तळपत्या उन्हात तेजस्वी महामानवाला हजारोंचे अभिवादन !

नालासोपारा : भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 128 व्या जयंती निमित्त आज नालासोपाऱ्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शुर्पारक मैदानावरील ‘बुध्दरुप’ उपासना केंद्राजवळचा कार्यक्रम मोठा होता. शेकडो आंबेडकरी लहान थोर या जयंती कार्यक्रमात सहभागी झाले होते. दुपारचे सत्र बौध्द धर्माच्या परंपरेप्रमाणे विधीवत् पार पडले. कडक उन्हात सुध्दा आंबेडकरी जनतेचा उत्साह व महामानवावरील श्रध्दा उल्लेखनीय होती.

आजोजन मंडळाचे अध्यक्ष व माजी नगरसेवक नरेश जाधव व त्यांचे सहकारी हा जयंती उत्सव सोहळा यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेत आहेत. संध्याकाळ व रात्रीच्या सत्रात जाहीर सभा, गुणगौरव व मनोरंजनाचा खास कार्यक्रम सादर केला जाणार आहे. डेपो रोडवर पोलीस अधिकाऱ्यांना मान. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा कार्यक्रम ‘बौध्द पंचायत समिती’ शाखा क्र.768 च्या वतीने आयोजित करण्यात आला होता. या ठिकाणी सुध्दा रिवाजाप्रमाणे बुध्दध्वज वंदना, तथागत गौतम बुध्द पुतळा व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन, दीपप्रज्वलन करण्यात आले. यंदा हा मान पोलीस उप निरिक्षक सोनवणे, शिंदे व पत्रकार रमाकांत वाघचौडे यांना देण्यात आला. प्रभाग समिती सभापती अतुल साळुंखे हे प्रमुख पाहुणे म्हणून या वेळी उपस्थित होते.

याच ठिकाणी सुरेंद्र खरात यांचे व्याख्यान व महिलांसाठी प्रश्नमंजुषा अशा कार्यक्रम सादर करण्यात आला. जयंती उत्सव सोहळा समितीचे अध्यक्ष सुनिल जाधव,सरचिटणीस संतोष मोरे, युवा प्रतिनिधी किरण बनसोडे व सहकारी येथे परिश्रम घेत आहेत.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक व शैक्षणिक संस्थेच्या वतीने हा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या सोहळयात भदंत मैत्रीयघोष आयुपाल थेरो यांनी विज्ञानवाद व बाबासाहेबांचे विचार या विषयावर व्याख्यान दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!