‘दर्पण’कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या कर्तृत्वाला साजेसे स्मारक मुंबईत व्हावे – रविंद्र बेडकिहाळ

१९ व्या शतकाच्या सुरुवातीस ब्रिटीश राजवटीच्या काळातील मुंबई इलाख्यात (महाराष्ट्र, गुजराथ व काही कर्नाटक भाग) सामाजिक व धार्मिक सुधारणेंचे पहिले समाज प्रबोधनकार म्हणून मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या कार्याची नोंद महाराष्ट्राच्या इतिहासात अधोरेखित आहे.

अवघ्या ३४ वर्षांच्या आयुष्यात (१८१२ ते १८४६) बाळशास्त्रींनी मुंबई इलाख्याच्या प्रत्येक सुधारक चळवळीत पहिलेपणाचा मान मिळविला होता. पहिल्या मराठी ‘दर्पण’ वृत्तपत्राचे संपादक, पहिल्या मराठी ‘दिग्दर्शन’ मासिकाचे संपादक, पहिले भारतीय पुरातत्त्व संशोधन व त्यावरील लेखन, ब्रिटीशांनी स्थापन केलेल्या शिक्षण संस्थेचे पहिले पूर्णवेळ भारतीय कार्यवाह, शिक्षक, प्राध्यापक यांना प्रशिक्षण असावे ही पहिली कल्पना भारतात ब्रिटीशांना पटवून ब्रिटीशांनीच त्यासाठी स्थापन केलेल्या देशातील पहिल्या ‘अध्यापक’ प्रशिक्षण विद्यालयाचे पहिले भारतीय संचालक, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी इतिहास, गणित, मराठी भाषा, विज्ञान यासाठी क्रमिक पुस्तकांचे पहिले मराठी लेखक, ‘दर्पण’ व ‘दिग्दर्शन’ मधून तत्कालीन मराठी ग्रंथांचे समीक्षण, अभिप्राय लिहिणारे पहिले मराठी साहित्यिक, मराठी ललित साहित्याला पहिल्या मराठी वृत्तपत्रातून, मासिकातून स्थान देणारे पहिले मराठी संपादक, मुंबईत शिक्षणासाठी बाहेरुन येणाऱ्या गरीब विद्यार्थ्यांसाठी राहण्याची सोय करण्यासाठी मुंबईत पहिले विद्यार्थी वसतीगृह संस्थापक, पहिले मराठी शिक्षक, लंडन येथील जिओग्राफीकल सोसायटीच्या मुंबई शाखेचे पहिले मराठी नियुक्त पदाधिकारी, पाठभेदयुक्त ‘ज्ञानेश्वरी’चे प्रथम शिळा प्रेसवर प्रकाशन करणारे पहिले मराठी प्रकाशक, ‘बॉम्बे नेटिव्ह जनरल लायब्ररी’ हे मुंबईतील पहिले सार्वजनिक वाचनालय सुरु करणारे पहिले मराठी प्राध्यापक, कुलाबा वेधशाळेचे पहिले मराठी संचालक, लोकशिक्षण, सार्वजनिक हिताच्या प्रश्नावर निबंध वाचन, चर्चा, परिसंवाद यासाठी मुंबईत ‘नेटिव्ह इंप्रुव्हमेंट सोसायटी’चे पहिले मराठी संस्थापक अध्यक्ष, हिंदू धर्मातील अनिष्ट चालीरिती याविरुध्द आवाज उठविणारे तसेच हिंदू धर्मातून ख्रिश्चन धर्मात गेलेल्यांना परत हिंदू धर्मात आणले पाहिजे यासाठी पहिला लढा देणारे पहिले धर्मचिकित्सक, स्त्रियांना शिक्षण मिळालेच पाहिजे, मुलींची मुंज झाली पाहिजे, विधवा स्त्रियांचा पुनर्विवाह झाला पाहिजे, विधवा महिलांचे केशवपन हिंदू धर्मात उल्लेख नाही, स्त्रियांना वेदअध्ययनाचा अधिकार आहे अशा कितीतरी क्रांतिकारक विषयांना ‘दर्पण’ मधून जांभेकरांनी सर्वात प्रथम वाचा फोडली आहे.  त्यामुळे पश्चिम बंगालमधील थोर सुधारक राजा राममोहन रॉय यांच्या नंतर पश्चिम हिंदुस्थानात सामाजिक सुधारणांचे, पुरोगामी विचाराचे पहिले अग्रदूत, अशा अनेक क्षेत्रातील पुरोगामी वाटेवर महाराष्ट्राला नेणारे पहिले प्रबोधनकार व समाजसुधारक म्हणून बाळशास्त्री जांभेकरांचा उल्लेख मराठी भाषा, साहित्य व संस्कृती, महाराष्ट्राच्या इतिहासात अभिमानास्पद असाच राहील.

आज (१७ मे) हे सारं लिहिण्याचं कारण म्हणजे ‘दर्पण’कार आचार्य बाळशास्त्री जांभेकरांची १७४ वी पुण्यतिथी. महाराष्ट्राला अनेक पुरोगामी क्षेत्रातील ‘पहिले’ पण मुंबईच्या कर्मभूमीतून देणारे बाळशास्त्री जांभेकर १७४ वर्षात अद्याप मुंबईत उपेक्षितच आहेत. ‘महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी’ या संस्थेने मात्र त्यांचे मराठी वृत्तपत्रसृष्टीतील पहिले स्मारक जांभेकरांच्या जन्मगावी पोंभुर्ले, ता.देवगड, जि.सिंधुदुर्ग येथे १९९३ मध्ये पोंभुर्ले ग्रामस्थ, जांभेकर कुटुंबिय, पोंभुर्ले ग्रामपंचायत यांच्या सहकार्याने उभारले आहे. आज तेथे दरवर्षी ६ जानेवारी पत्रकार दिन ? ‘दर्पण’ पुरस्कार वितरण समारंभ, १७ मे बाळशास्त्रींची पुण्यतिथी हे कार्यक्रम नित्यनेमाने गेली २७ वर्षे होत आहेत. या स्मारकामध्ये ‘दर्पण’ सभागृह, त्यामध्ये संगमरवरी चबुतऱ्यावर ‘दर्पण’कारांचा अर्धपुतळा, आतील चारी भिंतीवर ‘दर्पण’ वृत्तपत्र व दिग्दर्शन मासिक, जांभेकरांचे चरित्रातील ठळक उल्लेख व त्यांचेबद्दलचे समकालीन मान्यवरांचे गौरवोद्गार कायमस्वरुपी चित्रबध्द केले आहेत. आणि आता सिंधुदुर्ग जिल्हा मराठी पत्रकार संघातर्फे ओरोस येथे त्यांचे राज्यशासनातर्फे भव्य स्मारक उभारण्याचे काम सुरु झाले आहे.

परंतु मुंबई ही बाळशास्त्रींची कर्मभूमी असल्यामुळे मुंबईत बाळशास्त्री जांभेकर यांच्या कर्तृत्वाचा साजेसं असे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्मारक व्हावे अशी अपेक्षा आहे. तसेच मुंबई येथील ज्या एशियाटिक सोसायटीशी पुरातत्त्व संशोधक व लेखक म्हणून बाळशास्त्रींचा संबंध आला होता त्या सोसायटीच्या सभागृहात (दरबार हॉलमध्ये) बाळशास्त्रींचे तैलचित्र लावण्यात यावे, तसेच बाळशास्त्री ज्या एल्फिन्स्टन महाविद्यालयात पहिले मराठी प्राध्यापक होते त्या महाविद्यालयास बाळशास्त्रींचे नाव द्यावे, तसेच या महाविद्यालयात आधुनिक प्रसारमाध्यमांचे अद्ययावत ज्ञान, तंत्रज्ञान, प्रशिक्षण यासाठी आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यम संशोधन केंद्र व पदविका, पदवी अभ्यासक्रम महाराष्ट्र शासनामार्फत सुरु व्हावेत. (कारण हे महाविद्यालय राज्य शासनाचे आहे.) बाळशास्त्री जांभेकर यांचे प्रचंड अभ्यासक व चरित्रकार ग.गं.जांभेकर यांच्या प्रयत्नामुळे मुंबई विद्यापीठात ‘आचार्य बाळशास्त्री जांभेकर प्रोफेसर ऑॅफ मेथॅमिटिक्स’ या नावाने गणित अध्यासन (चेअर) ३ नोव्हेंबर १९६२ ला सुरु झाले होते. पण गेली अनेक वर्षे या अध्यासनाचे काम बंद आहे. ते पुन्हा नव्याने चालू करावे व त्यात प्रसारमाध्यम हा ही विषय घेण्यात यावा अशी अपेक्षा आहे. आता मुंबई विद्यापीठाचे विभाजन करुन कोकणासाठी नवीन विद्यापीठ उभारणीचा प्रस्ताव राज्य शासनाच्या विचाराधीन आहे. तसे झाले तर या प्रस्तावित कोकण विद्यापीठास आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचे नाव द्यावे यासाठी कोकणातल्या सर्व लोकप्रतिनिधी, संपादक, पत्रकार संघटना, शिक्षणसंस्था यांनी महाराष्ट्र शासनात आग्रह धरला पाहिजे.

मुंबईत स्मारक असे व्हावे….

आता ज्या शिवसेनेने मुंबईत व महाराष्ट्रात मराठी माणसाचा आवाज बुलंद केला व मराठी माणसाचा स्वाभिमान वाढविला त्या शिवसेनेचेच मुख्यमंत्री मा.श्री.उध्दव ठाकरे झाले आहेत. आता त्यांनीच पुढाकार घेऊन मराठी वृत्तपत्रसृष्टीची मुहूर्तमेढ ज्यांनी मुंबईतच ङ्कदर्पणङ्ख या वृत्तपत्राने रोवली त्या मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक ङ्कदर्पणङ्खकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर या मराठी महापुरुषाचे स्मारक त्यांच्या कर्मभूमीत मुंबईतच करावे अशी अनेक वर्षांची आमची मागणी आहे. ती पूर्ण करावी अशी अपेक्षा आहे. पहिल्या मराठी ‘दर्पण’ वृत्तपत्रास आता १८८ वर्षे पूर्ण होत आहेत. म्हणजे ‘दर्पण’कार जांभेकर १८८ वर्षे त्यांच्या कर्मभूमीतच, मुंबईत उपेक्षित आहेत. जांभेकरांना जाऊनही आज १७४ वर्षे झाली आहेत. मुंबईतले हे स्मारक मुंबई महानगरपालिकेच्यावतीने व महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने राष्ट्रीय पातळीवरचे व्हावे. ङ्कदर्पणङ्ख वृत्तपत्र मुंबईच्या काळबादेवी (कोळभाट) भागात सुरु झाले होते. त्यामुळे शक्यतो या भागात हे भव्य स्मारक व्हावे अशी महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीची कळकळीची विनंती आहे.

संकल्पित स्मारकाबद्दल अपेक्षा या स्मारकामध्ये सुरुवातीलाच तळमजल्यावर दर्शनी भागात ‘दर्पण’कारांचे तैलचित्र, पुतळा असावा. तसेच बाळशास्त्री जांभेकरांचे समकालीन संपादक, विद्वान यांचीही तैलचित्रे त्यांच्या संक्षिप्त माहितीसह लावावीत. ‘दर्पण’ व ‘दिग्दर्शन’ च्या पहिल्या अंकाची मोठया आकारातील संगमरवरी छायाप्रती लावाव्यात. त्याचबरोबर ‘दर्पण’ व ‘दिग्दर्शन’ नंतर जी वृत्तपत्रे, मासिके स्वातंत्र्यपूर्व काळात प्रकाशित झाली त्याच्याही उपलब्ध असतील तर पहिल्या प्रती लावाव्यात. दुसऱ्या मजल्यावर २५० ते ३०० प्रेक्षक बसू शकतील असे सुसज्ज आधुनिक आचार्य बाळशास्त्री जांभेकर सभागृह असावे. या सभागृहात ‘दर्पण’ शुभारंभ ६ जानेवारी, बाळशास्त्री जांभेकर जयंती २० फेब्रुवारी व पुण्यतिथी १७ मे या दिवशी राज्यशासनाने प्रसार माध्यमांसाठी विशेष कार्यक्रम, चर्चा, परिसंवाद आयोजित करावेत. बाळशास्त्री जांभेकरांच्या कार्य व कर्तृत्वावर, पर्यायाने मराठी वृत्तपत्रसृष्टीवर आधारित असा एक उत्कृष्ट माहितीपट इंग्रजी, हिंदी व मराठी भाषेत तयार करुन या स्मारकात तो पर्यटकांना दाखविण्यात यावा. यासाठीही याच मजल्यावर १०० आसनांचे एक वेगळे अत्याधुनिक छोटेसे प्रेक्षागृह बांधावे. तिथे हा माहितीपट दररोज दाखविण्यात यावा. तिसऱ्या मजल्यावर एक सुसज्ज ग्रंथालय, वाचनालय असावे. त्यात प्रामुख्याने अभ्यासकांसाठी मराठी प्रसारमाध्यम व आधुनिक तंत्रज्ञान या विषयावरची नवी जुनी इंग्रजी, मराठी, हिंदी भाषांमधील विविध लेखकांची पुस्तके व देशातील सर्व प्रमुख भाषिक वृत्तपत्रे, मासिके असावीत. तसेच बाळशास्त्रींच्या  वरील सर्व लेखकांनी लिहिलेली चरित्र पुस्तकेही असावीत. मराठी व इंग्रजीतील जुन्या व नवीन लेखकांची विविध विषयांवरची, विविध क्षेत्रातील पुस्तके, ग्रंथ असावेत. विशेषत: ज्ञान, मनोरंजन, विज्ञान, तंत्रज्ञान, पुरातत्त्वसंशोधन, अवकाश तंत्रज्ञान, इतिहास, भूगोल इत्यादीवरील संदर्भ ग्रंथ घ्यावेत. जेणेकरुन हे परिपूर्ण ग्रंथालय विद्यावाचस्पती (पीएच.डी) साठी अभ्यासकांना मार्गदर्शक संदर्भ म्हणून उपयुक्त होईल असे असावे. याच मजल्यावर संशोधक, अभ्यासक व शासनमान्य अशा प्रसारमाध्यम संघटनांचे पदाधिकारी यांच्यासाठी सुसज्ज असे निवासी अतिथीगृह (किमान १० ते १२ कक्ष) बांधावेत. तळमजला व वरचे ४,५,६,७,८ किंवा त्यापेक्षाही जास्त होतील ते मजले व्यापारी, उद्योजक वर्गासाठी खुले ठेवून त्यातून या सर्व इमारतीचा खर्च भरुन निघेल व दैनंदिन व्यवस्थापनासाठीही तरतूद करता येईल असा दृष्टीकोन असावा. मा.मुख्यमंत्री ना.उध्दवजी ठाकरे व थोर नेते, सध्याच्या सरकारचे मार्गदर्शक मा.खा.शरद पवार, नूतन उपमुख्यमंत्री मा.ना.अजितदादा पवार यांनी राजकीय इच्छाशक्ती दाखवली तर नक्कीच हे ‘आचार्य बाळशास्त्री जांभेकर भवन’ मुंबईत बाळशास्त्री यांच्या कर्मभूमीत निश्चितच उभे राहील असा विश्वास वाटतो.

अर्थात मुंबईतल्या या सर्व अपेक्षित स्मारक कार्यात मुंबईतील सर्व वृत्तपत्रांचे संपादक, मुंबईतील पत्रकार, संपादक यांच्या सर्व प्रातिनिधीक संघटना, विशेषत: मुंबई मराठी पत्रकार संघ, विधीमंडळ व मंत्रालय वार्ताहर संघ यांनीही महाराष्ट्र  शासनात याबाबत सातत्याने पाठपुरावा करावा अशी अपेक्षा आहे.

– रविंद्र बेडकिहाळ
ज्येष्ठ पत्रकार तथा संस्थापक अध्यक्ष, महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी, फलटण.
मो- ९४२२४००३२१

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!