दिव्यांग खेळाडू देविदास पाटील याची जागतिक पॅरा कॅनॉईंग अँड कयाकिंग स्पर्धेसाठी निवड

नागोठणे (प्रतिनीधी) :  रायगड जिल्हा कॅनॉईंग अँड कयाकिंग संघटनेचा दिव्यांग खेळाडू देविदास पाटील याची दि.२१ ते २५ मे दरम्यान पोलंड देशातील पोझन येथे होणाऱ्या जागतिक आयसीएफ कॅनॉईंग स्प्रिंट वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारतीय संघातून निवड झाली आहे. यापूर्वी या खेळाडूंचा कॅम्प  दि १२ ते २१ मे पर्यंत दुनावरसनी नॅशनल ऑलिम्पिक सेंटर,हंगेरी येथे होणार आहे.पोलंड येथे होणाऱ्या जागतिक स्पर्धेच्या व यानंतर होणाऱ्या ऑलम्पिक स्पर्धेच्या कॅनॉईंगच्या दृष्टीने प्रशिक्षण देण्यात येणार आहे व तेथूनच भारतीय संघ पोलंड ला रवाना होणार आहे.

या जागतिक स्पर्धेसाठी संपूर्ण भारतातील फक्त ३ खेळाडू सहभागी होणार असून त्यातून महाराष्ट्रातील एकमेव खेळाडू म्हणून देविदासची निवड होवून तो भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करणार आहे. कॅनॉईंग अँड कयाकिंग हा खेळ ऑलम्पिकमध्ये असून आंतरराष्ट्रीय स्तरावर तो मोठ्या प्रमाणावर खेळला जातो. देविदास पाटील दिव्यांग असून तो देवळोली (रसायनी) येथे राहतो.देविदास महाराष्ट्राचा व विशेष म्हणजे रायगड जिल्ह्यातील खेळाडू असला तरी, महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा क्षेत्रातील चुकीच्या धोरणांमुळे दिव्यांग खेळाडूला कोणतेही सहकार्य किंवा आर्थिक पाठबळ मिळत नसल्याने देविदास पाटील, मध्यप्रदेशचा प्रतिनिधी म्हणून या स्पर्धेत खेळणार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. पाटीलने बॉडी बिल्डर, व्हीलचेर तलवारबाजीत सुद्धा उत्कृष्ट प्रदर्शन केले आहे त्याची जिद्द बघून रायगडचा जागतिक खेळाडू, शिवछत्रपती राज्य क्रीडा एकलव्य पुरस्कारप्राप्त संदीप गुरव यांनी त्याला सर्वतोपरी मार्गदर्शन करून पुढील प्रशिक्षणासाठी सांगली येथे दत्ता पाटील यांचेकडे कॅनॉईंग अँड कयाकिंग हा खेळ शिकण्यासाठी पाठवले होते.

दिल्ली येथे झालेल्या २९ व्या  सिनियर राष्ट्रीय कॅनॉईंग अँड कयाकिंग स्पर्धेत देविदास पाटील यांस सिल्व्हर पदक संपादन केले होते. तसेच यापूर्वी उझबेकिस्तान या देशात झालेल्या एशियन कॅनॉईंग स्प्रिंट स्पर्धेत सुद्धा त्याने उत्कृष्ट प्रदर्शन केले होते. रायगड तसेच महाराष्ट्रातून बोटींग स्पोर्ट्स या खेळामध्ये प्रथमच एक खेळाडू आंतरराष्ट्रीय खेळामध्ये सहभागी होण्यास पात्र ठरला आहे. जागतिक स्पर्धेत सहभागी होण्यासाठी अडीच लाख खर्च येणार आहे. देविदास पाटील हा शेतकरी कुटुंबातील असूनत्याला आर्थिक मदतीची गरज आहे. आर्थिकदृष्ट्या सक्षम नसल्याने रायगडाच्या या खेळाडूला दानशूर व्यक्तींनी आर्थिक हातभार लावावा असे आवाहन अँम्युचर लगोरी फेडरेशन ऑफ इंडिया या संघटनेच्या वतीने संदीप गुरव (९९६०७०२५१०) यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!