तावडे गुरुजींची ‘शाळा’…! – जयंत करंजवकर

मा. नामदार तावडे गुरुजी, 
स.न.वि.वि.
पत्रास कारण की, माझा मुलगा पत्रकार होण्यासाठी तो पत्रकारितेचे शिक्षण घेत आहे. आपण त्याच्या महाविद्यालयात आलात, त्यावेळी त्याने स्वतः ची अक्कल दाखविण्याचा प्रयत्न केला. मी ते टीव्हीवर पाहिले आणि माझी तळपायाची आग  मस्तकात गेली. राज्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयाचे आपण महागुरू आणि या गधड्याला अक्कलच नाही ?  त्याने तुम्हाला सर्व विद्यार्थ्यांसमोर प्रश्न विचारला. उच्च शिक्षण घेणाऱ्या गरीब विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देणार का ? खरं म्हणजे मी समोर असतो तर त्याच्या कानाखालीच महाराष्ट्राचा नकाशा काढला असता… 
तावडेगुरुजी, बघा आपण राज्याचे शिक्षण मंत्री, परंतु मी आपणास साहेब बीहेब न म्हणता तावडे गुरुजी बोलतो. मी ही संघामध्ये होतो. संघाने आमच्यावर गुरुजनांचा सन्मान करण्याचे डोक्यात चांगले फिक्सड केले आहे. उच्चशिक्षण घेणा-या गरीब विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण द्यायचं म्हणजे आपल्या तिजोरीवर केवढा बोजा हो, याचं या मुलांना काहीच कळत नाही. सगळं फुकटात पाहिजे. तुमची काय परिस्थिती होती का शिक्षण घ्यायची ? पण आपण परिस्थितीवर मात करत, पदवी कोणत्याही युनिव्हर्सिटीची  का असे ना, पण पदवी मिळवली ना आपण ? त्यामुळे आज राज्याचे शिक्षणमंत्री झालात ! तुमचंही चुकलं तावडेगुरुजी, तुम्ही कोणत्या त्या ज्ञानेश्वर विद्यापीठात पदवी घेतली त्याची माहिती त्या मुलांना द्यायला पाहिजे होती.  जाऊ द्या ते ! तुमच्या पाठीमागे किती व्याप हो ? व्याप आहेत पण व्यापमसारखे प्रकार तुमच्याकडून घडले नाहीत आणि तो तुमचा स्वभाव नाही !  बरं, विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण दिले तर ते प्रायव्हेट क्लासेसमध्ये जाणारच. फार हुशार मुले आहेत आजकालची ! सरकारला शेंडी लावून आपल्या पदरात  फुकट काय ते मागून घ्यायचे… हे त्यांना कळतं. याच विद्यार्थ्यांकडे मोबाईल असतात. मोबाईल चार्जिंग करायला पैसे असतात, मात्र फी भरायला पैसे नाहीत. (नाथाभाऊंनी शेतक-यांना खडसावून सांगितले होते, ते आठवत असेल तुम्हाला). तुम्ही वेळीच त्यांना झाडलंत ते बरे केलं.  शिक्षण मोफत देऊ, पण शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी लागेल … हे सुनावले ते बरे केलंत.  या देशात शेतकरीच गरीब  नाहीत, अनेक जण गरीब आहेत,  तावडेगुरुजी  हे  विद्यार्थी फारच आगाऊ  व चलाख दिसतात. लोकसभा  निवडणूक जवळ आली आहे, काहीतरी पदरात पाडून घ्यावे हे लक्षात घेऊन तुम्हाला बोलतं करण्याचा त्यांचा डाव  तुम्ही वेळीच उधळलात. नाहीतर आजकाल कोणीही मंत्री सत्तेत आहे म्हणून वाटेल ते आश्वासन देतात. आपणही काही विनोदाने न घेता सरळ सांगून टाकलंत की उच्चशिक्षण घेणाऱ्या गरीब मुलांना मोफत शिक्षण देणार नाही. 
मा. तावडेगुरुजी, तुम्ही तर कमाल केलीत ! माझा मुलगा  आपल्याला प्रश्न विचारत असतांना व्हिडीओ शूटिंग एक विद्यार्थी करत होता. काय तुमचं बारीकसारीक लक्ष असतं हो ?  तुमच्यातला मंत्री जागा झाला. पोलिसांना तुम्ही त्या विद्यार्थ्याला म्हणजे माझ्या मुलाला अटक करण्याचे फर्मान काढले. प्रथम मुलांना तुम्ही विनोद करता की काय असं वाटलं. जेव्हा बखोटी पकडून त्यांना गाडीत कोंबले, तेंव्हा विद्यार्थ्यांना त्यांचं भविष्य आठवू लागले.  पोलीस केस झाली तर नोकरी मिळणे कठीण होईल, असा विचार त्यांच्या डोक्यात घोंगावू लागला, असं माझ्या मुलाने घरी आल्यावर सांगितले. पण त्याचवेळी त्यांच्यावर केस टाकू नका असे तुम्ही फर्मान काढल्यावर त्या मुलांचा जीव भांड्यात पडला. काय सांगू तावडे गुरुजी, आता माझा मुलगा आणि त्याचे विद्यार्थी मित्र कॉलेजमध्ये तावडे काय कोणत्याच मंत्र्यांच्या विरोधात बोलायची हिम्मत करायची नाही, असं ठरवलंय माझ्या मुलाने, अगदी काकुळतीला येऊन तो आला सांगत होता. मंत्र्यांविरोधात बोललो तर शहरी नक्सली म्हणून चार्जेस लावले जातील किंवा देशद्रोही म्हणून आरोप ठेवले जातील, अशी त्यांना भीती वाटू लागली आहे. असा दरारा राहिला तरच सगळे ताळ्यावर येतील आणि तरच सरकार चालवता येईल ? असे मला वाटते. ‘सर्वात आधी देश, नंतर पक्ष सर्वात शेवटी स्वतःला स्थान’, असे आपल्या भारतीय जनता पक्षाचे धोरण आहे आणि त्याचं तुम्ही पालन करता आहात, अभिनंदन तुमचं !
आता माझा मुलगा थोडा कुठे लाईनवर आला आहे.  घरी आल्यावर पाठीवरची बॅग काढून नीट टेबलावर ठेवतो (पूर्वी तो बॅग बेडवर टाकून झोपायचा आता तसं काही करत नाही) आणि आईला विचारतो ‘आई, जर माझी पाठ शेकवते का ?’… मग ती माऊली त्याची पाठ शेकवता शेकवता चार गोष्टी शिकवते, आणि माझं पोर तिला म्हणतो ‘आई, काही तरी विनोद करू नकोस ?…’ त्यावेळी आम्ही सर्वजण  मोठ्याने न हसता मुका मार खाल्ल्यासारखं गालातल्या गालात  हसत असतो…  
पत्र नजरेखालून गेलं तर माझ्या लेकरासाठी दोन शब्द लिहा. बरं वाटेल त्याला म्हणून ही विनंती. 
आपला…..           
गाडीत कोंबून ठेवलेल्या मुलाचा बाप

जयंत करंजवकर (ज्येष्ठ पत्रकार)
(jayant.s.karanjavkar@gmail.com/8369696639).                     

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: