देशात आणि राज्यात महायुतीची पिछेहाट झालेली आहे – चित्रा वाघ 

नालासोपारा (वार्ताहर) : देश व राज्याचा विचार केला तर आज महायुतीला जो कडवा विरोध झालेला आहे तो केवळ महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशात झाला आहे. भाजपाची पिछेहाट कधीची चालू झाली आहे. आणि राहुल गांधी, प्रियांका गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे वादळ उठले आहे.
राज्यात सुद्धा काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्रपक्ष मुसंडी मारतील असे मी खात्रीपूर्वक सांगू इच्छिते कारण मी या निवडणुकीच्या निमित्ताने राज्यभर फिरते आहे. मोदींच्या शाही राजकारणाचा देशाला जबरदस्त त्रास होतो आहे.
आपण मोठ्या संकटात सापडलो आहोत, आपले संविधान संकटात आहे. आणि हे जुलमी साम्राज्य उलथून टाकले नाही तरच हा देश आपण सर्वोच्च मानलेल्या घटनेच्या मार्गदर्शक तत्वांप्रमाणे शांततामय सहजीवन मार्गाने या पुढे वाटचाल करु शकेल.  देशात व राज्यात जी परिस्थिती आहे तिचे भान या सरकारला नाही. कायद्यांचा वचकच नाही म्हणून तर महिलांवरील अत्याचार वाढले आहेत.
पालघर या निसर्ग सौंदर्याने व नैसर्गिक वायू, तेल, जल, वन, खनिज, शेती, मत्स्य व मीठ शेतीने सधन असा जिल्हा आहे.येणारे दिवस हे या जिल्ह्याच्या विकासासाठीच आहेत. येथील ज्येष्ठ नेते आम. हितेंद्र ठाकूर यांनी जसा वसई तालुक्यातील वीज,पाणी, शिक्षण, दळणवळण, आरोग्य, कला-क्रीडा क्षेत्राचा विकास सलग प्रयत्न करीत साध्य केला आहे तसा पालघरचाही विकास होऊ शकतो या विश्वासाने या वेळी महाआघाडीला मतदान करा असे आवाहन चित्रा वाघ यांनी येथे केले.
गैस सिलेंडर ५ वर्षात ३४२ वरुन ९४७ रुपयांवर गेला, तूर डाळ १५० वर तर पेट्रोल ९० रुपये लिटर, गोर गरिबांना रॉकेल मिळेना, शेतकऱ्यांना शेतीला तर सोडाच प्यायला पाणी मिळेना, ज्या गावात पाण्याची सोय नाही तिथे मुलगी द्यायची नाही म्हणून शिकल्या सवरल्या पोरांची लग्नं होईनात, देशभरातील छोटा उद्योजक उध्वस्त झाला व लाखो कामगार बेरोजगार झाले. जी.एस.टी.मुळे व्यापारी भरडले गेले. आणि मोदी म्हणतात ५ वर्षांत देशाने मोठी प्रगती केली आहे.
इतके खोटे बोलाताना या नेत्यांना ना भिती ना शरम वाटत नाही इतके हे नेते सत्तेच्या मस्तीत डुबले आहेत. का व कोण यांना मतं देईल ? तुम्ही तरी द्याल का ? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश अध्यक्षा चित्रा वाघ यांनी महाआघाडीचे उमेदवार बळीराम जाधव यांच्या प्रचारार्थ झालेल्या सोपारा बुर्हाण चौकातील जाहीर सभेत बोलताना केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!