दिनू रणदिवे आणि देवेंद्र फडणवीस : ऋषी आणि राजा ! – योगेश वसंत त्रिवेदी

   २३ जानेवारी २०१९ ! एक अत्यंत महत्त्वाचा दिवस !! या दिवशी अपूर्व आणि दुग्धशर्करा योग पहायला मिळाला. २३ जानेवारी हा आझाद हिंद सेनेचे संस्थापक नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जन्मदिवस, तद्वतच मराठी माणसाच्या न्याय्य हक्कांसाठी लढणारी शिवसेना स्थापन करणाऱ्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचाही जन्मदिवस. दोन सेना प्रमुख या दिवशी जन्माला आले. त्याचप्रमाणे मराठी पत्रकारीतेतील विक्रमादित्य, भ्रमंतीकार, शिवसेना नेते, महाराष्ट्राचे माजी सांस्कृतिक, परिवहन मंत्री स्वर्गीय प्रमोद नवलकर यांचाही जन्मदिवस. पण नेताजी हे व्यक्तिमत्व वेगळे आणि बाळासाहेब ठाकरे यांचे व्यक्तीमत्वही आगळे वेगळे. त्यामुळे नेताजींची जयंती साजरी होताना बाळासाहेबांच्या जयंती साजरी होण्यात कोणताही अवरोध असण्याचं कारण नाही. ही दोन्ही व्यक्तीमत्व, दोघांचे अस्तित्व स्वतंत्रच. पण बाळासाहेबांच्या जयंतीत प्रमोद नवलकरांची जयंती झाकली जाणे अपरिहार्य ठरते. अर्थात प्रमोद नवलकर हे बाळासाहेबांच्या अष्टप्रधान मंडळातले असल्यामुळे त्यांची आठवण होणार नाही असं होऊच शकत नाही. अर्थात यंदाचा २३ जानेवारी २०१९ चा दिवस हा दुग्धशर्करा योग घेऊनच आला असंच म्हणावं लागेल. कारण याच दिवशी मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाने २०१८ चा कृ. पां. सामक जीवनगौरव पुरस्कार सह्याद्री अतिथी गृहातल्या शानदार समारंभात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ऋषीतुल्य पत्र्कार दिनू रणदिवे यांना प्रदान केला. महेश तिवारी, प्राजक्ता पोळ आणि विश्वास वाघमोडे या पत्रकारांनाही वार्ताहर संघाचे उत्कृष्ट पत्रकारीतेचे पुरस्कार प्रदान करण्यात आले. 
    दुग्धशर्करा योग असा की शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आणि दिनू रणदिवे यांना जीवन गौरव पुरस्कार. दिनू रणदिवे हे आज वयाच्या ९४ व्या वर्षाच्या म्हणजे शतकाहून केवळ सहा वर्षे दूर असलेले व्यक्तीमत्व आहे. भारताचा स्वातंत्र्य लढा, गोवा मुक्ती संग्राम आणि संयुक्त महाराष्ट्र लढा या तीनही लढ्यात सक्रीय सहभाग घेतलेले ऋषीतुल्य व्यक्तीमत्व. १९५६ साली मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे ही मागणी घेऊन सुरु झालेला संयुक्त महाराष्ट्राचा लढा. या लढ्यात दिनु रणदिवे आणि अशोक पडबिद्री या महारथींनी संयुक्त महाराष्ट्र पत्रिका चालवली. संयुक्त महाराष्ट्र लढ्याचे संयुक्त महाराष्ट्र पत्रिका हे एक मुखपत्र होते. त्या काळातला झंझावात म्हणजे ही पत्रिका होती. ही पत्रिका दिनू रणदिवे आणि अशोक पडबिद्री तयार करीत असत आणि त्याला शीर्षक केशव सीताराम उर्फ प्रबोधनकार ठाकरे देत असत आणि त्यात व्यंगचित्रे रेखाटण्याचे महत्त्वाचे काम बाळासाहेब ठाकरे करीत असत. बाळासाहेब ठाकरे, दिनू रणदिवे आणि अशोक पडबिद्री ही त्रिमुर्ती प्रबोधनकारांच्या मार्गदर्शनाखाली काम करीत होती. हा योगायोग आणखी एक असा की ज्या बाळासाहेब ठाकरे यांनी ज्वलंत हिंदुत्वाचा पुरस्कार करणारे एकमेव मराठी दैनिक `सामना’ २३ जानेवारी १९८९ रोजी सुरु केले. त्या दैनिक सामना चे पहिले कार्यकारी संपादक सुध्दा अशोक पडबिद्री होते आणि अशोक पडबिद्री यांनी नंदकुमार टेणी, रमेश राऊत, अनिल फळे, संजय डहाळे, किरण हेगडे, प्रकाश सावंत, योगेश त्रिवेदी, राजेश दर्यापूरकर, सुधा मधुसूदन जोशी, सुचिता मराठे (करमरकर), शिल्पा राजे (सरपोतदार), रविंद्र राऊळ, रविंद्र पारकर, नंदकुमार सामंत, शुभांगी वाघमारे(पुणतांबेकर), माधव डोळे, रवींद्र बिवलकर आदींना घेऊन दैनिक सामनाचा भरभक्कम पाया रचला. राज ठाकरे हे व्यंगचित्रे रेखाटण्यासाठी दै. ‘सामना’च्या ‘सद्गुरु दर्शन’ मध्ये ठिय्या देऊन बसत. संपादक बाळासाहेब ठाकरे, कार्यकारी संपादक अशोक पडबिद्री यांच्यासह विश्वस्त म्हणून उध्दव ठाकरे, अॅड. लिलाधर डाके, मुद्रक प्रकाशक म्हणून सुभाष देसाई यांची दालने सद्गुरु दर्शन मध्ये होती. त्या `सामना’ चा २३ जानेवारी २०१९ हा तिसाव्वा वर्धापन दिन !  मार्केटींगच्या जमान्यात अशोक पडबिद्रींपासून अनेकांची कारकीर्द पुसण्याचा प्रयत्न होत असला तरी वस्तुस्थिती व इतिहास हा `जंयच्या थंय’ असतो. असो !
    २३ जानेवारी २०१९ च्या दुपारी सह्याद्री या मलबार हिलच्या सप्ततारांकित अतिथीगृहात मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचा कृ.पान. सामक जीवनगौरव व राज्यस्तरीय पुरस्कार सोहोळा ऐतिहासिक व अभुतपूर्व वातावरणात पार पडला. कृ.पां. सामक यांचे नुकतंच ९६ व्या वर्षी देहावसान झालं. कृ.पां. सामक हे मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचे संसथापक असल्याने वार्ताहर संघाचा जीवनगौरव पुरस्कार त्यांच्या नांवे देण्याचा निर्णय अध्यक्ष दिलीप सपाटे, कार्यवाह प्रमोद डोईफोडे, उपाध्यक्ष दिलीप जाधव, कोषाध्यक्ष महेश पवार, सदस्य सुखदा (नेहा) पुरव, गौरीशंकर घाळे, मारुती कंदले, ब्रिजेश त्रिपाठी, विजय गायकवाड या समितीने घेतला पुरस्कारासाठी प्रकाश सावंत आणि शैलेंद्र परांजपे यांची द्विसदस्य समिती निवडली. या समितीने जीवनगौरव सह पुरस्कार प्राप्त पत्रकारांची एकमताने निवड केली.
    पत्रकारांचा कार्यक्रम आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्य अतिथी म्हटल्यावर पत्रकारांच्या मागण्या समोर येणारच आणि मुख्यमंत्र्यांना सांगावे लागणारच. पण संघाने पत्रकारांच्या पेन्शनचा वर्षानुवर्षे लावून धरलेला मुद्दा. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी त्यातून मार्ग काढतांना २००५ पासून सरकारी कर्मचाऱ्यांचे निवृत्तीवेतन बंद करण्यात आले असल्याने अर्थखात्याच्या हरकतीवर `बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजना’ म्हणून पुढे आणली आणि राज्य अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष यदुनाथ जोशी यांच्यासह संघाने पाठपुरावा केल्यामुळे ४ जुलै २०१८ रोजी पुरवणी मागण्यांत १५ कोटी रुपयांची तरतुद करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिनू रणदिवे आणि महेश तिवारी, प्राजक्ता पोळ, विश्वास वाघमोडे यांना सत्कार/ पुरस्कार प्रदान केल्यानंतर दिलेला शब्द खरा `करुन दाखवला’  आणि येत्या एका महिन्या बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजना लागू होईल, असे सांगतांना महात्मा फुले जन आरोग्य योजनेत पत्रकार परिवाराचा समावेश करण्यात आल्याचे तसेच गृहनिर्माण योजनेत पत्रकारांना ५० टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले.
    दिनकर रायकर हे लोकमत समुहाचे संपादक आणि राजीव खांडेकर हे एबीपी माझाचे संपादक प्रमुख पाहुणे म्हणून आवर्जुन उपस्थित होते. तेव्हा रायकर यांनी देवेंद्र फडणवीस हे १९७५ नंतर पाच वर्षांची टर्म पूर्ण करणारे पहिले मुख्यमंत्री ठरतील, असे बोलून दाखविले व आपण या संघापासून दिनू रणदिवेच्या मार्गदर्शनाखाली पत्रकारीता करीत असल्याचा आवर्जुन उल्लेख करुन कृतज्ञता व्यक्त केली. राजीव खांडेकरर यांनी रणदिवे यांच्या काळातली व आजची पत्रकारीता यात जमीन आसमानाचे अंतर असल्याचे सांगताना ऋषी आणि राजा ही लहानपणी ऐकलेली गोष्ट खरी ठरल्याचे आजच्या दिनु रणदिवे हे ऋषी आणि देवेंद्र फडणवीस हे राजा यावरुन दिसुन येत असल्याचे स्पष्ट केले. आज ग्लॅमर आहे पूर्वी प्रतिष्ठा होती हे सांगायला खांडेकर विसरले नाहीत. सौ.सविता दिनू रणदिवे या थांबवण्याचा प्रयत्न करतांनाही ऋषितुल्य दिनू रणदिवे यांना बोलत रहावेसे वाटत होते आणि उपस्थितांना ऐकत रहावेसे वाटत होते. एका भारावलेल्या वातावरणातला हा सोहोळा पाहताना खऱया अर्थाने `ऋषी आणि राजा’ हे प्रत्येकाच्या मनात बिंबत होते. कृ. पां. सामक यांची नात अश्विनी आणि नात जावई हेमंत देवधर यांची उपस्थिती सुद्धा समयोचित होती. यापूर्वीचे जीवनगौरव पुरस्कार विजेते विनायक प्रल्हाद उर्फ अण्णा बेटावदकर आणि विजय वैद्य यांच्या उपस्थितीमुळे तीन जीवनगौरव अशा त्रिमूर्ती सह्याद्रीची उंची वाढवित होत्या. रणदिवे यांच्या स्वच्छ व प्रामाणिक ध्येयवादी शुध्द पत्रकारीतेला मानाचा मुजरा आणि `करुन दाखवणाऱ्या’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना खास खास धन्यवाद व मनःपूर्वक शुभेच्छा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!