जॉर्ज फर्नांडिस : ‘बाळ’ म्हणणारा बाळासाहेबांचा सच्चा ‘साथी’ ! – योगेश वसंत त्रिवेदी

जॉर्ज मँथ्यू फर्नांडिस यांचं आज सकाळी दीर्घकालीन आजारानं निधन झालं अशी बातमी आमचे मित्र उमेश काशीकर यांनी कळविली आणि झर्रकन सारा इतिहास डोळ्यासमोरुन जाऊ लागला. जॉर्ज माझा अत्यंत आवडता नेता. मुंबई आणि जॉर्ज तसेच मुंबई आणि बाळासाहेब ठाकरे हे एक समीकरणच होऊन गेलं होतं. मुंबई बंद ही बाळासाहेब ठाकरे यांनीच करावी हे जसं अलिकडच्या काळात निश्चित होतं तद्वतच जॉर्ज हा मुंबई एका आवाजात बंद करीत असे. जॉर्ज जसा समाजवादी तद्वतच बाळासाहेब हेही तसे समाजवादीच म्हणावे लागतील. प्रा. मधु दंडवते हे प्रजा समाजवादी तर जॉर्ज हे संयुक्त समाजवादी. नंतर हे दोन्ही पक्ष समाजवादी पक्ष म्हणून पुढे आले. प्रजा समाजवाद्यांची निशाणी झोपडी तर संयुक्त समाजवाद्यांची निशाणी झाड होती. मुंबईच्या फुटपाथवर एकेकाळी झोपणारा जॉर्ज हा मुंबई चा अनभिषिक्त सम्राट बनला.

१९७४ चा रेल्वे संप घडवितांना जॉर्ज ने खऱ्या अर्थाने चक्का जाम करुन दाखविला होता. १९६७ साली जॉर्ज ने त्या स. का. पाटलांचा पराभव केला होता की ज्या स. का. पाटलांनी मुंबई महाराष्ट्रात सहभागी करून घेण्यासाठी प्रखर विरोध केला होता. धनदांडग्या पाटलांचा पराभव तुम्ही करु शकता असे पोस्टर्स जॉर्ज ने अख्ख्या मुंबईत लावले होते. मुंबई महापालिकेचा कारभार मराठीत व्हावा म्हणून जॉर्ज ने आंदोलन केले होते. म्रुणाल गोरे, शोभनाथसिंह आदी नेते त्या आंदोलनात सहभागी झाले होते. राम मनोहर लोहिया आणि पी. डिमेलो यांचा प्रभाव असलेला जॉर्ज हा जयप्रकाश नारायण यांचा अनुयायी होता. जयप्रकाश नारायण यांच्या संपूर्ण क्रांती च्या आंदोलनात जॉर्ज अग्रेसर होता. मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांचे नेतृत्व करतांनाच जॉर्ज ने मुंबईतील टँक्सी रिक्षांची युनियनही चालविली. असंघटित क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना संघटित करण्यासाठी जॉर्ज फर्नांडिस यांनी अथक परिश्रम घेतले. जॉर्ज आणि तुरुंग यांचंही नातं घनिष्ट होतं. रेल्वे चा संप त्यांनी तिहार च्या तुरुंगात असतांना मागे घेतला. कॉम्रेड श्रीपाद अम्रुत डांगे उर्फ भाई डांगे यांच्या प्रमाणेच संप सुरु करतांनाच तो मागे केंव्हा घ्यावा, याची जॉर्ज फर्नांडिस यांना जाण होती. (नाही तर 1982 सालच मुंबई च्या गिरणी कामगारांचा संप कागदोपत्री अजूनही मागे घेतला गेलेला नाही.) आणिबाणीच्या काळात भूमिगत चळवळ राबवतांना पकडले गेल्यानंतर तुरुंगातून १९७७ साली त्यांनी लोकसभा निवडणूक लढविली आणि दणदणीत विजयी झाल्यानंतर ते फ्रंटियर मेलने मुंबईत आले, तेंव्हा त्यांच्या स्वागतासाठी आम्ही मुंबई सेंट्रल स्थानकावर गेलो. अभूतपूर्व उत्साहात त्यांचे स्वागत करण्यात आले होते. प्रा. मधु दंडवते हे मोरारजी देसाई यांच्या मंत्रीमंडळात रेल्वे मंत्री झाले तेंव्हा जॉर्ज उद्योग मंत्री झाले होते. कोंकण रेल्वे चे भूमिपूजन वसंतदादा पाटील मुख्यमंत्री असतांना प्रा. दंडवते व दादा या दोघांनी १९७८ साली आपटा येथे केले. पण जॉर्ज फर्नांडिस रेल्वेमंत्री झाल्यावर त्यांनी कोकण रेल्वे महामंडळ स्थापन करुन खऱ्या अर्थाने या रेल्वे ला स्थायी स्वरूप प्राप्त करुन दिले. शरद पवार हे मुख्यमंत्री असतांना वर्षा बंगल्यावर रेल्वे मंत्री जॉर्ज फर्नांडिस यांच्या उपस्थितीत चार राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक घेण्यात आली होती आणि कोणत्या राज्याचा आर्थिक हिस्सा किती ? हे त्या बैठकीत ठरले. मुंबईत तेंव्हा मोठा पाऊस पडला होता आणि योगायोगाने मी आमदार निवासात आदल्या दिवशी मुक्कामाला असल्याने वर्षा बंगल्यावर पोहोचणारा एकमेव पत्रकार मी ठरलो आणि ‘सामना’चे कार्यकारी संपादक अशोक पडबिद्री यांनी माझे कौतुक करतांनाच ही बातमी मुख्य मथळ्यात श्रेयनामासह (हेडलाईन/बयलाईन) ‘सामना’च्या पहिल्या पानावर छापली. जॉर्ज फर्नांडिस आणि बाळासाहेब ठाकरे हे जानी दोस्त होते आणि बाळासाहेब ठाकरे यांना ‘बाळ’ म्हणून हाक मारणारे ठराविक मित्र होते त्यात जॉर्ज चा नंबर वरचा होता. ज्येष्ठ पत्रकार मधु शेट्ये आणि दिनू रणदिवे हेही बाळासाहेब ठाकरे यांना ‘बाळ’ म्हणून हाक मारीत असत. बाळासाहेब ठाकरे, जॉर्ज फर्नांडिस आणि शरद पवार यांनी शिवतीर्थावर जाहीर सभाही गाजवली आहे. जॉर्ज फर्नांडिस हे राष्ट्रीय लोकशाही आघाडी चे समन्वयक असतांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी परप्रांतीयांना हुसकावून लावण्याची भाषा केली होती. तेंव्हा जॉर्ज ने एक पत्र पाठवून राज ठाकरे यांना जाबही विचारला होता. जॉर्ज फर्नांडिस हे हिंद मझदूर किसान पंचायत या संघटनेचे  प्रमुख होते. गिरगाव येथील प्रार्थना समाज येथे त्यांचे कार्यालय होते. शंकर साळवी, क्वाड्रोस, रणजित भानू, सुनिल चिटणीस, प्रभाकर देसाई आदी त्यांचे सहकारी होते. कामगार चळवळीचे ते एक केंद्र होते. प्रख्यात कामगार नेते शरद राव हे जॉर्ज फर्नांडिस यांचे शिष्य होते शरद राव यांनी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केल्यानंतर हिंद मझदूर सभा आणि हिंद मझदूर किसान पंचायत चे शरद पवारांच्या उपस्थितीत विलीनीकरण केले. 1991 साली नरसिंहराव यांनी खाऊजा म्हणजे खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरण स्वीकारल्यानंतर कामगार चळवळ ही तशी प्रभावी राहिली नाही. कामगार नेत्यांबद्दल विश्वासार्हता राहिली नाही.  आज जॉर्ज चे अनेक शिष्य इतस्ततः भटकत आहेत. ज्यांचे या क्षेत्रात काम नाही केवळ घराणेशाही च्या नावावर संघटना चलविल्या जात असून जुने नेते अशा प्रभावहीन नेत्याची (नाईलाजाने) चाकरी करतांना पहायला मिळतात. जॉर्ज फर्नांडिस आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या नंतर आता मुंबईतल्या कामगार चळवळीला कुणी वाली राहिला आहे असे मला तरी वाटत नाही. जॉर्ज फर्नाडिस हे आणिबाणी च्या काळात तुरुंगात असतांना त्यांची पत्रे छापून वसंतराव त्रिवेदी, मनोरमा त्रिवेदी, योगेश त्रिवेदी, गिरीश त्रिवेदी हे अंबरनाथ येथे 7/11 च्या ट्रेडल मशीनवर छापून भूमिगत चळवळ आम्ही राबवीत होतो. जॉर्ज चे शिष्य आणि ठाणे म्युनिसिपल कामगार संघटना चालविणारे कामगार नेते मधु जोशी हे आमच्या समवेत या भूमिगत चळवळीत कार्यरत होते. जॉर्ज च्या बडोदा डायनामाईट खटल्यात आमची ब्रीफकेस जप्त करण्यात आली होती. जयप्रकाश नारायण, जॉर्ज फर्नांडिस, म्रुणाल गोरे, बाळ दंडवते (मधू दंडवते यांचे भाऊ) यांची बुलेटिन्स आम्ही छापून पहाटे साडे चार वाजता लोकलने मुंबई कडे रवाना करीत असू. जॉर्ज फर्नांडिस, शरद यादव, नीतिशकुमार हे एकाच पक्षाचे नेते विभक्त झाले. समाजवादी पक्ष आणि रिपब्लिकन पक्ष यांच्या चिरफळ्या या नेत्यांना ‘याचि देहि याचि डोळा’ पहाव्या लागल्या. दादा कोंडके यांनी एका चित्रपटात ‘ये आये, तू काय बी काळजी करु नगंस, तुरुंगात गेलेले सगळे मोठ्ठे व्हतात असं सांगतांना जॉर्ज फर्नांडिस याचं नांव घेतलं होतं. तो संवादही चिरकाल टिकलाय. अरुण साधू यांच्या कादंबरीवर आधारित ‘सिंहासन’ चित्रपटात जॉर्ज फर्नांडिस यांची भूमिका प्रख्यात अभिनेते सतीष दुभाषी यांनी साकारली आहे. ‘कामगारांच्या मागच्या मान्य झाल्या नाहीत तर येणाऱ्या नव्या मुख्यमंत्र्याला मंत्रालयासमोर जोड्याने हाणीन’, हा संवाद जणू जॉर्जचीच आठवण करुन देत होता. समाजवादी आणि कामगार चळवळ यांचा इतिहास जॉर्ज फर्नांडिस शिवाय पूर्ण होऊच शकत नाही.  जॉर्ज च्या निधनाने एका झंझावाती, वादळी युगाचा असत झाला आहे. या लढाऊ नेत्याला मानाचा मुजरा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!