…तर नायगाव पूर्व-पश्चिम उड्डाणपूलाचा मुहूर्त कार्यक्रम रोखणार – जूचंद्र रिक्षा चालक-मालक संघटनेचा इशारा

वसई  (प्रतिनिधी) : गेल्या काही दिवसांपासून नायगाव पूर्व-पश्चिम जोडणाऱ्या उड्डाणपुलाचा मार्ग डिसेंबर २०१८ पर्यंत मोकळा होण्याची चिन्हे असली तरी जूचंद्र रेल्वे स्थानकातीवर वाढत्या रेल्वे वाहतुकीमुळे रस्ते वाहतूकीची कोंडी होण्याचा धोका आहे. त्यामुळे जोपर्यंत रेल्वेरूळावर जूचंद्र परिसरात उड्डाणपुल बांधण्याचे काम सुरू होत नाही तोपर्यंत नव्या पुलाचे उद्घाटन होऊ देणार नाही असा इशारा जूचंद्र रिक्षा चालक-मालक संघटनेने दिला आहे.

नायगाव पूर्व-पश्चिम हा पूल सध्याच्या वाढत्या वाहतुकीचा पसारा पाहता भविष्यात सुवर्णमध्य ठरणार आहे. पुलाचा उद्घाटनाचा मुहूर्त डिसेंबर महिन्याचा असला तरी पुलाचे काम मार्गी लागण्याबरोबरच जूचंद्र परिसरातील रेल्वे रूळांवरील उड्डाणपुलाचा प्रश्न मार्गी लागावा यासाठी परिसरातील नागरिकांनी प्रशासनाकडे मागणी केली आहे. नायगाव पूर्व-पश्चिम जोडणार्‍या पुलाचे काम सध्या अंतीम टप्प्यात आहे. डिसेंबर २०१८ पर्यंत पुलाचे काम पूर्ण होऊन तो वाहतुकीस खुला होण्याचे संकेत एमएमआरडीए प्रशासनाकडून मिळत आहेत. तत्पूर्वी सदर पुल वाहतुकीसाठी खुला झाला तर जुचंद्रवासीयांना प्रचंड वाहतुक कोंडी सामोरे जावे लागण्याची भिती व्यक्त होत आहे. जूचंद्र रेल्वे स्थानकात वाढत्या रेल्वे वाहतुकीमुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागून वाहतुकीचा खोळंबा होणार आहे. ही समस्या लक्षात घेता जूचंद्र रेल्वे फाटक उड्डाणपूलाला मंजूरी मिळाली असली तरी अजून प्रत्यक्ष कामास सुरूवात झालेली नाही. त्यामुळे येत्या काही महिन्यांत उड्डाणपुलावरून वाहतुक सुरू झाल्यास प्रचंड वाहतुककोंडीला वाहनचालकांना आणि नागरिकांना सामोरे जावे लागेल.  पुलाच्या उद्घाटनाला तुर्तास जूचंद्र रिक्षा चालक-मालक संघटनेने विरोध केला असून जोपर्यंत येथील होणार्या वाहतुक कोंडीवर प्रशासन योग्यरित्या उपाय योजना करत नाही तोपर्यंत उड्डाणपुलाचा मुहूर्त कार्यक्रम होवू देणार नसल्याचा इशारा रिक्षा चालक-मालक संघटनेचे अध्यक्ष एकनाथ पाटील यांनी दिला आहे.

जूचंद्र येथे बापाणे ते नायगाव असा मुख्य रस्ता आहे. वसई-दिवा लोहमार्ग येथूनच गेला आहे. त्यामुळे या ठिकाणी रेल्वे फाटक बसवण्यात आले आहेत. ज्यावेळी रेल्वेगाडी येते, तेव्हा फाटक बंद होते, अशावेळी वाहतुककोंडी होते. दिवसातून ३० ते ४० वेळा फाटक बंद होते. अशात नायगाव पूर्व-पश्‍चिम उड्डाणपुलाचे उद्घाटन झाले तर त्याचा फटका वाहनचालक आणि नागरिकांना सोसावा लागेल, त्यामुळे एमएमआरडीए प्रशासनाने आधी फाटकाजवळ उड्डाणपुलाचे प्रस्तावित काम पूर्ण करण्यास प्राधान्य देण्याची मागणी सदर संघटनेने केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!