नरेंद्र मोदी यांची बायको आणि आपण – सुजीत भोगले

यावेळचा निवडणूक प्रचार हा पातळीहीन झाला आहे. त्याला निवडणूक आयोग जबाबदार आहे. त्यांनी स्वत:ला काम करणे सोपे जावे म्हणून हि निवडणूक ७ टप्प्यात घेतली. दीर्घकाळ चालणारा प्रचार हा असा दर्जाहीन आणि कपडेफाडू होणे हेच अपेक्षित होते आणि तेच झाले आहे. पुढील निवडणूक हि २-३ टप्प्यात आणि जास्तीत जास्त पंधरा दिवसात उरकावी याचे नियोजन आजपासूनच निवडणूक आयोगाने करणे योग्य ठरेल.

तर प्रचाराच्या अंतिम टप्प्यात मायावती यांनी मोदी यांची पत्नी आणि त्यांचे तुटलेले संबंध यावर आघ्य भाष्य करून प्रचाराच्या निम्न स्तराची पातळी भेदून तिचा दर्जाच संपवून टाकला आहे. येणाऱ्या पिढयांना लोकशाहीचा अर्थ एकमेकांचे सार्वजनिक चारित्र्यहनन करण्याचा पंचवार्षिक कार्यक्रम अशी व्याख्या शिकवण्यास हरकत नसावी.

मी स्वत: राष्ट्रीय स्वयंसेवक या संघटनेचा समर्थक नाही. मला त्यांची मते सैध्दांतिक पातळीवर पटत नाहीत. त्यांचे सर्वसमावेशकतेचे प्रयोग हे प्रतिकात अडकून पडणारे आहेत हेच माझे मत आहे. पण त्यांचे पूर्णवेळ कार्यकर्ते आणि त्यांची ती कार्यसंस्कृती हि मला जवळून पाहण्याचा योग आला आहे त्यामुळे नरेंद्र मोदी यांच्या आयुष्यातील त्या झाकलेल्या बाजूवर प्रकाश टाकणे मला योग्य वाटत आहे.

ज्यावेळी नरेंद्र दामोदरदास मोदी हा व्यक्ती संघाचा पूर्णवेळ प्रचारक झाला त्यावेळी देशात यत्रतत्रसर्वत्र फक्त कोन्ग्रेसचीच सत्ता होती. कल्पनेच्या विमानांनी कितीही उंच भरारी घेतली तरी संघ किंवा त्यांच्या एखाद्या राजकीय अंगाला सत्ता मिळणे हि स्वप्नवत बाब होती. त्यामुळे आपण आज पूर्णवेळ प्रचारक होतो आहेत. यातून एखादी सत्ता किंवा सत्तापद मिळू शकेल हा विचार नरेंद्र करणे अशक्य होते. जर कोणीही त्यावेळी तसा विचार केला असता तर त्याला लोकांनी अक्षरश: वेडयात काढले असते.

पूर्णवेळ प्रचारक याचा अर्थ संपूर्ण आयुष्य संघाला प्रदान करणे. संघ सांगेल तेच काम करत रहाणे. कुठपर्यंत जो पर्यंत तुम्ही आरोग्याच्या कारणांनी निवृत्त होत नाहीत अथवा मृत्यू येत नाही. या बद्दल तुम्हाला काय मिळेल ? अंगावर घालायला कपडे आणि दोन वेळेस जेवण. काही वर्ष राबल्याच्या नंतर अत्यल्प मानधन. ते सुध्दा इतके तुटपुंजे कि त्यातून काही चैन करणे सर्वथा अशक्य. घरी काही पैसे मदत म्हणून पाठवणे सुध्दा शक्य नाही. अर्थात हा एक प्रकारचा संन्यासच फक्त विधी नसणारा.

ज्यावेळी नरेंद्र मोदी यांनी हा निर्णय घेतला असेल. त्यांनी नक्कीच पत्नीला विश्वासात घेतले असणार. त्यांनीं आनंदाने अथवा नाईलाजाने त्यांना परवानगी दिली असणार. घरातील अन्य सदस्य सुध्दा विरोध करून मग अंतिमत: तयार झाले असणार. पण या पुढे पतीपत्नी आजन्म विभक्त राहतील हे तर निश्चित झाले होते. त्या काळाला अनुसरून जसोदाबेन यांनी घटस्फोट घेतला नाही. आणि त्या आजन्म मोदी यांची पत्नी आणि एक शिक्षिका म्हणून आपले जीवन जगल्या. त्यांची तपस्या नरेंद्रभाईच्या इतकीच थोर आहे. त्यांनी त्या क्षणी परवानगी दिली नसती तर आज कदाचित नरेंद्र मोदी आपल्या सगळयांना दिसलेही नसते.

संघाचा पूर्णवेळ प्रचारक हे नाम तुम्ही प्राप्त केले कि तुमचे पुढील आयुष्य कसे असते ?

दिवसभर संघाने सांगितलेले जे काही कार्य असेल ते करणे. सकाळी आणि रात्री दोन वेळेस संघाच्या बद्दल ममत्व असणाऱ्या घरी जेवण करण्यास जाणे. रात्री मुक्काम संघाच्या कार्यालयात. तुम्ही घालत असलेले बनियन, चड्डी सुध्दा तुम्हाला कोणीतरी विकत घेऊन देतो. दाढी करता येईल इतके पैसे हि मिळतील हि शाश्वती नसते त्यामुळे बहुसंख्य स्वयंसेवक दाढी राखून असतात.

आपण ज्यांच्याकडे दोन वेळेस जेवायला जातो आहे त्या गृहिणीला सुध्दा आपला त्रासच होतो आहे. मग तिला आपले ओझे वाटू नाही म्हणून तिला दळण आणून देणे, भाजी आणून देणे, तिची घरातील किरकोळ कामे करणे. त्यांच्या घरी गेल्यावर लहान मुलांशी गप्पा मारत मारत त्यांच्यावर संस्कार करणे. त्यांना अभ्यासात मदत करणे. हि सगळी कामे संघस्वयंसेवक उत्साहाने करत असतात. हेच संघ संस्कार आहेत.

ईशान्य भारतातील ख्रिश्चन धर्माचा प्रसार रोखण्यासाठी तिथे कार्यरत असणारे स्वयंसेवक मला माहित आहेत. कितीतरी जण तिथे कार्य करताना बळी सुध्दा पडले आहेत. जिथे कुठे आपत्ती येईल तिथे जाऊन कार्य करणारे स्वयंसेवक आता सगळयांनाच माहिती आहेत.

सैन्याच्या प्रमाणे एकचालकानुवर्ती संघटन उभे करणे, चालवणे आणि इतके वृध्दिंगत करणे हे खायचे काम नाही. हे केवळ संघ स्वयंसेवकांच्या माध्यमातूनच झालेले आहे.

नरेंद्र मोदी, नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस हे सगळे संघाचेच कार्यकर्ते. नरेंद्र मोदी पूर्णवेळ कार्यकर्ते. संघाच्या कार्यक्रमात यांचा परिचय करून देताना ते स्वत:चा उल्लेख  ‘मी नरेंद्र दामोदरदास मोदी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा पूर्णवेळ कार्यकर्ता आहे आणि सध्या माझ्याकडे भारतीय जनता पक्षाच्या मार्फत भारताच्या पंतप्रधानपदाची जबाबदारी आहे’ असा करतील. पंतप्रधान, राष्ट्रपती किंवा सरसंघचालक होणे हि जबाबदारी आहे. कोणी कुठे जाऊन काय काम करायचे हे संघटन ठरवते. तो व्यक्ती ठरवत नाही. सरसंघचालक सुध्दा एकटे निर्णय घेऊ शकत नाही. त्यांचे सुध्दा कार्यकारी मंडळ असते. ते मंडळ निर्णय घेते.

हे सांगण्याचे कारण पूर्णवेळ कार्यकर्ता होणारा माणूस अधिकाधिक स्वप्न हे सरसंघचालक होणे हेच पाहू शकतो. राजकारणात येणे आणि पंतप्रधान होणे हे नाही. त्यामुळे नरेंद्र मोदी यांनी राजकीय फायद्यासाठी पत्नीचा त्याग केला हे वाक्य आघ्य आहे. चरीत्रहीन आहे. याचा अजून एक कंगोरा पहा. सिध्दार्थ गौतम हा राजपुत्र आपल्या नवजात अर्भकाला आणि ओली बाळंतीण असणाऱ्या पत्नीला सोडून जातो. का ? तर त्याला त्याच्या प्रश्नांची उत्तरे मिळवण्याची आस असते. त्याला सत्याचा शोध घ्यायचा असतो. आपण त्याचे बुध्द होणे पचवतो. आनंदाने त्याचे कौतुक करतो. त्याच्या पत्नीची मुलाची व्यथा नजरेआड करतो. सिध्दार्थ गौतमाचा प्रवास कदाचित बुध्द न होता संपला सुध्दा असता. त्याला हवे असणारे सत्य कदाचित आयुष्यात मिळालेही नसते. पण त्याने जगरहाटीच्या बाहेर पडत प्रयत्न केला. नरेंद्र मोदी हा सुध्दा एक सामान्य माणूस आपल्या आयुष्याला काहीतरी अर्थ यावा, आपल्या हातून समाजाची सेवा घडावी म्हणून कुटुंबाचा त्याग करून पूर्णवेळ कार्यकर्ता झाला. पण हा शोध सुध्दा नाही चिरा नाही पणती असा संपू शकला असता. कदाचित संपूर्ण आयुष्य राबूनही कार्य घडले असते नाव मिळाले नसते. पण हे करण्यास उद्युक्त होणारा माणूस नावाच्या साठी हे करतच नसतो हे समजून घ्या.

सिध्दार्थ गौतम सत्याचा शोध घेताना कालवश झाला असता तरी त्याला फरक पडला नसता. आपण बुध्दात्वास प्राप्त होऊ हि त्याची अभिलाषाच नव्हती. मी सत्याच्या शोधात आहे याचे त्याला समाधान होते. आणि तो त्या समाधानात होता म्हणून सत्याच्या पर्यंत पोचू शकला. नरेंद्र मोदी हा संघाचे कार्य करत आयुष्य व्यतीत करण्याच्या साठी बाहेर पडला होता. राजकीय पद हि आकांक्षाच नव्हती. प्रसिध्दी हि इछाच नव्हती. आज एक नरेंद्र मोदी तुम्हाला माहित आहे संघाचे असे लाखो कार्यकर्ते संसारावर पाणी सोडून संघाचे पूर्णवेळ काम करतात. एखादा नरेंद्र मोदी होतो बाकीचे आयुष्यभर अनामिक म्हणून जगतात आणि मरतात. त्यांचे आयुष्य व्यर्थ जाते का ? नाही. ज्या गोष्टीत आपल्याला आनंद मिळतो ते काम आपण करत आहोत याचे समाधान असते.

हे समाधान , हा आनंद तुम्हाला मुक्तीची वाट दाखवतो. तुमचे जीवन सफल करतो. हे लोक स्वत:च स्वत:च्या मुक्तीच्या वाटेवर चालू लागतात. तुम्हाला त्यांचे अनुकरण करणे शक्य नाही. तुमचे जीवन स्वार्थाने लिप्त,लडबडलेले आहे. त्यांचे नाही. कमीत कमी या पातळीवर तरी आपण न्यून आहोत आणि आपण थोडाफार का होईना स्वार्थाचा त्याग केला पाहिजे हि भावना ठेवा. त्यांच्याबद्दल आदर किंवा प्रेम बाळगणे शक्य नसेल तर कमीत कमी द्वेष तरी करू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!