी सर्वच पातळीवर अबोल अनास्था, दुर्लक्ष यामुळे आजही निश्चित उद्दिष्ट समोर नाही. सर्वांत महत्वाचे जिल्ह्यातील ऐतिहासिक अवशेषांची जबाबदारी घेणारी ठाम अशी शासकीय व्यवस्था उपलब्ध नाही. आजही गडकोट व मंदिरे भुईसपाट होण्याच्या मार्गावर आहेत हे मात्र ठामपणे सांगता येते. 

३. दुर्गसंवर्धन मोहिमेत स्थानिक सहभागाबद्दल आजवरचा अनुभव काय सांगाल ?

ऐतिहासिक वास्तूंची आजवर न झालेल्या सविस्तर ओळख, वैयक्तिक जिज्ञासा, कलावैभवाची न झालेली जाणीव, गैरसमज व आख्यायिका इत्यादीमुळे स्थानिक सहभाग आजही नगण्य आहे हे स्पष्ट चित्र सर्वत्र आहे. केवळ जुनी मंदिरे व काही गडकोट यावर देवांची पूजा अर्चा किंवा दुर्गमित्रांची निव्वळ भटकंती यामुळे संवर्धनासाठी काहीतरी ठोस घडेल अशी शक्यता देखील कमी दिसते. तरीही सध्या सोशल मीडियावर ऐतिहासिक वास्तू बद्दल वाढती जागृती पाहता काही स्थानिक दुर्गमित्रांनी थोडीफार पावले उचलली आहेत, पण त्यास फक्त स्वच्छता करणे इतकी मर्यादा आहे. स्थानिक ऐतिहासिक वास्तू वारसा दत्तक योजना स्पष्ट झाल्यास स्थानिक सहभाग हळूहळू वाढेल. 

दुर्गसंवर्धन वाटचालीतील सकारात्मक बाब ? 

जिल्हे व देश याबाबत परिस्थिती पाहता ऐतिहासिक स्थळांची संख्या खूप मोठ्या प्रमाणावर आहे. तरीही दुर्गसंवर्धन विषयावर तरुणांचा वाढता सहभाग व निष्ठेने कार्य सातत्याने कार्य करणाऱ्या संस्था वाढीस लागलेल्या आहेत. यातच गडकोटांवर बंद पडलेले विजयदिन, गौरवशाली उत्सव, पुण्यतिथी इत्यादींचा वाढता प्रभाव पाहता किमान आता उर्वरित असलेले काही अवशेष वास्तू जतन होतील अशी आशा आहे. तरुणांनी फक्त गडकोटांची सेवा संवर्धन या उद्देशाने कार्यरत राहिले तर काही वाटा सोप्या होतील असे वाटे. दुर्गसंवर्धन हे ध्येय नसून ध्यास होणे आता गरजेचे ठरणार आहे. 

४. नव्या दुर्गसंवर्धन वाटचाली बद्दल काय सांगाल ? 

पुरातत्त्व दृष्टीने व जबाबदारीपूर्वक संवर्धन यामुळे नव्या दुर्गसंवर्धनाच्या दिशा सकारात्मक वाटत आहेत. तरुणांची दुर्गसंवर्धन विषयक वाढती चिकित्सा व उपलब्ध सोशल मीडियावर चर्चा यामुळे कोणतेही नवीन काम करता पूर्वी पेक्षा जास्त काळजी घेतली जात आहे. वास्तूंच्या जुन्या नव्या मधील बदल छायाचित्रे, टिपणे, लेख, वृत्तपत्र, व्हिडीओ, अहवाल, त्रेमासिके, पुस्तके इत्यादी माहितीमुळे आगामी कार्य सुखकर होईल यात शंका नाही. 

५. दुर्गसंवर्धनातील प्रतिकूल परिस्थितीबाबत काय सांगाल ? 

प्रत्यक्ष गडकोटांच्या संवर्धनासाठी श्रमदान करणारा वर्ग नगण्य असल्याने मनुष्यबळ कमतरता हा मुख्य विषय आहे. यातच संस्था माध्यमातून केवळ आर्थिक मदत जमा करून गडकोटांवर फक्त संवर्धनासाठी किती कार्य होते हेही स्पष्ट आहे. सध्या तरी फक्त रविवारी व सुट्टीच्या दिवशी होणाऱ्या संवर्धन मोहिमा पाहता वर्षेभरात एखाद्या किल्ल्यावर फार फार किती मोहिमा किंवा किती कार्य होणार या मर्यादा स्पष्ट आहेतच. 

६. आगामी वाटचाल व दिशा….

खरंतर याबाबत सविस्तर लिहिता येईल पण थोडक्यात सांगायचे म्हणजे गडकोटांचे संशोधन कार्य, जुनी नवी छायाचित्रे, उपलब्ध वास्तूंची मोजमापे, गौरवशाली गडकोट उत्सव परंपरा नियोजन, ऐतिहासिक वस्तू संकलन, जुन्या दस्तऐवजांचे संवर्धन, दुर्गसंवर्धन कार्यशाळा, गडकोट संवर्धन आंदोलने, इतिहास लेखन, अपरिचित स्थळे वास्तू नोंदणी, मोडी लिपी संवर्धन, ब्राम्ही लिपी कार्यशाळा अशा मोठ्या प्रमाणावरील संकल्प आता गेली १४ वर्षांत एका नियोजित स्थरावर प्रत्यक्षात हाताळून झालेले असल्याने त्याबद्दल व्यापक कार्य लवकरच इतरांना मार्गदर्शक ठरेल. मी स्वतः विविध संस्था व दुर्गमित्रांच्या समूहास प्रत्यक्ष सहभागातुन मार्गदर्शन करत आहे. 

७. दुर्गसंवर्धनाची सोपी व्याख्या

आपल्या गौरवशाली इतिहासाची जाणीव सातत्याने जपून व शक्य तितक्या माध्यमातून दुर्गसंवर्धन माध्यमातून केवळ गडकोट संवर्धनासाठी स्वतःचा जबाबदारीपूर्वक वैयक्तिक सहभाग हीच दुर्गसंवर्धनाची सोपी व्याख्या. 

८. महाराष्ट्र प्रांताची दुर्गसंपदा व त्याची जपणूक

प्रत्येक जिल्ह्यात केवळ एकच दुर्गसंवर्धन विषयक संपर्क विभाग असल्यास कार्यास बळकटी येईल असे सतत वाटते. सध्या प्रत्येक जिल्ह्यात ठाम दुर्गसंवर्धन विषयक व्यासपीठ नसल्याने निश्चित काहीही घडत नाही. महाराष्ट्र प्रांताचे दुर्गसंवर्धन आलेखन याविषयी मी स्वतः तयार केलेला आलेख लवकरच पुस्तक रूपाने व लेखमाला स्वरूपात प्रकाशित होईल. 

९. इतिहास संकलन श्रेत्रातील वाटचाल व काळाची गरज याबाबत माहिती

प्रत्येक नव्या जुन्या दुर्गसंवर्धन चळवळीस आवश्यक असणारी इतिहासाची बैठक हा अत्यंत महत्वाचा भाग आहे. ऐतिहासिक उल्लेख व गडकोटांवर उपलब्ध वास्तू यांचा योग्य विचार केल्यास काही नवीन परिमाणे पुढे येतील. उदाहरणार्थ नेमके किल्ले दुर्ग गडकोट कोणास म्हणावे याबाबत अनेक मतांतरे असली तरी त्यांची काही परिमाणे ठरवणे आवश्यक आहेत. मी स्वतः ऐतिहासिक संदर्भ हे मुख्य परिमाण पुढे ठेवून काही वर्गीकरणे केलेली आहेत. यात सध्या ४८६ किल्ल्यांची प्रत्यक्ष भटकंती व त्यातील ३०० गडकोटांची लेखमाला प्रकाशित करून प्राथमिक अहवाल प्रकाशित केला. यातील पुढील टप्प्यात यातील प्रत्येक गडकोटांची ऐतिहासिक टिपणे प्रकाशित होतील. काळाची वेगवान पावले लक्षात घेऊन सदर कार्य करण्यासाठी वैयक्तिक व संस्थेच्या माध्यमातून निस्सीम, निस्वार्थ सेवाभाव कार्यरत ठेवणे हेच महत्वाचे आहे.  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!