ठाकरे सरकार @ 365 ! – योगेश त्रिवेदी

Thakrey Sarkar

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची सूत्रे २८ नोव्हेंबर २०१९ रोजी शिवतीर्थावर म्हणजेच दादरच्या ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते भारताच्या घटनेनुसार आणि ईश्वरसाक्ष शपथ घेऊन स्वीकारली. मराठी माणसाच्या न्याय्य हक्कांसाठी लढणारी ‘शिवसेना’ बाळासाहेब ठाकरे यांनी १९ जून १९६६ रोजी स्थापन केल्यानंतर तब्बल त्रेपन्न वर्षानंतर बाळासाहेबांच्या चिरंजीवांनी महाराष्ट्राचे नेतृत्व आपल्या हाती घेतले. शिवतीर्थावर २४ वर्षानंतर शिवसेनेच्या या दुसऱ्या मुख्यमंत्र्यांनी शपथ घेतली होती. पहिले मुख्यमंत्री डॉ. मनोहर गजानन जोशी यांनी अटलबिहारी वाजपेयी, बाळासाहेब ठाकरे, लालकृष्ण अडवाणी यांच्या उपस्थितीत, अरबी समुद्राला लाजवेल अशा अथांग जनसागराच्या साक्षीने १४ मार्च १९९५ रोजी दादरच्या शिवतीर्थावर शपथ घेतली होती.  उद्धव ठाकरे हे शिवसेनेचे तसे तिसरे मुख्यमंत्री. शिवसेनेचे दुसरे मुख्यमंत्री नारायण तातू राणे. पण ते फार कमी कालावधी साठी होते. १ फेब्रुवारी १९९९ ते १७ ऑक्टोबर १९९९ असे केवळ २५९ दिवस ते मुख्यमंत्री पदावर राहिले होते. डॉ. मनोहर जोशी आणि नारायण राणे हे शिवसेना भारतीय जनता पक्षाच्या युतीचे होते तर उद्धव ठाकरे यांनी बदललेल्या राजकीय समीकरणात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस अशा तीन पक्षांच्या महाविकास आघाडी सरकारचे नेतृत्व स्वीकारले. 

उद्धव ठाकरे यांच्या ‘ठाकरे सरकार’ ला २८ नोव्हेंबर २०३० रोजी 365 दिवस पूर्ण होत आहेत. एक वर्ष पूर्ती होत असतांना महाविकास आघाडीच्या या ‘ठाकरे सरकार’ ला प्रचंड संकटांचा ‘सामना’ करावा लागतोय. कोविड १९ म्हणजेच कोरोना या चाईनीज विषाणूने जागतिक पातळीवर थैमान घातले असतांना संकटांच्या अत्युच्च शिखरावर ठाकरे सरकार ची प्रतिष्ठापना झाली. महाराष्ट्र विधानसभा निवडणुका ऑक्टोबर २०१९ मध्ये झाल्या. भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि मित्रपक्षांच्या महायुतीच्या पारड्यात जनतेने बहुमताचे दान टाकले. परंतु भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी राजकीय महत्वाकांक्षेचा अट्टाहास धरला असल्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी वेगळा राजकीय मार्ग चोखाळण्याचा निर्णय घेतांना मित्रपक्षाला जबरदस्त धडा शिकविण्याची खूणगाठ मनाशी बांधली. २४ ऑक्टोबर २०१९ रोजी विधानसभा निवडणुकीच्या निकालाचे चित्र स्पष्ट झाले होते. तसं पाहिलं तर महायुतीचंच सरकार येण्याची चिन्हं, शक्यता व्यक्त होत होती. काँग्रेसचे प्रवक्ते डॉ. राजू वाघमारे यांनी, “राजकारणात काहीही घडू शकतं. एव्हरीथिंग इज पॉसिबल इन लव, वॉर अँड पॉलिटिक्स” असं बोलून दाखविलं होतं. भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी शिवसेना जोपर्यंत निर्णय घेत नाही तोपर्यंत आम्ही सरकार बनविणार नाही, अशी भूमिका घेतली होती. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे जाऊन सर्वात मोठा, दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाच्या पक्षाच्या नेत्यांनी भेटी घेतल्या. चित्र धूसर होतं. भारतीय जनता पक्षाचे विधिमंडळ पक्षनेते म्हणून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची निवड झाली होती परंतु राज्यपालांकडे त्यांच्या ऐवजी चंद्रकांत पाटील, विनोद तावडे आणि आशीष शेलार हेच चकरा मारत होते. शिवसेनेचे विधानसभा गटनेते एकनाथ शिंदे, अनिल परब, प्रताप सरनाईक आणि मंडळी राज्यपालांची भेट घेत होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ नेते अजित पवार, धनंजय मुंडे यांनीही भेटी घेतल्या. पण सारेच अधांतरी होते.

याच दरम्यान महाराष्ट्राच्या राजकीय क्षीतिजावर अभूतपूर्व आणि ऐतिहासिक अशी यापूर्वी न घडलेली आघाडी अस्तित्वात येऊ घातली. शरद पवार, सोनिया गांधी आणि उद्धव ठाकरे यांच्या रुपाने राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेना हे विधानसभा निवडणुकीत एकमेकांविरोधात लढलेले पक्ष महाविकास आघाडीच्या माध्यमातून एकत्र आले. महाराष्ट्रच काय संपूर्ण भारतात राजकीय भूकंप घडतोय की काय असे वाटू लागले. भारतीय जनता पक्षाचे नेते हेकेखोर भूमिका घेत कोणत्याही परिस्थितीत मुख्यमंत्री भाजपाचाच होणार हे बेंबीच्या देठापासून ओरडून सांगत होते. सोनिया गांधी यांचे राजकीय सल्लागार अहमद पटेल यांनी सोनिया गांधी यांच्या सांगण्यावरुन मुंबई गाठली. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे तीन पक्ष एकत्र आणण्यासाठी डॉ. राजू वाघमारे यांच्या नंतर हुसेन दलवाई, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी सकारात्मक भूमिका घेतली. राजकारणातले चाणक्य शरदचंद्र गोविंदराव पवार हे तर या सर्व घडामोडींच्या केंद्रस्थानी होते. दिल्ली मुंबई अशा चकरा मारल्यावर २२ नोव्हेंबर २०१९ रोजी वरळीच्या पंडित जवाहरलाल नेहरु केंद्रात उद्धव ठाकरे, शरद पवार, अहमद पटेल यांच्या उपस्थितीत तिनही पक्षांच्या नेत्यांची महत्वपूर्ण बैठक घेण्यात आली. महाराष्ट्रात तिसऱ्यांदा राष्ट्रपती राजवट अंमलात आलेली होती आणि भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी सर्वच परिस्थिती वर नजर ठेवीत २२ नोव्हेंबर २०१९ ची रात्र आपल्या राजकीय डावपेचांच्या घडामोडींसाठी निवडली. एका बाजूला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नांवावर महाविकास आघाडी सरकारचे नेतृत्वपदी शिक्कामोर्तब होत असतांना देवेंद्र फडणवीस यांनी शह काटशहाच्या पटावर महाविकास आघाडीच्या नेत्यांना कात्रजचा घाट दाखवित चक्क राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ नेते अजितदादा पवारांनाच पळवून नेऊन २३ नोव्हेंबर २०१९ च्या सक्काळी साडेसात वाजता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाची शपथ राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या कडून घेऊन मोकळे झाले. अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा यांचे आभारही मानले. त्या दिवसाच्या सर्वच वर्तमानपत्रांचे मथळे उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होणार अशा प्रकारचे होते आणि घडलं वेगळंच. प्रचंड प्रमाणात उलथापालथ झाली. देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर आपल्या दालनात जाऊन दुसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची सूत्रे ताब्यांत घेतली. सर्वांच्या नजरा अजितदादांकडे लागल्या होत्या. त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची राजभवनात शपथ घेतली असली तरी मंत्रालयात आपल्या दालनाचा ताबा घेतला नव्हता. महाविकास आघाडी च्या नेत्यांनी कंबर कसून भाजप ला धोबीपछाड देण्याची तयारी केली होती तर अजितदादांनी सूत्रे स्वीकारली नसल्याने भारतीय जनता पक्षाचे नेते अस्वस्थ झाले होते. या सर्व घडामोडीत शरद पवार यांच्या पत्नी आणि अजित पवार यांच्या काकू प्रतिभाताई पुढे आल्या आणि त्यांनी अजित दादांनी परतीचा मार्ग पत्करावा आणि राष्ट्रवादी काँग्रेस तद्वतच पवार परिवार यांची संभाव्य फूट टाळावी, यासाठी गळ घातली. व्हायचा तोच परिणाम झाला आणि विलासराव देशमुख यांच्या नंतर सर्वाधिक काळ मुख्यमंत्री पदाचा विक्रम करणारे देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्रातील सर्वात कमी कालावधी असलेले केवळ आणि केवळ ऐंशी तासांच्या मुख्यमंत्री पदाचाही विक्रम नोंदवीते झाले. एकशे पाच आमदारांचा सर्वाधिक मोठा पक्ष सत्तेवरुन पाय उतार झाला आणि एकशे सत्तरची संख्या गाठणाऱ्या शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस अशा महाविकास आघाडी चे सरकार सत्तेवर येण्याचा  मार्ग मोकळा झाला.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महाविकास आघाडी चे नेते म्हणून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना सरकार बनविण्यासाठी पाचारण केले. विश्वास दर्शक प्रस्ताव मंजूर करून घेण्याची अट घालून शपथविधी निश्चित करण्यात आला. शिवतीर्थावर २८ नोव्हेंबर २०१९ रोजी सायंकाळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, एकनाथ शिंदे अशा निवडक छोटेखानी मंत्रिमंडळाने शपथ घेतली. उद्धव ठाकरे यांनी निवडणुकीच्या प्रचारात शेतकऱ्यांच्या भेटी घेतल्या होत्या, त्यातील शेतकरी दांपत्याने सुद्धा शिवतीर्थावर शपथविधी सोहोळ्यास हजेरी लावली. २००६ साली शिवसेनेतून फारकत घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्थापन करणारे चुलतभाऊ स्वरराज श्रीकांत ठाकरे हे मातोश्री मधुवंती आणि पत्नी शर्मिला, पुत्र अमित सह या दिमाखदार सोहोळ्यास आवर्जून उपस्थित झाले होते. विधानसभा अधिवेशन झाले. विधानसभेचे हंगामी अध्यक्ष कालिदास कोळंबकर यांच्या अधिपत्याखाली नवीन आमदारांचा शपथविधी पार पडताच महाविकास आघाडी ने चाल खेळत विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांना अध्यक्ष बनविले आणि विधानसभा नियम/अधिनियम, कौल शकधर यांचा पूरेपूर उपयोग करीत ठाकरे सरकार ने विश्वास दर्शक प्रस्ताव एकशे एकोणसत्तर मते पटकावीत जिंकला. वळसे पाटील सुद्धा आघाडी चेच असल्याने ही संख्या एकशे सत्तर होते. २८८ च्या सभागृहात १७० म्हणजे घसघशीत असे बहुमत ठाकरे सरकार कडे प्राप्त झाले होते. काँग्रेसचे नेते नाना पटोले यांची विधानसभा अध्यक्ष पदी निवड झाली. नंतर नागपूर अधिवेशन पार पडले. या अधिवेशनात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपले लहान भाऊ , माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आपला इरादा स्पष्ट केला. (विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात देवेंद्र फडणवीस यांनीच उद्धव ठाकरे माझे मोठे भाऊ तर नरेंद्र मोदी हे उद्धव ठाकरे यांचे मोठे भाऊ असे नवे नाते जाहीर केले होते.) उद्धव ठाकरे यांना अजित पवार,  बाळासाहेब थोरात, जयंतराव पाटील, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, नवाब मलिक आदींनी भरभक्कम साथ देत भारतीय जनता पक्षाने आता पुढील काळात विरोधी बाकांवरच बसावे यासाठी शुभेच्छा दिल्या. फेब्रुवारी २०२० मध्ये विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन घेण्यात आले खरे परंतु कोविड १९ उर्फ कोरोना या चाईनीज विषाणूने जगभरात थैमान घालतांनाच भारतात प्रवेश केला. यामुळे सर्वच वातावरण पालटून गेले.

भारत आणि विशेषतः महाराष्ट्रातील नागरिकांच्या जीविताचे रक्षण करण्याची महत्वपूर्ण जबाबदारी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांच्यावर आली. प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांचे नातू आणि हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे सुपूत्र असलेले उद्धव ठाकरे हे कसलेल्या लढवैयांच्या रुपात कंबर कसून कामाला लागले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात टाळेबंदी जाहीर केली तत्पूर्वीच उद्धव ठाकरे यांनी धडाकेबाज पावले उचलली आणि यंत्रणेला कामाला लावले. उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्यासह संपूर्ण मंत्रिमंडळ झपाटून, डोळ्यात तेल घालून कार्यरत झाले. साध्या नगरसेवक पदाचाही अनुभव गाठीशी नसलेल्या परंतु सर्वसामान्य जनतेशी नाळ जोडलेल्या उद्धव ठाकरे यांनी अनुभवी मंत्र्यांना सोबत घेत रात्रीचा दिवस, रक्ताचे पाणी करीत धीरोदात्तपणे काम सुरु केले. संसदीय लोकशाही मध्ये सत्ताधारी आणि विरोधी पक्ष ही रथाची दोन चाके समांतरपणे चालावीत आणि विशेषतः संकटाच्या काळात या दोघांनी हातात हात घालून वाटचाल करणे अभिप्रेत असतांना केवळ विरोधासाठी विरोध ही भूमिका घेऊन जबाबदार विरोधी पक्षांनी बेजबाबदारपणाचे हिडीस दर्शन घडविले. त्यामुळे २०१४ ते २०१९ पर्यंत जी प्रतिमा भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांची झाली होती तिला गालबोट लावण्याचे किंबहुना ती प्रतिमा डागाळण्याचेच काम विरोधकांनी केले. एका बाजूला राष्ट्रीय पातळीवर पहिल्या पाच मुख्यमंत्र्यांमध्ये स्थान पटकावणाऱ्या आणि जागतिक पातळीवर च्या नियतकालिकांनी प्रशस्तीपत्र दिले असतांना उद्धव ठाकरे यांना त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या तोंडातून सत्तेचा घास हिरावून घेतल्यामुळे नाही नाही ते बेछूट आरोप करण्यासाठी जणू एकमेकांमध्ये अहमहमिका लागली. महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधींनी कोरोनामुक्तीच्या युद्धात मुख्यमंत्री आणि सरकार च्या खांद्याला खांदा लावून काम करण्याऐवजी सत्ताधारी आघाडी ला सत्तेतून खाली खेचत खांदा देण्यापर्यंत मजल मारण्याची तयारी केली. मग यात मातोश्री ने मोठे केलेले आणि स्वार्थासाठी दुसऱ्याच्या वळचणीला जाऊन बसलेलेही मागे राहिले नाहीत. हे सरकार उलथवून टाकण्यासाठी, राज्यात राष्ट्रपती राजवट आणण्यासाठी जंगजंग पछाडण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसून येत होते. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे जर एकत्र येऊ शकत असतील तर नैतिकता कुठे आहे ? अशा उच्चरवाने ओरड करणाऱ्यांना २३ नोव्हेंबर २०१९ च्या पहाटे कुणासोबत सरकार बनवायला निघालो होतो याचा पद्धतशीरपणे विसर पडला होता. हिंदुत्वाच्या गप्पा मारणाऱ्यांच्या नजरेसमोर स्वतः च्या पक्षाच्या झेंड्यातून हिरवा रंग नसल्याचे जाणवले असावे, किंबहुना ६ डिसेंबर १९९२ रोजी अयोध्येत बाबरी उद्ध्वस्त होताच, “नहीं, वह बीजेपी के नहीं थे, आर एस एस के नहीं थे, विश्व हिंदू परिषद के नहीं थे, बजरंग दल के नहीं थे शायद शिवसेना के होंगे”, अशा शब्दांत भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते सुंदरसिंह भंडारी यांनी सांगत बाबरी प्रकरणी पल्ला झाडला, हात वर केले. तेंव्हा कलानगर मातोश्री वरुन बाळासाहेब ठाकरे यांनी, ” जर ते शिवसैनिक असतील तर त्यांचा मला अभिमान वाटतो,” अशी डरकाळी फोडली. हे सर्व समोर असतांना पोकळ आणि बेगडी हिंदुत्वाच्या बेटकुळ्या फुगवून दाखवू लागले. आम्ही खरे हिंदुत्ववादी असल्याचे छाती बडवून सांगू लागले. परंतु मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शांत, संयमी, धीरोदात्तपणे काम करीत आपल्या ठायी पराकोटीची सहनशीलता असल्याचे आपल्या कार्य कर्तृत्वातून दाखवून दिले. बाळासाहेब ठाकरे यांची आक्रमकता आणि माँसाहेब मीनाताई ठाकरे यांचा शांत, सहनशील स्वभाव याचा सुंदर मिलाफ उद्धव ठाकरे यांच्या ठायी असल्याचे पावलोपावली, पदोपदी दिसून येत असल्याचे शिवसेना नेते आणि माजी मंत्री दिवाकर रावते यांनी यथार्थ वर्णन करतांना स्पष्ट केले आहे. विविध प्रकारच्या संकटांचा सामना ठाकरे सरकार अत्यंत चांगल्या प्रकारे करीत असून कोरोनाच्या प्रारंभीच्या काळात जी तुटपुंजी सामग्री हाती होती, त्यात घसघशीत वाढ करुन लॉकडाऊन, अनलॉक, पुनश्च हरी ओम चा पुकारा करतांना ‘तुम्ही खबरदारी घ्या, मी जबाबदारी घेतो’,  ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या मोहीमा कमालीच्या यशस्वी केल्या आणि राज्यातील बारा कोटी जनतेला दिलासा मिळवून दिला.

अनेक संकटे आली, सुमारे डझनभर मंत्र्यांना कोरोनाची बाधा झाली. परंतु सर्वच जण सहीसलामत बाहेर पडत लोकांच्या सेवेसाठी कटिबद्ध झाले. कोरोनामुक्तीच्या युद्धात लोकांच्या सहभागासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रालयात असलेल्या महाराष्ट्र बँकेत स्वतंत्र खाते उघडून लोकांना आवाहन केले. अनेकांनी सढळ हस्ते सहकार्य करण्याची भूमिका घेतली. त्यावेळी जबाबदार विरोधी पक्षांनी पंतप्रधान सहाय्य निधीकडे आपल्या रकमा वळवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नजरेतून आपण उतरणार नाही, याची दक्षता घेतली. एका नेत्यांनी तर आधी मुख्यमंत्री सहाय्य निधीकडे मदत करण्याचे जाहीर करून आयत्या वेळी नवी दिल्ली कडे ती रक्कम फिरवली. नैसर्गिक आणि कृत्रीम अशा सर्व संकटांचा मुकाबला करतांना कोणतीही हयगय होणार नाही, याची खबरदारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली. राज्यातला विरोधी पक्ष कसा बेजबाबदारपणाचे दर्शन अशा संकटकाळात घडवतोय, याची परखडपणे तक्रार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधानांनी बोलावलेल्या सर्व मुख्यमंत्र्यांच्या भर बैठकीत केली आणि आपले पाणीच वेगळे असल्याचे दाखवून दिले. राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी या काळात जे काम आरोग्य मंत्री म्हणून केले त्याला तर तोडच नाही. स्वतःच्या मातोश्री इस्पितळात उपचारासाठी दाखल असतांना जेमतेम लक्ष देत राज्यातील बारा कोटी जनतेच्या आरोग्याची काळजी त्यांनी वाहिली. या माऊली ने इहलोकाचा निरोप घेतला तेंव्हा सुद्धा मोजकेच दिवस कुटुंबाला देऊन पुन्हा राज्यातील जनतेच्या सेवेसाठी झेपावले. विरोधकांच्या आरोपांचा आघाडी सरकारचे शिल्पकार शरद पवार यांनी प्रत्येक वेळी चांगलाच समाचार घेतांना मुख्यमंत्री आणि सरकारची योग्य प्रकारे बाजू सांभाळली. महाराष्ट्राची अस्मिता, स्वाभिमान आणि ताठ बाणा कसा असतो हे दाखवून देण्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसूभरही कमी पडले नाहीत. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पाठविलेल्या पत्राला तितक्याच खरमरीत, परखडपणे उत्तर देतांना उद्धव ठाकरे यांनी त्यांना त्यांच्या पदाचीही जाणीव करुन दिली. केंद्रीय गृहमंत्रालयाने देशभरात आंदोलने, निदर्शने, मोर्चे यांना बंदी घातली असतांनाही राज्यातील विरोधी पक्ष मात्र हा आदेश आपल्या साठी नाहीच, असा गोड गैरसमज करुन घेत संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलनांचा उच्छाद मांडत असल्याचे चित्र दिसून येत होते. आपल्या राजवटीत झालेल्या आंदोलनांना विरोध करणाऱ्या तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी या काळात त्याच आंदोनांना हवा देत आंदोलनांच्या नेतृत्व करण्यापर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न केला. कोरोनामुक्तीचे कार्य पूर्णत्वास नेण्यासाठी सर्व तांत्रिक, वैद्यकीय बाजू सक्षमपणे पुढे आणतांना दोन स्वतंत्र टास्क फोर्स ची रचना केली. शासन, प्रशासन यांना योग्य दिशा देतांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अजित पवार, बाळासाहेब थोरात आणि सर्वच सहकारी यांच्या सहकार्याने आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, राजकीय सर्वच आघाड्यांवर सर्वोत्तम कामगिरी करुन आदर्श सरकार कसे असावे, याचा वस्तुपाठ घालून दिला. गेल्या तीस पस्तीस वर्षांत भारतीय जनता पक्षाने शिवसेनेला जी वागणूक देत, त्यांच्या खांद्यावर उभे राहून गगनाला गवसणी घालण्याचा प्रयत्न केला आणि शिवसेनेला दाबण्याचा डाव टाकला, त्या त्या सर्वांचा हिशोब उद्धव ठाकरे यांनी आता  पूर्ण केला आहे, असेच म्हणावे लागेल. अशा या आदर्श ‘ठाकरे सरकार’ ला एक वर्ष पूर्ण होत असून जनकल्याणासाठी या सरकारला अनेकानेक शुभेच्छा देतांना राजसारथी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या सर्वच सहकाऱ्यांना उदंड आयुष्य आणि ठणठणीत आरोग्य प्राप्त होवो तसेच जनकल्याणाचे कार्य करतांना नवनवे संकल्प पूर्ण करण्यासाठी आणि सर्वांगिण, विकसित महाराष्ट्र घडविण्यासाठी शक्ती मिळो, ही आई एकवीरा आणि आई तुळजाभवानी च्या चरणी विनम्र प्रार्थना.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!