डॉ.श्रीदत्त राऊत यांना श्री मोरया पुरस्कार जाहीर

वसई : उत्तर कोकणातील (जिल्हा पालघर) गडकोटांच्या संवर्धनासाठी व इतिहास संशोधनासाठी गेली तब्बल १७ वर्षे सातत्याने मोहिमा आयोजित करून एक आदर्श दुर्गसंवर्धन चळवळ निर्माण करणारे किल्ले वसई मोहिमेचे डॉ.श्रीदत्त राऊत यांना यंदाच्या ‘श्री मोरया पुरस्काराने’ सन्मानित करण्यात येणार आहे. सदर पुरस्कार चिंचवड देवस्थान ट्रस्ट पुणे यांच्या वतीने देण्यात येणार आहे.

श्री मोरया गोसावी यांच्या संजीवन समाधी दिनानिमित्त प्रतिवर्षी मार्गशीर्ष महिन्यात चिंचवड देवस्थान ट्रस्ट, पिंपरी चिंचवड महानगरपालिका व समस्त ग्रामस्थ चिंचवड यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य महोत्सव सोहळा आयोजित केला जातो. यावर्षीचा हा ४५८वा संजीवन समाधी सोहळा ठरणार आहे. या सोहळयाच्या पूर्व संध्येस विविध क्षेत्रात उल्लेखनीय व विशेष कामगिरी करणाऱ्या मान्यवरांना ‘श्री मोरया पुरस्कार’ देऊन विशेष सन्मान करण्यात येणार आहे. दिनांक १६ डिसेंबर २०१९ रोजी सदर पुरस्कार वितरण चिंचवड येथील श्री.मोरया गोसावी मंदिराजवळील पटांगणात होणार आहे.

श्रीदत्त राऊत यांनी गेली अनेक वर्षे सातत्याने केलेल्या गडकोट श्रमदान मोहिमा, संशोधनपर लेखमाला, इतिहास संशोधनपर व्याख्याने, मोडी लिपी प्रशिक्षण वर्ग, गडकोट पालखी उत्सव, गडकोट विजयदिन परंपरा, संशोधनपर पुस्तके इत्यादी असंख्य माध्यमातून निर्माण झालेली सकारात्मक ऊर्जा अनेक दुर्गमित्रांना प्रेरक ठरली आहे.

गेली अनेक वर्षे आयुष्यातील अत्यंत मोलाचा वेळ गडकोटांची सेवा करण्यात व्यतीत केलेल्या प्रत्येक दुर्गमित्राला हा पुरस्कार अर्पण आहे. मी संकल्प केलेल्या श्री सिध्दीविनायक अणजुर भिवंडी येथून ते पुणे मोरगाव असा पायी प्रवास करताना प्रत्येक पावलावर साथ करणाऱ्या प्रत्येक किल्ले वसई मोहिमेच्या प्रतिनिधींचा व असंख्य दुर्गमित्रांचा हा गौरव आहे.!!

विशेष उल्लेखनीय बाब : ऐतिहासिक मोहीम

१७ व्या शतकात गंगाजी नाईकांच्या पराक्रमाची झेप व उत्तर कोकणातील गडकोटांची प्रतिकूल परिस्थिती या बाबतीत जागृती करण्यासाठी किल्ले वसई मोहिमेचे इतिहास अभ्यासक डॉ.श्रीदत्त राऊत यांनी दिनांक ८ एप्रिल ते १७ एप्रिल २०१८ या कालखंडात श्री सिध्दीविनायक अणजुर भिवंडी येथून ते पुणे मोरगाव असा पायी प्रवास पूर्ण केला होता. तब्बल ३४२ कि.मी हा डोंगर, नद्या, घाट, गावेखेडी, किल्ले समावेश करणारा हा प्रवास श्रीदत्त राऊत यांनी १० दिवसांत पूर्ण केला होता. या प्रवासात इतिहासातील गंगाजी नाईकांनी निवडलेल्या व साष्टीच्या बखरीत नमूद असलेला अणजुर, कर्जत, खंडाळे घाट, चिंचवड, पुणे, जाधवरायाची वाडी, जेजुरी, मोरगाव असा प्रवास श्रीदत्त राऊत पायी चालत करीत वसई रणसंग्रामास एक अनोखी मानवंदना दिली. तसेच या मोहिमेत पालघर जिल्ह्यातील गडकोटांची प्रतिकूल परिस्थिती, गडकोटांची दुरावस्था, गडकोटांवर दारूबंदी, प्लास्टिक बंदी इत्यादीं प्रश्नांबाबत जागृती करून एक अनोखा संदेश दिला होता. गंगाजींच्या मोरेश्वराच्या प्रयाणाची यंदा २०१८ साली तब्बल ३०० वर्ष पूर्ण झाली. या अखंड पायी प्रवासात राऊत यांनी ७० हुन अधिक श्री महागणपती, श्री आदिशक्ती, श्री शंभू महादेव, श्री हनुमान इत्यादी देवतांच्या शिवकालीन, पेशवेकालीन मंदिरास अभ्यासपूर्ण भेटी दिल्या. विशेष म्हणजे या मोहिमेच्या पायी प्रवासात त्यांच्याकडे गावागावातील ऐतिहासिक स्थळे व इतिहास यांचे इतिहास व छायाचित्रे यांचे विशेष संकलन झाले. यातच काही डोंगरात भर उन्हात राऊत यांनी एकटयाने केलेला कष्टमय प्रवास अत्यंत खडतर होता. राऊत यांच्या प्रवासात अंजुर येथे पूजण्यात आलेला श्री सिध्दिविनायक मोरया गणपती मूर्ती त्यांच्या अखंडपणे सोबत होती. इतिहास प्रसिध्द गावातील स्थानिक ग्रामस्थ, ऐतिहासिक घराणी, मंदिर देवस्थाने इत्यादी ठिकाणी राऊत यांच्या भर उन्हाळयातील संकल्पाच्या विशेष उपक्रम मोहिमेचे अभिनंदन करण्यात आले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!