नात्याची गोष्ट : माझा संचू उर्फ संचित ! – रेखा शां. बोऱ्हाडे

संचित, माझ्या दोन अपत्यांमधला थोरला एकमेव सुपुत्र, संचित आणि शिवानी ही माझी दोन अपत्ये.  नुकताच संचितचा वाढदिवस झाला आणि मी  घरात एकटीच बसली असतांनाच अचानक त्याचा गेल्या 30 वर्षांचा चित्रपट झर्रकन  डोळ्यासमोरुन गेला. असे वाटले, काल परवापर्यंत तो अगदी दुडू दुडू धावत होता. उड्या मारत होता. मग तो एवढा मोठा कधी झाला, माझा संचू ? खरंच लहान असतांनाची तो त्याची मस्ती, तो खोडकरपणा अगदी श्रीकृष्ण कसा खोड्या करायचा, अगदी तशाच !  व म्हणून मी तो इथे तिथे धावू नये म्हणून त्याचा एक पाय कपाटाच्या पायाला बांधून ठेवत असे. हो पण तो कधीही मस्ती केली किंवा खोड्या केल्या तरीही स्वतःला इजा करून घेत होता कधीही दुसऱ्याला त्या होऊ दिल्या नाहीत व आजही तो तसाच आहे.
लहान असल्यापासून त्याला प्राण्यांची खूप आवड. कुठंही कुत्रा, मांजर, कोंबडी कोणतेहि प्राणी दिसले की तो घरात आणायचा. मला आठवतं, लहान अगदी 2 वर्षांचा होता आणि आमच्या  गोरेगाव च्या घरात एक सापाचे पिल्लू  आले होते. मी कामामध्ये व्यस्त होते. संचित मात्र त्या सापाबरोबर छान खेळत होता. बराच वेळ झाला, त्याचा आवाज आला नाही म्हणून मी बघितले तर तो  सापाबरोबर  खेळत होता. एक क्षण अंगाचे पाणी पाणी झाले. जोरात ओरडली तेंव्हा शेजारचा उमेश आला आणि त्याने संचित ला उचलले. क्षणभर मी गोंधळून गेले. तो सर्प राजाही त्याच्याबरोबर अगदी खुशीत खेळत होता. किती आठवणी आहेत संचितच्या. ह्या आठवणी डोळ्यासमोर येता येता तो एवढा मोठा कधी झाला, हे मी विसरूनच गेले. परंतु खरं सांगू,  2012 मध्ये डॅडी गेले तेव्हा तो कोलमडून पडला होता. आम्हीही तेवढेच कोसळलो होतो. पण मला कळत होते, कारण डॅडीचा जीव माझ्या पेक्षा ही जास्त संचितवर होता आणि म्हणूनच त्या दिवसापासून ठरवले की माझ्या संचुला कुठल्याही गोष्टी मध्ये डॅडीची उणीव भासू द्यायची नाही. माझ्या परीने मला जेवढे जमेल तेवढे मी शिवानी व संचितसाठी केले. त्यातून काही राहून गेले असेल तर बाळांनी मला माफ करावे. माझी मुलं मला माफी कशाला मागते ? असंच म्हणतील, परंतु माफी कुणीही आईनेही मुलांकडे मागितली म्हणून काही कमीपणा नसतो . एक लक्षात ठेवायला हवे की नेहमी आपण दुसऱ्यांना मोठे करते वेळी आपल्याकडे थोडा कमीपणा घेतला तरी चालेल.
 दुसऱ्यांना मोठे करते वेळी आपण थोडा कमीपणा घेतला तर त्याचा आनंद काही वेगळाच असतो . मुलांना खूप काही शिकायचे आहे, तर काही गोष्टी ती न सांगता शिकलीत.  तरीही नेहमीच विद्यार्थी दशेत रहावे, त्यांना खूप शिकायला मिळेल.         मी  खूप काही  आई म्हणून शिकवले असेल, पण मीही मुलांकडून खूप शिकले.          संचित त्याच्या डॅडी सारखाच दुसऱ्याच्या चेहऱ्यावर आनंद पहात असतो. अर्ध्या रात्री कुणाचा अपघात झाला , कुणाच्या आई-वडिलांचे निधन झाले किंवा कोणी आजारी पडले तर वेळेची तमा न बाळगता तो धावत सुटतो, स्वतःच्या जीवाची पर्वा न करता. अशा अनेक चांगल्या गोष्टी त्याच्या हातून घडतात व म्हणूनच मला संचितचा अभिमान वाटतो.  आणि खरं सांगू तो सगळ्यांना इतका आवडतो की मी माझ्या मैत्रिणींमध्ये, नातेवाईकांमध्ये व इतर ठिकाणी नेहमी ऐकते की , तुमचा मुलगा शांत, निःस्वार्थी, लाघवी स्वभावाचा आहे, तेंव्हा मला खरंच त्याचा खूप अभिमान वाटतो. मी माझ्या आईवडिलांची मान नेहमी उंच ठेवली, संचितनेही तसेच रहावे. वाईट गोष्टींपासून नेहमीच लांब रहायला हवे व चांगल्या गोष्टी जोपासत रहायला हवे. काल त्याला ओवाळत असतांना मी त्याच्याकडे पाहिले, तो अगदी त्याच्या डॅडी सारखाच दिसतो. त्यांची छबी संचित मधे दिसते. डॅडींनी हजारात नाही, लाखात नाही तर करोडों मध्ये नाव कमावले. अगदी संचितनेही  तसेच त्याचे नांव उज्ज्वल केले पाहिजे, हे तर त्याच्या संचितात आहे. मी संचितला खूप खूप शुभेच्छा देते. या वाढदिवसाला मी त्याला काही देऊ शकले नाही, पण माझे आशीर्वाद, माझ्या शुभेच्छा सदैव त्याच्या बरोबर राहतील. “देव जरी मज कधी भेटला, माग हवे ते माग म्हणाला. म्हणेन प्रभू रे, माझे सारे जीवन देई मम बाळाला”, हीच माझी माझ्या लेकाबद्दल, संचित बद्दलची भावना आहे.
– रेखा शां. बोऱ्हाडे, साई सप्तर्षी, जय महाराष्ट्र नगर, बोरीवली (पूर्व), मुंबई-400066. भ्रमणध्वनी-9969261202.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!