
नालासोपारा (प्रतिनीधी) : सोपारा-गास रोडवरील टाकीपाडा भागातील गुन्हेगारी नियंत्रणात ठेवण्यासाठी तेथे लवकरच पोलीस चौकी सुरु करण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. ही चौकी लवकर कार्यरत व्हावी यासाठी तेथील नगरसेवक, समाजसेवकांचे सहकार्य मिळेल असा विश्वास नालासोपारा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वसंत लब्दे यांनी व्यक्त केला आहेे.
काल संध्याकाळी पोलीस ठाण्यात बीट श्री प्रस्थ ची बैठक झाली. या बैठकीत उपस्थित असलेल्या शांतता समिती सदस्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना त्यांनी उत्तरे दिली. गास गावाच्या हद्दीत आता नव्याने आलेल्यांची संख्या खूप वाढली आहे. शिवाय येथील टाकीपाडा भागात परप्रांतीय आणि बांगलादेशी लोकांची गर्दी अधिक आहे. येथे लवकरच पोलीस चौकी उभारण्यात येणार आहे, असेही व.पो.नि.लब्दे यांनी स्पष्ट केले. गर्दी टाळण्यासाठी आपण सर्व ते प्रयत्न केले पाहिजेत,कारण कोरोनाचा प्रादुर्भाव गर्दीमुळे वेगाने वाढतो. येत्या ६ डिसेंबर रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त कुठेही गर्दी होणार नाही याची दक्षता घ्या आणि पोलीस प्रशासनाला सहकार्य करा असे आवाहन सुद्धा त्यांनी केले.

नवे पोलीस आयुक्त सदानंद दाते यांच्या एक कॅमेरा शहरासाठी या आवाहनाला प्रतिसाद देणारे किशोर पाटील, अतुल साळुंखे, सुषमा दिवेकर, नवीन वाघचौडे, ताराचंद विकमाणी आदींचे या दरम्यान अभिनंदन करण्यात आले. आभार मानले गेले.
सुरुवातीला शहीद जवान, कोरोना योद्धे, आणि अखिल भारतीय नाट्य संमेलनाचे माजी अध्यक्ष व ज्येष्ठ रंगकर्मी राम जाधव यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
समिती सदस्य अड.रमाकांत वाघचौडे यांना या बैठकीचे सूत्रसंचलन आणि आभारप्रदर्शन केले.