डहाणूतील दिव्यांग शिक्षकाची २५ वर्षांची दिव्यसेवा

वसई (वार्ताहर) : स्वतः अपंग असूनही हजारो दिव्यांगांची अविरत सेवा करणाऱ्या डहाणूतील शिक्षक दिलीप पाटील यांच्या या सेवेला २५ वर्षे पुर्ण झाली आहेत.

दोन्ही पायांनी अपंग असलेले पाटीलसर व्हिल चेअरचा आधार घेवून ज्ञानदानाचे कार्य करतात, त्यानंतर डहाणूतील अनाथ,अबला,अपंग व्यक्तींची सेवा करून त्यांना समाजाच्या आधुनिक आणि मुख्य प्रवाहात आणण्याचे कार्य ते करीत असतात.आतापर्यंत हजारो दिव्यांगांना शासनाच्या विविध सेवा,सवलती पाटीलसरांनी मिळवून दिल्या.पद्मश्री अनताई वाघ यांच्याकडून समाजसेवेचा वसा घेतल्यानंतर त्यांनी अनेक वर्तमान पत्रे,साप्ताहिक आणि दिवाळी अंकांतून लेखन करीत दिव्यांगांच्या समस्या शासन दरबारी मांडल्या.

हजारो दिव्यांग विद्यार्त्यांना शालोपयोगी वस्तु,क्रीडा साहित्य,तरुणांना व्यवसाय नोकरी मिळवून देतानाच त्यांनी त्यांच्यासाठी विविध स्पर्धा, शिबीरे, मेळावे, स्नेहभोजनाचेही आयोजन सातत्याने केले. त्यांच्या या कार्याची दखल घेवून राज्य शासनाने त्यांना आदिवासी समाजसेवक पुरस्काराने सन्मानित केले.त्यांच्या या दिव्यांग सेवेला यंदा २५ वर्षे पुर्ण झाली आहेत.त्यानिमीत्ताने जेष्ठ समाजसेवक गंगाधर म्हात्रे यांच्या अध्यक्षतेखाली वनभोजन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.सुधीर पाटील यांच्या फार्म हाऊसवर रविवारी आयोजित करण्यात आलेल्या या मेळाव्यात विद्यार्थ्यांनी गाणी, मुकाभिनय, नाटिका सादर केल्या. दिव्यांगासाठी स्वतःचा फार्म हाऊस विनामुल्य उपलब्ध करून देतानाच त्यांच्या चहा,नाश्ता,भोजनाची व्यवस्थाही गेली अनेक वर्षे करणाऱ्या सुधीर पाटील यांचे यावेळी आभार मानन्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!