दुर्ग रायगड राजधानी वरील पुस्तकाची १३५ वर्षे पूर्ण

मराठयांच्या गौरवशाली इतिहासात मानाचा बिंदू व पुण्यस्थळ म्हणून सदैव प्रसिद्ध असलेला दुर्ग म्हणजे रायगड. सध्या रायगडाची माहिती देणारी लहान मोठी अशी किमान ७० हुन पुस्तके अनेक मान्यवरांनी आपापल्या अभ्यासानुसार गेल्या ७५ वर्षांत प्रकाशित केलेली आहेत. पण यातील अत्यंत दुर्मिळ म्हणजे सन १८८५ मध्ये प्रकाशित झालेले रायगड किल्ल्याचे वर्णन : लेखक गोविंदराव बाबाजी जोशी वसईकर यांचे पुस्तक.

यंदा या पुस्तकास तब्बल १३५ वर्षे पूर्ण होत आहेत. तत्कालीन उपलब्ध माहिती, साधने, गडास प्रत्यक्ष भेट, अनुभव लेख, माहिती संकलन इत्यादी परिमाणावर सदर पुस्तक आपले वेगळेपण जपून आहे. रायगडावर ३ एप्रिल १८८५ रोजी गोविंदराव बाबाजी जोशी यांनी प्रत्यक्ष भेटीतून लिहिलेल्या या पुस्तकात रायगड किल्ल्यास जाताना प्रवास, रायगड किल्ल्याची जुनी हकीकत, छत्रपतींच्या कारकिर्दीबाबत थोडक्यात माहिती, सन १६७४ श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा दरबार वर्णने संदर्भ, राज्याभिषेक वर्णन, रायगड किल्ल्यावरील सांप्रत स्थितीचे वर्णन, समाधीचे जीर्णोद्धाराविषयी प्रार्थना, समाधीचे जीर्णोद्धाराविषयी कविता, मावळे व हेटकरी पोशाख, छत्रपती शिवाजी व छत्रपती संभाजी यांच्या कारकिर्दीतल्या टिपणे इत्यादी बाबत माहिती देण्यात आलेली आहे. आजपासून १०० हुन अधिक वर्षांपूर्वी प्रतिकूल परिस्थितीत मांडलेले हे विचार, अभ्यास वंदनास प्राप्त आहेत. लेखकाने अत्यंत प्रामाणिक जाणिवेने सदर पुस्तक लेखनाचा मूळ हेतू श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीचे जीर्णोद्धाराविषयी प्रार्थना हे स्पष्ट केलेले आहे. पुस्तकात रायगडावर धर्मार्थ दवाखाना व छत्रपतींच्या नावाने अन्नछत्र असावे ही कल्पना अत्यंत विचार करण्यास प्रेरक आहे, शेकडो वर्षांपूर्वी मांडलेला हा विचारही मनास भावला. पुस्तकातील इतर तपशिलात रायगड येथे एकवार होणारा खर्च, छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी व श्री जगदीश्वर महादेवाचे मंदीर यावर होणारा नित्य खर्च, समाधीवरील छत्री बांधावयास खर्च अजमास इत्यादी सर्व माहिती परिश्रमाने गोळा करण्यात आलेली आहे यात शंका नाही. रायगड दर्शनात “स्थानिक असामी करून ऐकण्यास मिळालेल्या दंतकथा अतिशयोक्तीच्या आहेत, तरी त्या ऐकून मनास एक प्रकारचा आनंद व उल्हास प्राप्त होतो” असे लेखकाने केलेले विधान आजही प्रत्यक्ष दुर्गभटकंती केलेल्या दुर्गमित्रांना नक्कीच पटेल.

लेखकाने सन्मान बुद्धीने संकलित केलेल्या रायगडावरील तीन गोष्टी पुस्तकात नोंदवल्या आहेत, त्या म्हणजे गंगासागर तलावातील उदक तीर्थ, धान्य कोठारातील जुने तांदूळ, समाधीतील भस्म रक्षा. पुस्तकातील प्रस्तावनेत नोंदवल्याप्रमाणे तत्कालीन वर्तमानपत्रात श्री छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी व ज्या शिवलिंगाची महाराज नित्य पूजा करीत त्याची अव्यवस्था याविषयी वारंवार लेख येत असत. इ स १८८५ वसई मुंबई इत्यादी परिसरातील वृत्तपत्र विभागात याबाबत आलेली जागरूकता जाणकार व जिज्ञासू व्यक्तींनी संकलित करून पुढे आणण्यास वाव आहे. लेखक गोविंदराव बाबाजी जोशी यांची रायगड संवर्धनासाठी असणारी तळमळ, जिज्ञासा, व्याकुळता या पुस्तकात पदोपदी जाणवत राहते. सदर पुस्तकाची दुसरी आवृत्ती सन १९२४ मध्ये चित्रशाळा प्रेस सदाशिव पेठ पुणे येथे मुद्रित करण्यात आली. श्री दुर्गराज रायगडास वाहिलेल्या या पुस्तकास व लेखकाच्या प्रयत्नास मी मनापासून नमन करतो.

पुस्तक परीक्षण लेखनसीमा : डॉ श्रीदत्त राऊत : उत्तर कोकण अभ्यासक : ९७६४३१६६७८

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!