नळ कनेक्शन देऊन अडीच महिने उलटले ; तरी पाणी देण्यास पालिकेची नकारघंटा

विधवा महिलेच्या पाण्यासाठी पालिकेच्या दरबारी येरझार्‍या; पालिकेला मात्र घाम फुटत नाही…
वसई : (प्रतिनिधी) : वसई-विरार शहर महानगरपालिकेतील अनधिकृत बांधकामं प्रस्तावित करून त्यांना नळ कनेक्शन देण्याचा प्रस्ताव पालिकेने मंजूर केला आहे. एकीकडे अनधिकृत बांधकामधारकांना पाणी देण्यासाठी पालिका दिखाऊपणा करत असताना अधिकृत बांधकामांत वर्षानुवर्षे राहणार्‍या स्थानिक रहीवाशांना पाणी पुरवठा करण्यासाठी वसई-विरा शहर महानगरपालिकेने नरमाईचे धोरण स्विकारले आहे. उन्हाळा सुरू झाला की वसई-विरार परिसरात पाण्याचे कमतरता जाणावायला लागते. अशात अधिकृत बांधकामांत राहणार्‍या स्थानिक नागरिकांना नळ कनेक्शन देऊन पाणी पुरवठा न करण्याचा कारभार पालिकेने घोटायला घेतला आहे. याचाच प्रत्यय वसई पश्‍चिमेतील नायगाव कोळीवाडा परिसरातील एका विधवा महिलेच्या बाबतीत आला आहे. सदर विधवा महिलेने नळ पाणी योजनेतून पाणी मिळण्यासाठी पालिकेकडे अर्ज सादर केला होता. अर्जान्वये पालिकेने सदर विधवा महिलेला नळ कनेक्शन दिले असले तरी अडीच महिने उलटल्यानंतरही पाणी देण्यास सोयीस्कररित्या कानाडोळा केला आहे. पाणी मिळावे यासाठी सदर विधवा महिला महापालिकेच्या प्रभाग समिती ‘आय’ च्या कार्यालयात खेटे मारत असून एकाही अधिकार्‍याला या विधवा महिलेची दया येत नसल्याने पाषाण हृदयी असलेल्या पालिका अधिकार्‍यांच्या संवेदना कशा मेल्या आहेत, याचा संतापजनक प्रत्यय येतो.
नायगाव कोळीवाडा, पश्‍चिम येथे राहणार्‍या प्रेमा रविंद्र कोळी या वृद्ध विधवा महिला आहेत. त्यांनी वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या प्रभाग समिती ‘आय’ या विभागीय कार्यालयाचे प्र.साहायक आयुक्तांकडे नळ जोडणीसाठी अर्ज सादर केला होता. सदर अर्जाच्या अनुषंगाने प्रेमा कोळी यांना पालिकेने नळजोडणी दिली. परंतु अडीच महिन्यांपासून नळजोडणी देऊनही त्याद्वारे पाणी पुरवठा करण्यास पालिकेने उदासिनता दाखवली आहे. प्रेमा कोळी यांनी नळजोडणीसाठी प्रभाग समिती आय विभागाकडे दि. 1 नोव्हेंबर 2018 रोजी 16,000 (सोळा हजार रूपये) अनामत रक्कम भरले आहेत. नलजोडणीची रक्कम भरूनही सदर विधवा महिलेला पाणी देण्यास प्रभाग समिती ‘आय’ चा ठेकेदार बालाजी नकारघंटा वाजवत आहे.
यासंदर्भात सदर बालाजी नावाच्या ठेकेदाराशी संपर्क साधला असता त्याने आज लवकरच पाणी देतो असे वारंवार विधवा महिलेला सांगून त्यांची दिशाभूल करण्याचे काम सुरू केले आहे. जोडलेल्या नळ कनेक्शनमधून येत्या 20 दिवसांत पाणी पुरवठा होईल असे ठेकेदाराकडुन सांगण्यात आले होते. परंतु अडीच महिने उलटले तरी पाणी काही मिळत नसल्याने त्या विधवा महिलेच्या कुटुंबाप्रती प्रभाग समिती आय च्या ठेकेदाराने खेळ मांडला आहे. नळ जोडणी देऊन पाणी न देणारी महापालिका नंतर पाणीपट्टी कर आकारण्यास पुढचा-मागचा विचार करणार नाही. पालिकेकडून पाणीच मिळत नसेल तर आम्ही पाणीपट्टी का म्हणून भरायची असा जाब प्रेमा कोळी यांनी पालिकेला विचारला आहे. पालिकेने सदर विधवा महिलेला पिडणार्‍या संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी कोळी कुटुंबियांनी केली असून घरात चोवीस तास नळ आहे पण, त्या नळातून एक थेंबही पाणी आले नाही. वाहरे महापालिका प्रशासन.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!