जिल्ह्यातील दुष्काळावर मनसे आक्रमक ; जिल्ह्यात भीषण दुष्काळ असताना प्रशासन काय करतंय..? – कुंदन संखे

पालघर (प्रतिनिधी) :  पालघर जिल्ह्यात दुष्काळाची स्पष्ट चिन्हे दिसू लागली असतांना देखील सरकार व जिल्हा प्रशासन नावाच्या विक्राळ व्यवस्थेने झोपेचे सोंग घेतल्यानं दुष्काळाचा राक्षस आज विळखा घालून बसलेला आहे. त्यामुळे मात्र सर्व सामान्य जनतेचे जीवन उद्ध्वस्त करणारी भयान परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप करीत आज  जिल्हाध्यक्ष कुंदन संखे यांच्या नेतृत्वात मनसेच्या शिष्टमंडळाने अप्पर जिल्हाधिकारी यांची घेतली भेट.

दुष्काळ प्रश्नी चर्चेसाठी मनसे शिष्टमंडळ येणार असल्याचे लेखी पत्र जिल्हाप्रशासनास दिले होते.
परंतू जिल्हाप्रशासना कडून आदर्श आचारसंहिता भीती दाखवून चर्चाच टाळता येईल असे प्रकारचे पत्रच पक्षास दिले होते. तरीही मनसेचे शिष्टमंडळ जिल्हाधिकारी कार्यालयात धडकले. लगेचच पोलीस प्रशासनाने आचारसंहितेचा दाखला देत
मनसे शिष्टमंडळास अटकाव करण्याचा प्रयत्न करताच कुंदन संखे यांनी पोलिसी कारवाईस तीव्र विरोध करीत, आम्ही दुष्काळग्रस्तासाठी आमची भूमिका मांडणारच वेळ प्रसंगी आपण अटक केले तरी चालेल अशी आक्रमक भूमिका घेतल्याने संघर्षमय परिस्थिती निर्माण झाली होती. दरम्यान जिल्हा प्रशासनाने विषयांचे व मसेचे गाम्भीर्य लक्षात घेता अप्पर जिल्हाधिकारी आणि संबंधित अधिकारी यांच्याशी चर्चेची तयारी दाखविली आणि संघर्षमय परिस्थितीवर पडदा पडला. परंतू, संपूर्ण जिल्ह्यात परिस्थिती दुष्काळ सदृश्य व मा. जिल्हाधिकारी व मा. मुख्य कार्यकारी अधिकारी अदृश्य असल्याने कुंदन  संखे यांच्या कडून तीव्र संताप आणि निषेध व्यक्त करण्यात आला.

यंदाचा दुष्काळ आपल्या घरापर्यंत आला आहे. पालघर जिल्ह्यातील ग्रामीण व डोंगरी भागात भीषण पाणीटंचाई असून, पाण्याचे साठे आटले आहेत. नदी, ओढे, तलाव, विहिरी यांतील पाणी कमी झाले आहे. पिण्याच्या पाण्याचा, चा-याचा प्रश्न गंभीर झाला आहे. त्यात उन्हाळयाची तीव्रता वाढत असतांना या रणरणत्या उन्हात आदिवासी महिलांना पाण्यासाठी दूर पायपीट करावी लागत आहे. तरीही, शासन व प्रशासन युद्ध पातळीवर प्रयत्न करतांना दिसत नाही. म्हणजेच दुष्काळ पाण्याचा आहे की नियोजनाचा असा थेट प्रश्नच  मनसे शिष्टमंडळाकडून अप्पर जिल्हाधिका-यांना विचारण्यात आला. तसेच “होऊन जाईल” असे  प्रशासनाचे धोरण चालणार नाही. तर दुष्काळात अंग मोडून, प्रामाणिकपणे काम करणे निकडीचे असल्याचे संखे यांनी यावेळी मत व्यक्त केले.
तसेच जिल्हा प्रशासनाकडून सर्व राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, NGO, समाज सेवक, पत्रकार बंधू आणि प्राशासकीय अधिकारी यांची संयुक्त सभा घेऊन दुष्काळी निवारण्यासाठी एक पाऊल उचलावे असे सांगून, दुष्काळ निवारण साठी मनसे कडून उपाय योजना सुचविण्यात आल्या. सदर सूचनेचे अप्पर जिल्हाधिकारी यांनी स्वागत करून, त्वरित अंमलबजावणी करण्याचे आश्वासन देण्यात आले. तसेच दुष्काळावर मात करणारी योजना अंमलात आणतांना दुष्काळ निवारण केंद्राची स्थापना करून, दुष्काळग्रस्तां साठी काय व कसे नियोजन असणार आहे याची गाव निहाय माहिती सर्वसामान्य जनतेसाठी उपलब्ध करावी अशी जाहीर मागणी मनसे कडून करण्यात आली. त्याचं प्रमाणे जलशिवार योजनेतील करोडोचा निधी कुठे मुरला याचीही सखोल चौकशी करावी अशी मागणी कुंदन संखे यांनी यावेळी केली.

दुष्काळाच्या सावटाखाली असलेल्या पालघर जिल्ह्यातील समस्या निवारण्यासाठी प्रशासकीय स्तरावर त्वरित कायमस्वरूपी प्रयत्न करावेत. अन्यथा, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आंदोलनाच्या भूमिकेत असेल असा गर्भित इशारा मनसे कडून देण्यात आला. यावेळी मनकासे जिल्हा चिटणीस अनंत दळवी, उपजिल्हाध्यक्ष भावेश चुरी समीर मोरे, तालुका अध्यक्ष कांती ठाकरे गोपाळ वझरे, तालुका सचिव दिनेश गवई, शहर अध्यक्ष सुनिल राऊत, निलेश भेलका, जयेश वेडगा, नयन पाटील, शिवा यादव, अविनाश भोरे, नीलिम संखे, तन्मय संखे, सौरभ संखे इत्यादी मनसे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!