जेंव्हा विनोद तावडे दिवंगत व्यक्तींच्या कुटुंबियांना दिलासा मिळवून देतात ! – योगेश वसंत त्रिवेदी

देणाऱ्याने देत जावे

घेणाऱ्याने घेत जावे

हिरव्या पिवळया माळावरुनी

सह्याद्रीच्या कडयावरुनी

छातीसाठी ढाल घ्यावी

 

वेडयापिशा ढगाकडून

वेडेपिसे आकार घ्यावे

रक्तामधल्या प्रश्नासाठी

पृथ्वीकडून होकार घ्यावे

उसळलेल्या दर्याकडून

पिसाळलेली आयाळ घ्यावी

भरलेल्या भिमेकडून

तुकोबाची माळ घ्यावी

कवीवर्य विंदा करंदीकर यांनी रचलेल्या या काव्यरचनेच्या ओळी मी नयन-रेखा या कन्यकांना नेहमी सांगत असतो. ‘तुम्ही कित्ती कित्ती म्हणून कराल आमच्यासाठी ?’ या त्यांच्या सवालांवर माझं नेहमीच म्हणणं असतं की ‘देणाऱ्याने देत जावे, देणाऱ्याने देत जावे । घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे ॥’ विंदांच्या या ओळी समाजात घडलेल्या घटनांमधून आपल्याला ठायी ठायी दिसून येतात. दान देणारा दाता हा खरोखरच महान असतो, मोठा असतो. दात्याने एका हाताने दिलेले दान दुसऱ्या हाताला माहित होऊ नये, असा एक संकेत आहे. काही जण याचं ‘मार्केटिंग’ करतात, काही जण गवगवा करतात तर काही जण प्रसिध्दी पासून अलिप्त राहतात. राजकारण आणि समाजकारण यात या गोष्टी सतत घडत असतात. महाराष्ट्राच्या राजकारणात या घडीला भारतीय जनता पक्ष हा वैश्विक स्तरावरचा मोठा राजकीय पक्ष म्हणून कार्यरत आहे. या पक्षाचे नेते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीतून तयार झालेले आहेत. २०१३ पासून महाराष्ट्रात देवेंद्र गंगाधरराव फडणवीस हे राजकारणाच्या क्षितिजावर चमकले. त्यांनी भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते गोपीनाथराव मुंडे यांच्या आकस्मिक देहावसानानंतर महाराष्ट्रात मुख्यमंत्री म्हणून आपली कारकीर्द चांगलीच गाजवली. तेही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीतून तयार झालेले आहेत. भारतीय जनता पक्षाचे असे अनेक नेते समाजकारणात कार्यरत आहेत. असेच एक मातब्बर नेते आहेत विनोद श्रीधर तावडे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीतून तयार झालेले जसे नेते आहेत तसेच ते अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या, युवकांच्या राजकारणातून, विद्यापीठाच्या निवडणुकीच्या राजकारणातून तरबेज झालेले राज/समाज कारणी नेते आहेत. महाराष्ट्र विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते म्हणून काम करतांना भारतीय जनता पक्षाच्या नितीन गडकरी या मातबर नेत्यांच्या समवेत अनेक चाली राजकीय सारीपाटावर खेळल्याचे राज्यातल्या जनतेने पाहिले आहे, अनुभवले आहे. २०१४ साली भारतीय जनता पक्षाच्या देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळात अव्वल दर्जाचे मंत्री पद भूषविण्याचा मान मिळालेल्या विनोद तावडे यांनी माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या १५ ऑॅक्टोबर या जन्मदिनी राज्यात वाचन प्रेरणा दिवस साजरा करण्यात यावा, ही संकल्पना शालेय शिक्षण, उच्च व तंत्रशिक्षण, सांस्कृतिक कार्य, मराठी भाषा अशा विविध खात्यांचा कारभार अत्यंत चाणाक्ष पध्दतीने चालवितांना तावडे यांनी अंमलात आणली. महाबळेश्वरजवळच्या भिलार या स्ट्रॉबेरी च्या गांवाला पुस्तकांच्या गांवात परिवर्तित करण्याची किमया विनोद तावडे यांनीच साधली. त्याचवेळी मी कल्पक डोक्याचे विनोद तावडे असे नमूद केले होते. महाराष्ट्र शासनाने राज्याच्या स्थापनेपासून लोकराज्य हे मराठी, हिंदी, इंग्रजी, गुजराती, ऊर्दू या भाषांमध्ये मुखपत्र प्रकाशित होत असतांनाही ‘सेवार्थ’ नांवाचे स्वत:चे (विभागाचे) मुखपत्र प्रकाशित करुन आपल्या खात्याच्या योजना, खात्याने घेतलेले निर्णय आदींची सचित्र माहिती मतदारांना, नागरिकांना, कार्यकर्त्यांना प्रमाणिकपणे देण्याचा प्रयत्न केला. विनोद तावडे यांनी सांस्कृतिक कार्य मंत्री म्हणून माझ्याच हस्ते लता मंगेशकर पुरस्कार देण्यात यावा किंवा अन्य महत्त्वाचे पुरस्कार माझ्या हस्तेच प्रदान करण्यात यावेत, असा हट्ट कधी धरला नाही किंबहुना साध्या साध्या व्यक्तींना त्यांनी पुढे आणत प्रोत्साहन दिले. आषाढी एकादशी निमित्त ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार प्रदान करण्यात यावेत, ही संकल्पना सुध्दा विनोद तावडे यांचीच, आषाढी-कार्तिकी ला वारकऱ्यांना पंढरपूर दर्शन घडविण्यासाठी विशेष

गाडीचे आयोजन सुध्दा त्यांचे. दसऱ्याला आपल्या कार्यकर्त्यांना प्रतीकात्मक गुढी पाठविण्याची प्रथाही त्यांनी सुरु केली. सर्व आठवण्याचे कारण म्हणजे, एक महत्त्वाची माहिती विनोद तावडे यांनी प्रसिध्दीपासून दूर ठेवली असल्याचे नुकतेच माझ्या निदर्शनास आले. समाजात ज्या चांगल्या गोष्टी घडतात त्या समाजासमोर आणण्यासाठी माझी सतत धडपड सुरू असते. या माहितीपासून तसा मी सुध्दा अनभिज्ञ होतो. पण प्रा.नयना रेगे यांनी एका घटनेकडे माझे लक्ष वेधले आणि मग मी आमचे मित्र, भारतीय जनता पक्षाचे आमच्या प्रभागाचे अध्यक्ष अनंत कलबुर्गी यांना याबद्दल विचारणा केली. मग मला सविस्तरपणे माहिती मिळाली. ही घटना, ही बाब खरोखरच अनुकरणीय आहे. बोरीवली पूर्व येथील शिरोडकर हे कुटुंब डिस्कव्हरी सोसायटी येथे वास्तव्यास आहे. या शिरोडकर परिवारातील वृध्द गृहस्थ श्री. रमाकांत शिरोडकर 2018 च्या ऑॅगस्ट महिन्यात वारले. ते परळच्या शिरोडकर हायस्कूलमध्ये विद्यार्थी होते ते त्याच शाळेतून शिक्षक म्हणून निवृत्त झाले. रमाकांत शिरोडकर हे वारल्यानंतर अचानक नोव्हेंबर २०१८  मध्ये राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांचे पत्र शिरोडकर यांच्या घरी विनोद तावडे यांच्या भारतीय जनता पक्ष कार्यालयातून पक्षाचा कार्यकर्ता दिवाळीच्या फराळाबरोबर विनोद तावडे यांचे.पत्र घेऊन आला. ‘प्रति, शिरोडकर कुटुंबिय, नमस्कार ! शुभ दीपावली ! दिवाळी म्हणजे कुटुंबिय, मित्रपरिवार, आप्तेष्ठांसोबत साजरा करण्याचा सण. मला कल्पना आहे की यावर्षी आपल्याकुटुंबातील प्रिय व्यक्तींच्या आठवणींसोबत ही दिवाळी आपल्याला साजरी करावी लागणार आहे. त्यांचा स्वभाव, आवडी-निवडी, असंख्य लहान मोठया गोष्टी अशांचे यावेळी स्मरण होईल. त्यांचा स्नेह, आशीर्वाद आणि आठवणींसोबत ही दिवाळी आपण साजरी करु या. आपणास आणि आपल्या कुटुंबियांना ही दिवाळी शांततापूर्ण जावी, याच

सदिच्छांसह ! आपला : विनोद तावडे (भ्रमणध्वनी क्रमांक) १ नोव्हेंबर २०१८ रोजीचे श्री. विनोद तावडे यांच्या स्वाक्षरीने आलेले हे पत्र असल्याची माहिती मिळाली. आता हे पत्र, यासंदर्भातील पार्श्वभूमी लक्षात घेता अशी माहिती मिळाली की श्री. विनोद तावडे यांनी आपली कार्यकर्ते मंडळी कामाला लावली. स्मशानभूमीतून मृत व्यक्तींची यादी, त्यांच्या कुटुंबियांचे पत्ते मिळवून त्यांच्या मृत व्यक्तीच्या कुटुंबाला सांत्वन पर पत्र पाठविणे, सणावाराला, विशेषत: दिवाळीच्या वेळी आवर्जून पत्र पाठवून आपण आपल्या शोकमग्न परिवारासोबतच आहोत, ही जाणीव करुन देत त्यांचे दु:ख हलके करणे, या आज फार दुर्मिळ झालेल्या बाबी विनोद तावडे हे बऱ्याच वर्षांपासून करीत आहेत. किंबहुना हे आताशा त्यांच्या अंगवळणीच पडले आहे. या केवळ आरंभशूर म्हणून न करता त्यात त्यांनी सातत्य ठेवले आहे. म्हणूनच एक जागरूक पत्रकार म्हणून मला या गोष्टीची आवर्जून दखल घ्यावीशी वाटली. केवळ इतकेच करुन विनोद तावडे थांबले नाहीत तर आपल्या शहर, मतदारसंघात बूथ पातळीवर कार्य करीत असलेल्या कार्यकर्त्यांनासुध्दा त्यांच्या दैनंदिन जीवनात, दैनंदिन व्यवहारात भेडसावणाऱ्या गोष्टींमध्ये आवर्जून लक्ष घालून त्यांना ही दिलासा देण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले आहेत आणि करीत आहेत. निवडणुकीत उमेदवारी मिळो अथवा ना मिळो आपल्या समाजकारणात कोणत्याही प्रकारचा खंड पडू न देता ते काम करीत आहेत आणि म्हणूनच उमेदवारी न मिळालेल्या आणि वैफल्यग्रस्त झालेल्या नेत्यांपेक्षा विनोद तावडे हे निश्चितच उजवे ठरतात. ‘परिणामांची भिती न आम्हा !’ या न्यायाने अविरत कार्य करणाऱ्या या बहाद्दर नेत्याला म्हणूनच उदंड आयुष्य आणि ठणठणीत आरोग्य प्राप्त होवो. त्यांच्या हातून त्यांनी स्वीकारलेले हे असिधारा व्रत अखंड सुरुच राहो, या मनापासून शुभेच्छा ! इंदिरा गांधी जनता लाटेत पिछाडीवर गेल्या परंतु नंतर फिनिक्स सारख्या पुनश्च ‘हरी ओम’ म्हणून पुढे झेपावल्या. या इतिहासाची पुनरावृत्ती होऊ शकते. उद्याच्या उष:काली आपल्या जबरदस्त समाजकारणाच्या जोरावर विनोद तावडे हे गरुडझेप घेतील हे नि:संशय ! विनोद तावडे यांच्या या कामामुळे मला विंदांची ही ‘देणाऱ्याने देत जावे’ या काव्यरचनेच्या ओळी आठवल्या. बरोबर नां ? विनोद तावडे यांचे अभिनंदन करावे तेवढे थोडेच आहे. मन:पूर्वक अभिनंदन !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!