टाळ मृदुंगाच्या गजरात पवित्र निर्मळ यात्रेची मंगलमय सुरुवात 

विरार (प्रतिनिधी) : श्रीक्षेत्र निर्मळ येथे श्रीमज्जगद्गुरु शंकराचार्य यांच्या यात्रोउत्सवास सोमवार पासून सुरवात झाली. टाळ आणि मृदूंगाच्या गजरात शोभा यात्रा काढत निर्मळच्या पवित्र यात्रेचा शुभारंभ झाला. 
यात्रेची सुरवात सकाळी दिंडी ने करण्यात आली. वाघोली जिल्हा परिषद शाळा ते निर्मळ नाका मग पुढे जगतगुरु श्रीमज्जगद्गुरु शंकराचार्य मंदिरा पर्यंत दिंडी काढण्यात आली होती. मध्ये पारंपरिक वेशात लेझीम खेळणाऱ्या मुली सहभागी होत्या तर विठ्ठल रखुमाई यांची वेषभूषा केली होती. पर्यावरण वाचवा हा संदेश देत अनेक विद्यार्थी सहभागी झाले होते. यामध्ये निर्मळ विद्यालय, म. ग. परुळेकर, उत्कर्ष विद्या मंदिर , जिल्हा परिषद सत्पाळा, न्यू इंग्लिश स्कुल ज्युनियर कॉलेज  येथील विद्यार्थी दिंडी मध्ये सहभागी होते. तसेच या शोभा यात्रेत आळंदी हुन अनेक वारकरी बालगोपाल आले होते. त्यांनी टाळ आणि ढोलकीच्या गजरात वातावरण मंत्रमुग्ध केले.
यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष बबनशेठ नाईक, सामाजिक कार्यकर्ते छगन नाईक , नगरसेवक पंकज चोरघे यासह इतर मान्यवर उपस्थित होते. श्रीमज्जगद्गुरु शंकराचार्य यांचे शिष्य व धर्मसभा अध्यक्ष वेदमूर्ती धनंजयशास्त्री वैद्य यांच्या आशीर्वादाने सदर सोहळा पार पडला.
सोपारा म्हणजेच शुर्पारक ही परशुरामाची भूमी म्हणून ओळखली जाते.पुर्वी या भूमीत अनेक पवित्र अशी तलाव व तीर्थ होती.काळाच्या ओघात अनेक तीर्थे नामशेष झाली.निर्मळ येथील विमल तलाव हे पवित्र तिर्थ असल्याचे भावीक मानतात.देव-देवतांनी या विमल तलावात स्नान केले असल्याची आख्यायीका आहे.ख्रिस्तपूर्व पाच हजार वर्षांपासूनचा पौराणिक इतिहास या पुरातन तीर्थक्षेत्राला लाभलेला आहे. या परंपरेचा इतिहास हा शूर्पारक म्हणजेच आताचे सोपारा हे व्यापारासाठी बंदर असल्याचा उल्लेख आहे.या बंदराच्या पाऊलखुणा अजूनही या प्रदेशात पहायला मिळतात.देश-विदेशातील अनेक व्यापार या बंदरातून होत होते.त्याचमुळे निर्मळ तीर्थक्षेत्र हे वेगवेगळ्या प्रांतातील लोकांना माहीत झाले होते.दुरवरून भक्तगण या तीर्थक्षेत्री पुर्वीपासून येत आले आहेत.
निर्मळ येथील विमल सरोवर व मालई सरोवर हि दोंन्ही तलावे पवित्र तिर्थ म्हणून प्रसिद्ध आहेत.पुर्वी या तलावांच्या काठी स्नानासाठी दगडी घाट बांधले असल्याचे अजुनही पहायला मिळतात.काशी क्षेत्र जसे पवित्र तिर्थक्षेत्र म्हणून हिंदू धर्मात मानले जाते तसेच शुर्पारक भूमीतील निर्मळ तिर्थक्षेत्रास मान्यता आहे.मंदिर ट्रस्ट व स्थानीक प्रशासनाकडून यात्रौत्सव काळात चोख बंदोबस्त ठेवला जात असतो.श्रीमद जगदगुरू शंकराचार्य, श्रीमहाविष्णू,विमलेश्वर महादेव,सुळेश्वर,मारूती, दुर्गादेवी व श्री गणपती मंदिर विश्वस्त मंडळ-निर्मळ’ यांच्यातर्फे यात्रेची जबाबदारी सांभाळण्यात येत असते.
* ऐतिहासिक महत्वाची निर्मळ यात्रा….
भगवान श्रीपरशुरामांनी विमलासुराचा वध करून श्रीविमल-निर्मळ सरोवर तीर्थाची निर्मिती केली आहे. या तीर्थाचे पावित्र्य काशी-प्रयागासारखा आहे. या तीर्थाच्या परिधीत भरणाऱ्या यात्रेत तीर्थस्नान, पिंडदान, तर्पण, भजन, कीर्तन, पालखी सोहळा, देवदर्शन वगैरे पुण्यकार्यासाठी दुरून यात्रेकरू अनेक वर्षांपासून मोठ्या श्रद्धेने येतात.निर्मळ तीर्थक्षेत्री अनेक ऋषी, पांडव, जगद्गुरु आद्य शंकराचार्य, बुरुड राजा, देवप्रियदर्षी राजा, सातवाहन राजे, राजा भीमदेव, नाथाराव सिंधा भंडारी, ब्रह्मेंद्र स्वामी, श्रीमंत पेशवे यांचेही आगमन झाले होते.यात्रौत्सव काळात भाविक निर्मळ माहात्म्य ग्रंथाचे पारायण करीत असतात तसेच त्रयोदशीला स्नानपर्वास पहाटे जात असतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!