दुष्काळसदृश तालुक्यांतील विद्यार्थ्यांना एसटीचा मोफत पास

मुंबई (प्रतिनिधी) : राज्यात निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाने ग्रामीण भागातील शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मोठा दिलासा आहे. शासनाने दुष्काळसदृश म्हणून नुकत्याच जाहीर केलेल्या तालुक्यातील विद्यार्थ्यांना उर्वरीत शैक्षणिक वर्षासाठी मोफत प्रवास सवलत पास देण्यात येत असल्याची घोषणा परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी आज येथे केली.
राज्य शासनाने नुकतेच दुष्काळसदृश तालुक्यांना विविध सवलती जाहीर केल्या आहेत. त्यात एसटी महामंडळही आपले योगदान देत आहे.शालेय, महाविद्यालयीन आणि व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या मासिक पाससाठी सध्या ६६.६७ टक्के इतकी सवलत देण्यात येते. आता शासनाने दुष्काळसदृश म्हणून जाहीर केलेल्या तालुक्यातील विद्यार्थ्यांना उर्वरीत शैक्षणिक वर्षासाठी ही सवलत १०० टक्के इतकी देण्यात येईल. ही संपूर्ण सवलत एसटी महामंडळामार्फत देण्यात येणार असून त्यासाठी महामंडळावर साधारण ८५ कोटी रुपयांचा अतिरिक्त बोजा पडणार आहे. राज्यातील साधारण ३५ लाख विद्यार्थ्यांना या सवलत योजनेचा लाभ मिळेल, असे  रावते यांनी सांगितले.
रावते म्हणाले, पावसाअभावी अन्नदाता शेतकरी सध्या अडचणीत आहे. ग्रामीण भागातील इतर लोकही दुष्काळसदृश परिस्थ‍ितीमुळे अडचणीत आहेत. शिवाय शेतकरी आणि ग्रामीण भागातील लोक हे एसटीचे बहुतांश प्रवासी असल्याने एकप्रकारे ते एसटीचे अन्नदाते आहेत. सध्या शेतकऱ्याच्या आणि ग्रामीण भागीत लोकांच्या अडचणीच्या काळात त्यांना मदत करणे हे एसटीचेही कर्तव्य असल्याचे मानून त्यांच्या शाळा, महाविद्यालयात शिकणाऱ्या मुलांना दिलासा देण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे. त्यानुसार उर्वरीत शैक्षणिक वर्षासाठी विद्यार्थी मासिक पाससाठी १०० टक्के सवलत देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!