टंचाई परिस्थितीवर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासन दक्ष – जिल्हाधिकारी डॉ.प्रशांत नारनवरे

पालघर : राज्यात जाणवत असलेल्या पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर पालघर जिल्ह्यातील परिस्थितीबाबत जिल्हा प्रशासन दक्ष असून मागणीनुसार टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात चार तालुके आणि एक नगर पंचायतीमधील 67789 लोकसंख्येला 40 टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ.प्रशांत नारनवरे यांनी दिली. मागणीनुसार टँकरची उपलब्धता करून देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. यासंदर्भात सर्व संबंधितांची जिल्हाधिकारी कार्यालयात नुकतीच बैठक घेण्यात आली. यात सर्वांना दक्ष राहण्याचे निर्देश देण्यात आले असून संबंधित तालुक्यांमध्ये टंचाई निवारणासाठी कक्ष निर्माण करण्यात आले आहेत.

पाणी टंचाई असलेल्या मोखाडा तालुक्यात 28 गावे आणि 67 पाड्यांमध्ये 26 टँकरद्वारे, जव्हार तालुक्यात 11 गावे आणि 19 पाड्यांमध्ये 6 टँकरद्वारे, वाडा तालुक्यात 4 गावे आणि 28 पाड्यांमध्ये 4 टँकरद्वारे, विक्रमगड तालुक्यात 1 गाव आणि 4 पाड्यांमध्ये एका टँकरद्वारे तर नगर पंचायत मोखाडा मध्ये 2 गाव आणि 4 पाड्यांमध्ये 3 टँकरद्वारे अशा एकूण 46 गावे आणि 122 पाड्यांमध्ये 40 टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे. तातडीने निर्णय होण्यासाठी दुष्काळ घोषित केलेल्या तालुक्यांमध्ये मागणीनुसार टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यास मंजुरी देण्याचे अधिकार शासनाने उपविभागीय अधिकाऱ्यांना दिले आहेत. याशिवाय शासन निर्णयानुसार दुष्काळ सदृष्य परिस्थिती घोषित झालेल्या गावांना विविध सवलती लागू करण्यात येत आहेत.

पाणी टंचाई कृती आराखडा 2018-19 नुसार 198 विंधन विहिरी खोदण्यात आल्या आहेत. तसेच नळ पाणी पुरवठा विशेष दुरूस्ती उपाययोजना या योजनेअंतर्गत 9 नळपाणी पुरवठा विशेष दुरूस्ती उपाययोजनांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. त्यापैकी 3 कामे पूर्ण करण्यात आलेली आहेत. उर्वरीत कामे सुरू आहेत. जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी सद्यस्थितीत 3 विहिरी अधिग्रहीत करण्यात आलेल्या आहेत.

रोहयोच्या 865 कामांवर 62 हजारांहून अधिक मजूरांची उपस्थिती

जिल्ह्यात रोहयोअंतर्गत 25 एप्रिल ते 1 मे 2019 या आठवड्यात ग्रामपंचायत आणि यंत्रणांमार्फत 197 ग्रामपंचायतींमध्ये सुरू असलेल्या 865 कामांवर 62471 मजुरांची उपस्थिती होती. तसेच शेल्फवरील कामांची संख्या 18474 इतकी होती, अशी माहितीही जिल्हा प्रशासनामार्फत देण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!