नवर्‍याच्या संसार पीठात थोडंसं आपलंही मीठ घालून महिला संसाराला चव आणतात  – डॉ सिसिलिया कार्व्हालो  

वसई, दि.29 (वार्ताहर) : स्वयंरोजगारातून महिला आपल्या स्वतःचे सबलीकरण करतातच परंतु आपल्यातील नववनिर्माणाची जाणीवही त्यांना होते. आज हवा, पाणी, जमीन, प्रकाश सारच प्रदुषित झालेलं आहे. तरीही आपण जगत आहेात म्हणजे आपल्यातील रोगप्रतिबंधक शक्ती अजुनही साबुत आहे, ती टिकवून ठेवणे ही काळाची गरज आहे, असे विचार ज्येष्ठ साहित्यिका डॉ. सिसीलिया कर्व्हालो यांनी गुरुवारी व्यक्त केले.
राजोडी येथील ‘जिव्हाळा’ सामाजिक केंद्रात आयोजित आदिवासी महिला मेळाव्यात डॉ. कार्व्हालो बोलत होत्या. डॉ. ज्यो डिमेलो, भविष्य निर्वाह निधी विरार शाखेच्या शर्मिला मेस्त्रीे, सुमा, सरपंच जॉन्सन हे या वेळी प्रामुख्याने उपस्थित होते.
डॉ कार्व्हालो पुढे म्हणाल्या, आपण पुरूषांनाच माणूस म्हणतो. परंतु बाई ही सुद्धा माणूसच आहे. ती ढोर-कुत्रा,मांजर नाही. ती  छोट्या मोठ्या गोष्टींतून काटकसर करून नवर्‍याच्या संसार पीठात थोडंसं आपलंही मीठ घालून संसाराला चव आणते. या काटकसरीतून ती मुलांच्या शिक्षणाला, घरातील आजारपणाला, औषध-पाण्याला हातभार लावते. बाईकडे मोठी ऊर्जा शक्ती असते. म्हणून तीला गृहीत धरल्या जाऊ नये.
सिस्टर दिप्ती यांनी मेळाव्याचे आयोजन केले होते. त्यांनीच कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. डॉ. ज्यो डिमेलो, शर्मिला मेस्त्री, सरपंच जॉन्सन यांचीही समयोचीत भाषणे यावेळी झालीत. मेळाव्यासाठी 200 हून अधिक आदिवासी महिला उपस्थित होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!