देवळात वाढलेली गर्दी हा येशूचा पराभव – सायमन मार्टिन

वसई : एकीकडे चंगळवादाचा प्रभाव तर दुसरीकडे भीती आणि असुरक्षीततेमुळे देवळातली गर्दी वाढलेली आहे. कालपरवापर्यंतजी माणसं चळवळीत सक्रीय होती तीच माणसं आता बुवा बाबांच्या पालख्या उचलण्यात मग्न आहेत. जे ठेचले जात आहेत त्यांच्यासाठी येशू उभा राहिला. तत्कालीन परिस्थितीत प्रथमच त्याने महिलांना माणूस म्हणून ओळख मिळवून दिली. आंधळयांना दृष्टीदान आणि धरून नेलेल्यांची सुटका हे येशूच्या जगण्याचं सार होतं. एकदा येशू कळला की आपल्या आतला कळवळा जागृत होतो. दु:ख भोगणाऱ्या कष्टी आणि वंचिताबरोबर आपण नातं जोडतो. पण झालयं उलटचं आपण अधिकाधिक देवळात गर्दी करू लागलो आहोत, हा येशूचा पराभव आहे असे उद्गार कवी सायमन मार्टिन ह्यांनी शनिवार ९ मार्च रोजी माणिकपूर येथील संत मायकल चर्चच्या लोयोला सभागृहात संपन्न झालेल्या फादर ऑस्कर कोलासो स्मृती व्याख्यानमालेत बोलताना काढले.

‘अन्यायाला वाचा फोडणे सर्वांचे कर्तव्य’ ह्या विषयावरील व्याख्यानात बोलताना ते पुढे म्हणाले. मुंबईच्या प्रवासात अनेकांना आपले प्राण गमवावे लागत आहेत. किडयामुंग्यासारखी येथे माणसं मरत असताना अब्जावधी रूपयांचा बुलेट ट्रेन प्रकल्प राबवला जात आहे. बुलेट ट्रेनला विरोध नाही पण सर्वसामान्य प्रवाशांना वाऱ्यावर सोडून राक्षसी प्रकल्प कोणाच्या भल्यासाठी येत आहेत ? वसई-विरार महानगरपालिकेचा १२२ कोटी रूपयांचा घोटाळा गाजत आहे पण ह्याच परिसरात गोरगरिबांसाठी सुसज्ज हॉस्पिटल नाही त्यासाठी जाब विचारणारे आवाजच गायब आहेत. श्रीमंतांना पैसे फेकून सर्वकाही विकत मिळते, पण गोरगरिब दु:ख आणि वेदना भोगत आहेत त्यांची कुठलीही जबाबदारी आमच्यावर नाही हा विचार जेव्हा बळावला तेव्हाच आम्ही खऱ्या धर्मापासून दूर गेलो.

येशूचा धर्म गरीब, वंचित आणि रंजल्या गांजल्यासाठी उभं राहण्याची प्रेरणा देतो. ज्या वसईतल्या समाजातून जनसेवेसाठी प्रत्येक घरातून मुलं मुली धर्मसंघात सामील झाली तोच समाज भोगवादाला बळी पडला. ज्या कार्यकर्त्यांनी दुर्बलांचं रक्षण करायचं तेच गळे कापू चोर निघाले.मागच्या दोन-चार वर्षांत वसईतल्या दोन-चार पतपेढया भ्रष्टाचारांच्या वासनेला बळी पडल्या. त्यातून गोरगरीबांचे पैसे गायब झाले. खाणारे गडगंज होते. ज्यांच्यावर भरवसा ठेवला त्यांनीच गळा कापला. शुन्यातून वैभवावर पोहचलेल्या येथल्या सहकारी बँकातल्या कारभाऱ्यांनी लुटीचा नवा इतिहास रचला. चार दोन तुकडे फेकून लाभार्थ्यांची फौज उभी केली. त्यामुळे विरोध करायची सोय नाही. नवी माफीया संस्कृती येथे उदयाला आलेली आहे. तेच आता प्रबोधनासाठी व्याख्यानं आयोजित करू लागले आहेत. साहित्य मेळावे भरवू लागले आहेत. सर्वत्र सर्वकाही स्पॉन्सर करू लागले आहेत.

येथल्या अनाधिकृत इमारती भुईसपाट झाल्या ही चांगलीच घटना आहे. पण त्या बांधतानाच पाडल्या असत्या तर ज्या गरीबांनी कर्ज काढून घरं घेतली ते रस्त्यावर आले नसते. त्यांच्या बाजूने बोलणारा कोण आहे? नगरसेवक ते आयुक्त सहीसलामत, पण कर्ज काढून घरं घेणाऱ्या बाया छाती बडवत रस्त्यावर उभ्या राहून आक्रोश करीत आहेत त्यांच्या बाजूने कोण उभा आहे ?

बोलण्याची किंमत मोजावी लागते आणि न बोलण्याची देखील. येशूने मंदिरात भरवलेला बाजार उधळून लावला होता. त्याने धर्माच्या ठेकेदारावरच हल्लाबोल केला होता. जुलमी सत्ताधाऱ्यांना त्याने लबाड कोल्हे म्हणून आव्हान दिलं होतं. बाईला दगडाने ठेचून मारण्याचा जन्मजात अधिकार हिसकावून पुरुषी अंहकाराला डिवचलं होतं. ढोंगी धार्मिकांना सडलेल्या कबरा म्हणून अंगावर घेतलं होतं. त्याचा आदर्श राहिला दूर आम्ही त्याला मुर्तीमध्ये चिणून टाकलं. अन्याय उघडया डोळयांनी पाहणे हे पाप आहे. लढणारे आजही एकाकी झुंजत आहेत. त्यांच्याबरोबर जोडलेले असणे म्हणजेच येशुबरोबर अनुसंधान आहे. पण झालय उलटचं सध्या देवळातली गर्दी बेसुमार वाढलेली आहे. त्याचाच धोका येशूला आहे.

कार्यक्रमाचे स्वागत मर्यान आल्मेडा, प्रास्ताविक भाषण माणिकपूर चर्चचे प्रमुख धर्मगुरू फादर निलम लोपीस यांनी केले तर सूत्रसंचालन राजेश मिनेजीस यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!