तर सुखावेल विठुराया … सृष्टी गुजराथी

यंदा पंढरी दुमदुमणार नाही. चंद्रभागेच्या तीरावर ओसंडून वाहणारी गर्दी दिसणार नाही. वातावरणात निरव शांतता असेल. प्रथा-परंपरा पाळल्या जातीलही, पण त्याला तितकंसं महत्त्व नाही. ते उगीच आपले नित्याचे सोपस्कार. त्यापलीकडे जाऊन आज विशेष काही घडायला हवं. तरच पंढरीचा पहिला वारकरी, कुणाचा विठुराया – तर कुणाची विठाई मनोमन सुखावेल.

वाचायला थोडं विचित्र वाटेल. आधीच कोरोनाच्या भीतीने धर्मस्थळांची कवाडं बंद झालीत. संकटकाळी जिथे नवस-सायास करायला गर्दी व्हायची ती सगळी ठिकाणं शांत झालीत. अशावेळी भक्तांविना भगवंत काय कामाचा? असंही वाटू शकेल क्षणभर. पण त्यात काही तथ्य नाही. चराचरात व्यापलेल्या परमेश्वराला एका मूर्तीत सीमित बघण्याचा करंटेपणा आपण कशाला करायचा? त्यापेक्षा या निमित्ताने का होईना पण आपणच आपल्या समजुती तपासून पाहायला नको का?

पंढरपूरचा विठोबाच मुळात भक्त पुंडलिकाच्या भेटीसाठी युगानुयुगे ताटकळत उभा असलेला देव. पुंडलिकाला काही आई-वडिलांच्या सेवेतून उसंत मिळत नाही, आणि आपल्या या सावळ्या विठ्ठलाला विटेवरून खाली उतरायची सोय नाही. भक्ताच्या बंधनात अशा प्रकारे बद्ध असलेल्या – विठ्ठलाच्या दर्शनासाठी हजारोंच्या जथ्थ्याने कामधाम मागे सोडून गर्दी करावी, हा विरोधाभासच नाही का? भक्ती खरी असेल. अंतरातून हाक उमटली असेल, तर तोच धावत येईल आपल्यापाशी. आणि तसे नसेल तर हजारो मैल चालत जाऊन तरी काय साधणार आहोत आपण?

‘कांदा मुळा भाजी । अवघी विठाई भाजी ।।’ म्हणणारे सावता माळी असोत, वा थेट विठू माऊलीलाच दळण-कांडण करायला लावणारी नामयाची जनी असो; आपल्या संत परंपरेने कर्मातील भक्तीच अधोरेखित केली आहे. आपले कर्तव्य-कर्म निष्ठेने करीत जावे, तेच आपले हरीभजन. निरंतर सचोटीचा, सहृदय व्यवहार हीच उपासना. बाकी कर्मकांडाची गरजच काय? हाच तर त्या गाथेचा न बुडणारा मतितार्थ.

दुर्दैवाने आज प्रतिकांचीच प्रतिमा इतकी मोठी झाली आहे की, त्यामागचं तथ्य नजरेआड व्हावं. ज्यांनी आयुष्यभर बुवाबाजी – भोंदूगिरीवर ओरखडे ओढले, पुढे जाऊन त्यांनाच चमत्काराचे ग्रहण लागले. विचार मागे पडला आणि व्यक्तिमाहात्म्य वाढले. त्याबद्दल कधीतरी थोडे थांबून विचार करण्याची गरज होती. आज काळाच्या फटकाऱ्यात वारी भोवतीचा कोलाहल थोडासा शांत झालाय. ही कदाचित आपल्यासाठी अंतर्मुख होण्याची एक संधीच आहे.

वारी ही तशी शतकानुशतकांची परंपरा. ‘ज्ञानदेवें रचिला पाया। तुका झालासे कळस।’ अशी भागवत संप्रदायाची व्याप्ती सांगितली जाते. पण वारी तर त्याही आधीपासून प्रचलित आहे. स्वतः ज्ञानेश्वरांचे वडीलसुद्धा वारीला जात असल्याचे सांगितले जाते. पण ती वारी निराळी होती. प्रपंचापोटी जागोजागी विखुरलेल्या भावंडांनी घराच्या ओढीने यावे, इतकी सोज्वळता त्यात होती. पंढरीचा वास, चंद्रभागेस्नान, आणिक दर्शन विठोबाचे’, बस्स इतकंच. काही मागणं नाही, किंवा दाखवणंही नाही. प्रवासाच्या फारशा सुखसुविधा नसतानाही ही वारी चालत राहिली. कारण, ही वारी जेवढी पाऊल वाटांनी चालत गेली, त्याहून कैकपटीने अधिक ती अंतःकरणातून उजळत राहिली. ‘देव भावाचा भुकेला’, त्यात कसा खंड पडणार?

अलीकडे मात्र वारीचा इव्हेन्ट झाला होता. आजही मनातून वारी चालणारे अनेक असतील, पण त्यांच्यापेक्षा बाजारबुणग्यांचा जास्त कोलाहल झाला होता. ‘एक तरी वारी अनुभवावी’ म्हणतात, पण इथे नेमका तो ‘अनुभूतीचा धागा’च विसविशीत होऊ लागला होता. भक्तीचं नुसतंच प्रदर्शन मांडण्याकडे अनेकांचा कल होता. प्रपंचात अनेकदा ऐहिक बडेजावाला भुलून धावत सुटतोच आपण, पण परमार्थातही तसेच वागून कसे चालेल? कदाचित म्हणूनच विठुरायाने यंदा पंढरीचे दरवाजे लावून घेतले. पण म्हणून त्याने आपल्याकडे पाठ फिरवली, असा याचा अर्थ होत नाही. ‘संगे गोपाळांचा मेळा’ घेऊन उभा असलेला लेकुरवाळाच तो. त्याला माहीत आहे, कुणाला कसं जागं करायचं? पाठीत धपाटा घालते, म्हणजे आईचं प्रेम आटलं असं समजण्याचं कारण नाही. पंढरपूरच्या देवळाचे द्वार बंद असेल, पण चराचरातून तो आपल्या साथीस आहे. आपल्या आजूबाजूलाच विखुरलेला आहे, म्हणून तर आपण अजूनही टिकून आहोत. आता फक्त आपण त्याला ओळखू शकलो, म्हणजे अंतरीची वारी सफल झाली समजायचं. मग तो ही सुखावेल, नाही का?

– सृष्टी उन्मेष गुजराथी 
९८६७२९८७७१

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: