डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा काँग्रेसने केला दोनवेळा पराभव ! १९९८ ची ‘निळाई’ शेवटचीच ? – योगेश त्रिवेदी

भारताला १५ ऑॅगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र्य मिळाले. मुस्लिमांसाठी पाकिस्तान आणि हिंदुंसाठी हिंदुस्थान अशी भारताची फाळणी झाली. त्यानंतर घटनासमितीने घटनेचा मसुदा तयार करुन तो राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांना घटनासमितीचे प्रमुख डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पंडित जवाहरलाल नेहरु, सरदार वल्लभभाई पटेल, मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये सुपूर्द केला. आणि २६ जानेवारी १९५० रोजी आपला भारत प्रजासत्ताक झाला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार म्हणून अवघ्या विश्वासमोर ओळखले जातात. परंतु याच भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा काँग्रेस पक्षाने १९५२ सालच्या लोकसभेच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत मुंबईत आणि १९५४ च्या भंडारा लोकसभा पोटनिवडणुकीत पराभव केला होता. पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या पहिल्या मंत्रीमंडळात कायदेमंत्री असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा दोन वेळा काँग्रेस पक्षाने पराभव केल्यानंतर त्यांना खरे पाहता बाबासाहेबांचे नां घेण्याचा नैतिक अधिकार नाही. आमचे मित्र डॉ. पुरुषोत्तम उर्फ राजू पाटोदकर हे सध्या लोकसभेच्या निवडणुकीत मुंबई शहर जिल्हाधिकारी आणि मुंबई जिल्ह्याचे निवडणूक निर्णय अधिकारी शिवाजीराव जोंधळे यांच्या अधिपत्याखाली प्रसार माध्यम कक्षाचे प्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. त्यांनी एक निवडणूक पूर्वपीठिका प्रकाशित केली आहे. यामध्ये १९५३ सालापासूनची महत्वपूर्ण माहिती उपलब्ध करुन दिली आहे. त्यातील पान क्रमांक ३९ अनुसार १९५२ साली लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत मुंबई उत्तर मतदारसंघात एकूण आठ उमेदवार उभे होते. त्यापैकी काँग्रेसचे विठ्ठल बाळकृष्ण गांधी यांना १ लाख ४९ हजार १३८, समाजवादी पक्षाचे अशोक रणजितराम मेहता यांना १ लाख ३९ हजार ७४१, काँग्रेसच्या नारायण सदोबा काजरोळकर यांना १ लाख ३८ हजार १३७ आणि शेडयूल कास्ट फेडरेशनचे भीमराव रामजी आंबेडकर यांना 1 लाख २३ हजार ५७६ मते मिळाली. या मतदारसंघात भाई श्रीपाद अम्रुत डांगे, गोपाळराव विनायक देशमुख, केशव बाळकृष्ण जोशी, निलकंठ बाबुराव परुळेकर हेही निवडणुकीच्या रिंगणात होते. भाई डांगे यांनाही ९६ हजार ७५५ मते मिळाली होती. १९५२ च्या या निवडणुकीत सर्वसाधारण आणि राखीव या दोन्ही ठिकाणी काँग्रेसचे उमेदवार निवडून आले होते. १९५४ साली भंडारा लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक घेण्यात आली तेंव्हा मुंबईत पराभूत झालेले अशोक मेहता हे समाजवादी पक्षाचे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे शेडयुल कास्ट फेडरेशन तर्फे उभे राहिले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि अशोक मेहता यांच्या प्रचारासाठी जयप्रकाश नारायण, एस. एम. जोशी आणि नानासाहेब गोरे हे प्रजा समाजवादी पक्षाचे नेते आले होते. या निवडणुकीत बाबासाहेब आंबेडकर यांचा ८ हजार ३३१ मतांनी पराभव झाला परंतु अशोक.मेहता निवडून आले. बाबासाहेबांचा पराभव करणारे उमेदवार काँग्रेसचे होते. पण काँग्रेस चा एक उमेदवार मेहतांनी पराभूत केला होता. राजकीय विेषक सुहास सोनावणे यांनी ही माहिती एका लेखात दिली असून त्यांनी प्रकाश आंबेडकर यांचे आरोप खोडून काढीत अलौकिक नीतिमत्तेमुळेच बाबासाहेब आंबेडकर यांचा पराभव झाल्याचे नमूद केले आहे. बाबासाहेब आंबेडकर यांनी तर काँग्रेस पक्ष म्हणजे जळकं घर असल्याचे सांगितले होते.

१९९८ सालची ही ‘निळाई’ शेवटचीच ठरणार ?

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताला राज्य घटना दिली. संविधान दिले. बाबासाहेबांनी रिपब्लिकन पार्टी ऑॅफ इंडिया ची स्थापना केली. आधी शेडयुल कास्ट फेडरेशन काढले होते. पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या मंत्रीमंडळात डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे कायदेमंत्री होते. त्यानंतर आज इतक्या वर्षांनी रामदास आठवले हे रिपब्लिकन पार्टी ऑॅफ इंडिया चे प्रतिनिधी म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रीमंडळात आहेत. आज रिपब्लिकन पक्षाचे किती वेगवेगळे पक्ष आहेत किंबहुना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी म्हणून किती नेते पक्ष चालवताहेत याची मोजदाद नाही. प्रत्येक पक्षाचा वापर राष्ट्रीय पक्ष करुन घेतोय. प्रत्येक वेळी १४ एप्रिल आणि ६ डिसेंबर आली की ऐक्याच्या गुळगुळीत बातम्या वाचायला मिळतात.

प्रकाश आंबेडकर

रामदास आठवले

‘ऐक्यवादी पक्षाचे नेतृत्व प्रकाश आंबेडकर हे जर करणार असतील तर मी मंत्रीपद सोडेन,’ ही रामदास आठवले यांनी बऱ्याच वेळा घोषणा केली पण आंबेडकर ऐकायला तयार नाहीत.  रिपब्लिकन पक्षाच्या सर्व गटांचे ऐक्य व्हावे म्हणून नऊ तरुणांनी आमरण उपोषण केले होते आणि त्याची परिणती म्हणून १९९८ साली रामदास आठवले हे उत्तर मध्ये मुंबईतून, रा. सू. गवई हे अमरावती मधून, प्रा. जोगेंद्र कवाडे हे चिमूर मतदारसंघातून आणि प्रकाश आंबेडकर हे अकोला मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. एकाच वेळी आंबेडकरी विचारधारेचे किंबहुना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी म्हणविणारे चार चार खासदार निवडून येणे हा खरोखरच एक चमत्कार मतदारांनी घडवून आणला होता. पण हा आनंद क्षणिक ठरला. १९९९ साली लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका झाल्या आणि पुन्हा चार खासदार चार दिशेला निघून गेले. आज ते उपोषण करणारे नऊ तरुण कुठे आहेत याची कुणालाही कल्पना नाही. रा. सू. गवई यांचे देहावसान झाले. काँग्रेसच्या मदतीने त्यांनी राज्यपाल पदापर्यंत वाटचाल केली. त्यांचे पुत्र डॉ. राजेंद्र गवई हे काँग्रेस आघाडीत आहेत पण ते निवडणुकीच्या मैदानात नाहीत. प्रकाश आंबेडकर हे अकोला आणि सोलापूर या दोन ठिकाणाहून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. ओवेसी यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांनी वंचित आघाडी बनविली आहे, निश्चित कुणाला सत्तेपासून वंचित ठेवण्यासाठी ते धडपडताहेत त्यांचे त्यांनाच माहित. रामदास आठवले हे मोदी-फडणवीस-ठाकरे यांच्या बरोबर महायुती च्या माध्यमातून फड गाजवताहेत. त्र्यंबक मारुती कांबळे उर्फ टी. एम. कांबळे, समाधान नावकर, जोगेंद्र व जयदीप कवाडे यांचे पक्षही कुणाच्या अन् कुणाच्या भरोबर आहेत. आम्ही निवडून आलो नाही तरी आम्ही कुणाला तरी पाडू शकतो, अशी प्रवृत्ती बळावत चालली आहे. आमचा प्रत्येक राष्ट्रीय पक्ष हा निव्वळ लोणच्यासारखा तोंडीलावणं म्हणून वापर करुन घेतोय, हेही कुणाच्या लक्षात येतेय का कुणास ठाऊक. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकासाठी आटापिटा चाललाय पण ते प्रत्यक्षात केंव्हा येईल याचा अंदाज नाही. सकाळी उठले की प्रत्येक नेता हा शाहू,फुले, आंबेडकर या नांवाची जपमाळ ओढायला सुरुवात करतो आणि काही जण संध्याकाळी आपटे, आगाशे, डहाणूकर यांच्या कट्टयावर जाऊन बसतात. १९९८ साली एकाचवेळी निवडून आलेले चार खासदार हा केवळ इतिहास राहणार की ही संसदेतली ‘निळाई’ भविष्यात वाढणार हे रिपब्लिकन नेत्यांवर अवलंबून आहे. रामदास आठवले, अविनाश महातेकर, अर्जुन डांगळे, गौतम सोनावणे, स्व. नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमरशेख, प्रा. ज. वि. पवार आदी नेत्यांनी चर्चा करुन एक मजबूत पर्याय उभा करता येऊ शकेल. चार दोन तुकडयांऐवजी घसघशीत वाटा सत्ताधारी पक्षांकडून मिळविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, कार्यकर्त्यांना ‘अच्छे दिन’ कधी दाखविणार ? यासाठी आंबेडकरी जनतेने रेटा लावायला काय हरकत आहे ?

इंजिनानं भल्या भल्या नेत्यांना घरी धाडले !          

भारत परीसिमन आयोग अर्थात भारतातील लोकसभा आणि विधानसभा यांच्या मतदारसंघांची पुनर्रचना झाल्यानंतर २००९ साली लोकसभेच्या ज्या निवडणुका झाल्या त्या नवीन मतदारसंघाप्रमाणे झाल्या. महाराष्ट्रात २००४ च्या लोकसभा निवडणुकीनंतर राजकीय वातावरण बदलले होते. शिवसेनेला दोन मोठे धक्के बसले होते. शाखाप्रमुख, नगरसेवक, समिती अध्यक्ष, आमदार, मंत्री, अगदी मुख्यमंत्री पद बाळासाहेब ठाकरे यांनी दिल्या नंतर ही महत्वाकांक्षा वाढत गेलेल्या नारायण राणे यांनी २००५ साली शिवसेनेला जय महाराष्ट्र केला आणि ते काँग्रेस वासी झाले तर शिवसेना रुपी गाडी कुणी चालवायची या वादातून स्वरराज श्रीकांत उर्फ राज ठाकरे यांनी आपले इंजिन वेगळे काढले.2006 साली राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्थापन केली.२००७ च्या मुंबई महापालिका आणि त्यानंतर २००९ साली लोकसभा निवडणुका शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांनी समोरासमोर लढविल्या. २००९ च्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाच्या मोठया नेत्यांना घरी पाठविले. आपण निवडून येऊ शकत नाही पण पाडू शकतो हे राज ठाकरे यांनी कल्याण वगळता मुंबई, ठाणे, भिवंडी, पुणे आणि नाशिक येथे दाखवून दिले. परप्रांतीय मुद्दयावर कल्याण येथे रेल्वे भरती प्रकरणावरून स्टेशनवर मनसैनिकांनी उत्तर भारतीय मुलांना फटकवून काढले असतांनाही मनसे च्या वैशाली दरेकर यांच्या सह विधानपरिषदेचे उपसभापती वसंतराव डावखरे यांचा शिवसेनेच्या आनंद परांजपे यांनी पराभव केला. संसदीय कारकिर्दीचा प्रचंड अनुभव असलेल्या रामचंद्र दामोदर नाईक उर्फ राम नाईक यांना २००४ नंतर २००८ मध्ये सलग दुसऱ्यांदा उत्तर मुंबई मतदारसंघात पराभवाचा ‘सामना’ करावा लागला. पण यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शिरीष पारकर यांनी तब्बल १ लाख ४७  हजार ५०२ एवढी मते खाल्ल्यामुळे काँग्रेसचे संजय निरुपम हे लोकसभेवर निवडून गेले. उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघात शिवसेना नेते गजानन कीर्तिकर यांचा लोकसभेचा मार्ग महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शालिनी ठाकरे यांनी रोखला आणि काँग्रेसचे गुरुदास कामत हे इशान्य मुंबईतून वायव्य मुंबईत येऊनही संसदेत पोहोचले. उत्तर मध्य मुंबई हा मुंबई शहरातून उपनगराकडे सरकलेला मतदारसंघ तसा अभिनेते आणि शांतीदूत सुनिल दत्त यांच्यामुळे काँग्रेस चा बालेकिल्ला बनला होता. त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शिल्पा सरपोतदार आणि भारतीय जनता पक्षाच्या महेश राम जेठमलानी या दोघांच्या मतांची बेरीज केली तरी त्यापेक्षा जास्त म्हणजे तब्बल ३,१९,३५२ मते मिळवून प्रिया सुनील दत्त या खासदार बनल्या. दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघात मनसेच्या श्वेता परुळेकर यांच्या मुळे शिवसेनेचे सुरेश गंभीर हे खासदार होऊ शकले नाहीत. काँग्रेसच्या एकनाथ गायकवाड यांना पुन्हा संसदेत जाण्याची संधी मिळाली. दक्षिण मुंबई मतदारसंघात तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या बाळा नांदगावकर यांनी चक्क दुसऱ्या क्रमांकावर उडी मारली आणि मोहन रावले यांना तिसऱ्या क्रमांकावर ढकलले आणि मुरलीपुत्र मिलिंद देवरा खासदार झाले. उत्तर पूर्व म्हणजेच इशान्य मुंबई मतदारसंघात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शिशिर शिंदे यांच्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या किरीट सोमैया यांच्या ऐवजी राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय दिना पाटील हे खासदार झाले. असाच निकाल ठाणे, भिवंडी, पुणे आणि नाशिक येथेही लागला आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार निवडून जरी आले नाहीत तरी त्यांनी शिवसेना भाजपच्या नेत्यांसाठी दिल्ली दरवाजा बंद करण्याचे कार्य २००९ साली केले. आताही ‘यार्ड’ मध्ये असलेल्या ‘इंजिना’ धसका सत्ताधाऱ्यांना आणि दिलासा विरोधकांना मिळाला आहे. इंजिनाची आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे हेच ‘इंजिन’ काही वर्षापूर्वी डॉ. मनोहर गजानन जोशी यांनी दादरच्या एका मतदारसंघात निवडणूक चिन्ह म्हणून घेतले होते आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी इंजिनावर शिक्का मारा, असे आवाहन मतदारांना केले होते.

 फेरनिवड न होण्याची परंपरा एकनाथ गायकवाड यांनी मोडली !    

मुंबई शहर आणि उपनगर मिळून लोकसभेचे सहा मतदारसंघ येतात. मतदारसंघांची पुनर्रचना होण्यापूर्वी मुंबई शहरात तीन आणि मुंबई उपनगरात तीन असे मतदारसंघ होते. मतदारसंघांच्या पुनर्रचनेनंतर दक्षिण मुंबई आणि दक्षिण मध्य मुंबई असे दोन तर उत्तर मध्य, उत्तर पश्चिम, उत्तर पूर्व आणि उत्तर मुंबई असे चार म्हणजेच दक्षिण शहरात तर उत्तर उपनगरात असे सरळसरळ दोन भाग झाले. १९७७ सालापासून मध्य मुंबईकडे पाहिले तर त्यात एक मतदारसंघ असा आपल्याला आढळून येतो की त्या मतदार संघात एक व्यक्ती दुसऱ्यांदा या मतदारसंघाने लोकसभेवर निवडून पाठविलेली नाही. हां केवळ एकच व्यक्ती दुसऱ्यांदा निवडून आली ती म्हणजे काँग्रेसचे एकनाथ गायकवाड.. एकनाथ गायकवाड हे मतदारसंघ पुनर्रचना होण्यापूर्वी २००४ साली डॉ. मनोहर गजानन जोशी यांचा पराभव करुन पहिल्यांदा लोकसभेवर निवडून आले होते. त्यावेळी त्यांचा मतदारसंघ होता. उत्तर मध्य मुंबई आणि मग मतदारसंघ पुनर्रचना झाल्यावर ते दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधी झाले. परंतु २०१४ साली शिवसेनेचे राहुल शेवाळे हे दक्षिण मध्य मुंबई चे खासदार झाले. १९७७ सालापासून आपण माहिती घेण्याचा प्रयत्न केला तर त्यात आपल्याला मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्या अहिल्याताई रांगणेकर (१९७७-१९८०), जनता पक्षाच्या प्रमिलाताई दंडवते (१९८०-१९८४), काँग्रेसचे शरद दिघे (१९८४-१९८९), शिवसेनेचे विद्याधर गोखले (१९८९-१९९१), पुन्हा काँग्रेसचे शरद दिघे (१९९१-१९९६), शिवसेनेचे नारायण आठवले (१९९६-१९९८), रिपब्लिकन पार्टी ऑॅफ इंडियाचे रामदास आठवले (१९९८-१९९९), शिवसेनेचे डॉ. मनोहर जोशी (१९९९-२००४),काँग्रेसचे एकनाथ गायकवाड (२००४-२००९), काँग्रेसचे एकनाथ गायकवाड (२००९-२०१४), शिवसेनेचे राहुल शेवाळे (२०१४-२०१९) असे खासदार मध्य मुंबई मधून लाभले आहेत. पाहू या आता राहुल शेवाळे हे एकनाथ गायकवाड यांची बरोबरी करतात की एकनाथ गायकवाड हे त्रिविक्रमी होतात. यासाठी आपल्याला २३ मे २०१९ पर्यंत थांबावे लागेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!