डोंबिवलीच्या सांस्कृतिक नगरीत श्रीनिवासांचा शाही विवाह

  • श्रीनिवासांचा शाही विवाह, मंगल महोत्सवाचे अडीच लाख भाविक उपस्थीत राहणार
  • शिवसेना पक्षप्रमूख उद्धव ठाकरे प्रमूख अतिथी म्हणून उपस्थीत राहणार
वसई (मनिष म्हात्रे)   :  1 डिसेंबर  रोजी डोंबिवली पूर्व येथील सावळाराम महाराज क्रीडा संकूलात श्रीनिवासा कल्याण महोत्सव अर्थात तिरूपती बालाजी यांचा शाही  विवाह सोहळा तसेच  महापूजा-महाप्रसाद अशा भव्य  महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.महोत्सवासाठी राज्यभरातून जवळपास दोन लाख भावीक येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.यावेळी मंगल महोत्सवाचे यजमानपद खासदार डाॅ.श्रीकांत शिंदे व आमदार सुभाष भोईर हे भूषविणार असून शिवसेना पक्षप्रमूख उद्धव ठाकरे हे प्रमूख अतिथी म्हणून उपस्थीत राहणार आहेत.
तिरुपती बालाजी हे सौंदर्य आणि ऐश्वर्याचे प्रतिक असलेले जागृत दैवत आहे. संपूर्ण जगभरात तिरुपती बालाजींचे भाविक आहते. अनेक भाविकांना वेळ – काळ – पैसा गर्दी अशा अनेक कारणामुळे इच्छा असूनही तिरुपती येथे जाऊन श्री बालाजींचे दर्शन घेणे शक्य होत नाही. भाविकांची ही अडचण तिरुमला तिरुपती देवस्थानाने लक्षात घेवून विविध ठिकाणी तिरुपती बालाजी दर्शन सोहळा आयोजित करण्यास सुरवात केली आहे.श्रीनिवास मंगल महोत्सवाचे हे सहावे वर्ष असून यापूर्वी तिरुमला तिरुपती देवस्थानने विरार, वसई, मीरारोड, बोईसर, नालासोपारा आदी ठिकाणी मंगल महोत्सवाचे भव्यदिव्य आयोजन केले होते. यावर्षी श्रीनिवास मंगल महोत्सवाच्या आयोजनाचा मान डोंबिवली परिसराला मिळाला आहे. शनिवार दि. 1 डिसेंबर 2018 रोजी ह. भ. प. सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुल, पेंढारकर कॉलेज, घरडा सर्कल, डोंबिवली (पूर्व) येथे सदर मंगल सोहळा संपन्न होणार आहे.
तिरुमला तिरुपती देवस्थान आणि ओम श्री साईधाम मंदिर ट्रस्ट यांच्या माध्यमातून श्रीनिवास मंगल महोत्सवाच्या सोहळ्यात तिरुपती बालाजी येथे नियमित होणारे पूजा अर्चा व इतर धार्मिक विधी संपन्न होणार आहेत. सोहळ्यामुळे आपल्या परिसरातील श्री तिरुपती बालाजींच्या दर्शनापासून वंचित राहिलेल्या भाविकांना श्री तिरुपती बालाजींच्या दर्शनाचे भाग्य लाभणार आहे.
या मंगल महोत्सवामध्ये देवदेवतांचे फोटो असलेले विद्युत देखावे डोंबिवली व कल्याण परिसरात विविध ठिकाणी लावण्यात येणार आहेत त्याचप्रमाणे घरडा सर्कल तसेच डोंबिवली स्टेशन पर्यंत विद्युत रोषणाई करण्यात येणार आहे. हे सर्व देखावे व विद्युत रोषणाई चेन्नईहून येणार आहे.  दि. 30 नोव्हेंबर रोजी सायंकाळी वाजता तिरुपतीहून आणलेल्या श्रीनिवास, श्रीपद्मावती व भूदेवीच्या मुर्त्या  कल्याणफाटा मार्गे बालाजी मंदिर सागर्ली येथे आणण्यात येणार आहेत. या मंगल महोत्सवामध्ये शनिवार दि.1 डिसेंबर 2018 रोजी सकाळी सुप्रभात, तोमाला सेवा, सकाळी 10 ते 12 वाजता कुंकुमार्चनम, तसेच तुलाभार करण्यात येणार आहे. यावेळी या वर्षामध्ये विवाह झालेल्या सुमारे एक हजार जोडप्यांना अभिषेकाचा मान मिळणार आहे. दुपारी 3.30 ते 6 पर्यंत श्रीनिवास मंगल महोत्सवाची भव्य शोभायात्रा विठ्ठल मंदिर आयरे रोड पासून स्वामी विवेकानंद शाळा – दत्त नगर चौक –संगीतावाडी मार्गे मानपाडा रोड – चार रस्ता – टिळक चौक – शेलार नाका ते घारडा सर्कल पासून सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुल अशी डोंबिवलीच्या सांस्कृतिक परंपरेला शोभणारी काढण्यात येणार आहे.
या शोभायात्रेमध्ये विविध जाती – धर्माचे नागरिक मोठ्या प्रमाणावर सहभागी होवून आप आपल्या संस्कृतीचे दर्शन घडविणार आहेत. या शोभायात्रेमध्ये वारकरी संप्रदाय, भजनी मंडळे, उत्तरभारतीय समाज, दक्षिणेतील सर्व समाजातील बांधव सहभागी होणार आहेत. त्यामध्ये तेलगु, कानडी, केरळीय, मल्याळी समाजातील बांधव सहभागी होणार आहेत. त्याचप्रमाणे बार्शीहून 100  बाळ वारकरी, यक्ष ग्रुप तर्फे विविध बहुरूपी कलाकार सहभागी होणार आहेत. ढोल पथक, लेझीम पथक, नाद स्वरमचे तुतारीवाले शोभायात्रेची भव्यता वाढविणार आहेत. त्याचप्रमाणे वारकरी संप्रदाय, श्रीसदस्य, आयप्पा सेवा मंडळे, जगतगुरू नरेंद्राचार्यजी महाराज शिष्यगण, धन निरंकारी सेवेकरी, अनिरुद्ध बापू शिष्यगण त्याचप्रमाणे विविध जाती धर्मातील भाविक सहभागी होणार आहेत.
 
या मंगल महोत्सवामध्ये सायंकाळी 6 ते 9 वाजता तिरुपती महाराजांचा भव्य दिव्य विवाहसमारंभ संपन्न होणार आहे. याकरिता देखावा तसेच विद्युत रोषणाई तिरुपती देवस्थानमध्ये ज्या प्रमाणे करण्यात येते त्याचप्रमाणे विद्युत रोषणाई करण्याकरिता   तिरुपतीहून कलाकार येणार आहेत. या विवाह समारंभांकरिता तिरुपतीहून ब्राम्हण, भटजी येणार आहेत. तिरुपती महाराजांचा विधिवत विवाह सोहळा संपन्न होत असताना जोडप्यांना अभिषेकाचा मान देण्यात येणार आहे.   
 
या मंगल महोत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे सायंकाळी 7 वाजल्यापासून महाप्रसाद देण्यात येणार आहे. याकरिता विविध 14 प्रकारचे पक्वान्न महाप्रसादामध्ये ठेवण्यात आलेले आहेत. याकरिता सुमारे 400 आचारी उडपीहून येणार आहेत. त्याचप्रमाणे तिरुपती देवस्थानमार्फत दीड लाख लाडू प्रसादाकरिता मंजूर झालेले आहेत. त्याचप्रमाणे 30 हजार कंकण (धागे) मंजूर झालेले आहेत. मंगल महोत्सवाच्या पूजेचा स्टेज, फुले बेंगलोरहून येणार आहेत.
 
श्रीनिवास मंगल महोत्सवाच्या कार्यक्रमाची उत्सुकता सर्वांनाच असून या श्रीनिवास मंगल महोत्सवाच्या कार्यक्रमास शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. तसेच विविध क्षेत्रातील विविध मान्यवर हा अनुपम सोहळा पाहण्याकरिता उपस्थित राहणार आहेत. हा मंगल महोत्सव संपन्न करण्याकरिता सर्वच समाजातील नागरिकांनी पुढाकार घेतलेला आहे. या मंगल महोत्सवामध्ये सुमारे अडीच लाख भाविक  उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!