दिपावली निमित्त धर्मसभेचे मार्गदर्शन !

वसई : आता दीपावलीचा अत्यंत महत्त्वाचा पर्व (सण) येत आहे. हा सण सनातन वैदिक धर्म शास्त्रीय सण आहे. या सणात बारसाच्या(द्वादशी) दिवशी वासरासहित गोमातेचे पूजन केले जाते. तेरस(त्रयोदशी)ला पितरांसाठी तर्पण, धन्वंतरींचे पूजन, यमानिमित्त दीपदान करतात. चतुर्दशीचे दिवशी अभ्यंग स्नान, श्रीकृष्णपूजन व दीपोत्सव. अमावस्येला श्रीलक्ष्मीपूजन व आकाशदीप होते. बलिप्रतिपदेच्या दिवशी बलिपूजन. (द्वितीया) बीजेला बहिणीकडे जाऊन भाऊ बीज, असा कार्यक्रम असतो. यांत ढोल-ताशा वाजवणे, पणत्या लावणे, फराळाचे पदार्थ वाटणे, आकाश कंदील लावणे हे सर्व धर्मशास्त्रीय भाग आहेत.
परंतु वायुप्रदूषक, कर्णकर्कश, हानिकारक असलेले फटाके वाजवण्याचा व दीपावली सणाचा शास्त्रीय संबंध काडीमात्र नसल्याचे हिंदूंना सूचित करण्यात येत आहे. फटाक्यांचा इतिहास १० व्या शतकापासूनचा आहे आणि दिवाळी त्याहून प्राचीन काळापासूनची आहे, त्यामुळे फटाके नाही तर दिवाळी नाही, असे म्हणण्याला काहीही अर्थ नाही. भारतात चीन देशाशी जवळीक साधण्यासाठी उत्सुक असलेल्या नेत्यांमुळे फटाक्यांचा नकळत दिवाळीत अमर्याद प्रवेश होऊन फटाके रूढ झाले आहेत. प्राचीन सम्राटांनी, राजांनी व जनतेने दिवाळीत फटाके वगैरे फोडल्याचे कुठेही उल्लेख सापडत नाहीत.
म्हणून भारत संघराज्याच्या सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या फटाके वाजवण्यावरील निर्णयाचा धर्मसभा स्वागत करत आहे. त्याचबरोबर न्यायालयास हे सूचित करू इच्छिते की या निर्णयाबरोबर फटाके आयातीवर व निर्मितीवरही अंकुश ठेवण्याबाबत निर्णय द्यावा. तसेच धर्माच्या क्षेत्रातील आगंतुक विकृतीबाबत न्यायालयाने निर्णय अवश्य द्यावा, पण धर्मशास्त्राच्या अंगभूत बाबींवर धर्माचार्यांच्या मार्गदर्शनानेच निर्णय द्यावा. अहिंदूंमधील विकृतींवरही असेच तातडीने निर्णय द्यावेत.
धर्मसभा वैदिक धर्मियांना आग्रह करते की फटाक्यांच्या ऐवजी ढोल-ताशा वाजवून, रांगोळ्या काढून, तीर्थ तलावांत अभ्यंग स्नान करावे. तीर्थ-तलाव, हुतात्म्यांची स्थाने, गड-किल्ले, गुफा-लेण्या, मंदिरे, शाळा व घराघरात सुरक्षित रोषणाई वगैरे करून, विदेशी राज्यकर्त्यांच्या छळामुळे दलित झालेल्या भारतीयांना प्रेमाने भेटून फराळ वाटून “वसुधैव कुटुंबकम्” चा वैदिक संदेश देत दिपावलीचा उत्सव मोठ्या आनंद व उत्साहात साजरा करावा. तदर्थ सर्व धर्मानुरागींना शुभेच्छा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!