ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. विलास कुमठेकर यांना पद्म पुरस्कार देण्यात यावा !

ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. विलास

मुंबई (विशेष प्रतिनिधी ) : नांदेड येथील ज्येष्ठ आणि प्रथितयश शिक्षणतज्ज्ञ डॉ. विलास कुमठेकर यांना पद्म पुरस्कार देऊन त्यांना गौरविण्यात यावे, अशी लेखी आग्रही मागणी ज्येष्ठ राजकीय विश्लेषक योगेश वसंत त्रिवेदी यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कडे वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी भेट घेऊन केली.

डॉ. विलास कुमठेकर यांनी आपल्या वयाची ७४ वर्षे पूर्ण केली असून २०२१ मध्ये ते अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण करीत आहेत. डॉ.विलास कुमठेकर यांनी एक नव्हे तर चार चार पीएचडी केल्या आहेत, डॉक्टरेट मिळविल्या आहेत. त्यांनी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात इंग्रजी चे प्राध्यापक म्हणून सेवा बजावली आहे. त्यांना अत्यंत  दुर्धर असा रक्ताचा कर्करोग झाला होता. त्यावर त्यांनी मात केली. या दरम्यान त्यांना पायाची दुखापत होऊन अपंगत्व आले. तरीही जिद्द, मेहनत, प्रामाणिकपणा, प्रचंड आत्मविश्वास या जोरावर त्यांनी आपले शैक्षणिक, सामाजिक कार्य सुरु ठेवले. साहित्य शारदेच्या या प्रामाणिक सेवकाने सुमारे दीड ते दोन हजार लेख लिहिले असून जगाच्या पाठीवर कर्करोगाच्या जोखडातून सर्वच लोक मुक्त व्हावेत, अशी जबरदस्त इच्छा डॉ. विलास कुमठेकर यांनी बाळगली आहे. त्यांना ‘पद्म’ पुरस्कार देऊन त्यांच्या सेवेचा बहुमान करावा. त्यांच्या नावाची शिफारस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारकडे करावी, अशी मागणीही  योगेश वसंत त्रिवेदी यांनी मुख्यमंत्र्यांकडे लेखी स्वरुपात केली आहे. 

डॉ. विलास कुमठेकर यांनी भारताचे महामहिम राष्ट्रपती श्री. रामनाथ कोविंद यांना आपल्या सेवा कार्य आणि  परिचयाचे ११९ पानी पत्र काही दिवसापूर्वी पाठविले होते. या पत्राची पुस्तक रुपी प्रतही योगेश वसंत त्रिवेदी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सुपूर्द केली.  शिवसेनेचे खासदार हेमंत पाटील यांच्या सह अनेक मान्यवरांना डॉ. विलास कुमठेकर यांच्या अध्यापनाचा लाभ मिळाला आहे. त्यांच्या असंख्य चाहत्यांनी डॉ.विलास कुमठेकर यांना ‘पद्म’ पुरस्कार मिळावा, अशी इच्छा बाळगली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!