नाना शंकरशेट स्मारकाच्या जागेवर फक्त गवतच ? उध्दवजी, तुमच्या शिवाय तरणोपाय नाही – जयंत करंजवकर

आदरणीय उध्दवजी बाळासाहेब ठाकरे,

मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य.

जय महाराष्ट्र !

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा मुंबईवर ५० वर्षांहून अधिक काळ अधिराज्य होते. ते मुंबईचे अनभिषिक्त राजेच होते, असे म्हटलं तर वावगे ठरणार नाही. दिल्लीत एका चॅनलने तेथील तरुणांना विशेषत: महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना महाराष्ट्राचं नाव घेतलं की तुमच्यासमोर कोणाचे नाव समोर येते तर त्यांचं उत्तर एकच, ‘शिवसेना व बाळासाहेब ठाकरे’, म्हणून सत्ता असो वा नसो बाळासाहेबच मुंबईचे अनभिषिक्त राजे होते. इंग्रजांचे राज्य आलं आणि स्थानिक अज्ञानी लोकांशी संवाद कसा साधायचा हा खरा प्रश्न त्यांच्यासमोर होता. त्यावेळी एक मराठी माणूस पुढे आला आणि त्याने इंग्रजाना सामाजिक कार्यासाठी आणि वेळप्रसंगी समाजाच्या उध्दारासाठी आर्थिक मदतही केली. ते होते नाना उर्फ जगन्नाथ शंकरशेट… संयुक्त महाराष्ट्राचे ‘तुफान’ आचार्य अत्रे यांनी नानांच्या कार्याचा यथार्थ गौरव केला आहे. ते म्हणतात…

‘मुंबईचा अनभिषिक्त राजा’ ही पदवी जर यथार्थत्वाने कोणाला देता येईल तर ती नाना शंकरशेट यांनाच. ही पदवी दुस-या कोणाही माणसाला लावता येणार नाही. गेल्या दीडशे वर्षात मुंबईमध्ये अलौकिक चारित्र्याची आणि कर्तृत्वाची अनेक माणसे होऊन गेली. पण त्या सर्व मंडळींमध्ये नाना शंकरशेट यांच्या एवढा प्रचंड माणूस कोणीही दाखवता येणार नाही. एखाद्या डोंगरामधून जशी एखादी नदी उगम पावावी, त्याप्रमाणे आजची मुंबई ही या प्रचंड माणसाच्या कर्तृत्वामधून उगम पावल्यासारखी वाटते. नाना म्हणजे बुध्दी, विद्वता आणि कर्तृत्व यांचा एक महासागरच होता आणि या त्यांच्या गुणांना श्रीमंती आणि दातृत्व यांची विलक्षण जोड इलस्ली होती. त्यामुळे मुंबईचे नेतृत्व आपोआपच त्यांच्यांकडे चालत आले. नाना हे जनतेचे स्वयंभू नेते होते. मराठयांचे राज्य ज्यावेळी गेले, त्यावेळी नाना अवघे पंधरा वर्षाचे होते. स्वराज्याचा सूर्य त्यांच्या डोळयादेखत मावळला. सर्वत्र अंधार पडला. इंग्रजांचे राज्य सुरू झाले. त्यांची भाषा परकी, संस्कृती परकी, त्यांच्या राजवटीत आपले भवितव्य काय आहे ह्याचा जनतेला बोध होईना. अशा बिकट काळात परकीय राज्यकर्ते आणि स्वकीय जनता यांचा दुवा साधण्याचे अदभुत कार्य नानांनी केले. ज्या काळात शाळा नव्हत्या, कॉलेज नव्हती, विश्वालायेही नव्हती त्या काळात विद्या संपादन करणे किती अवघड असले पाहिजे? पण तशाही परिस्थितीत मराठी, संस्कृत आणि इंग्रजी भाषेत नानांनी विलक्षण प्रावीण्य मिळविले. त्यामुळेच त्यांच्या व्यक्तिमत्वाची इंग्रज राज्यकर्त्यांच्या मनावर एकदम छाप बसली. इतकी की नानांना विचारल्याशिवाय कोणतीही गोष्ट करण्यास इंग्रजांना मुश्किल झाले, अशाप्रकारे आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांनी मुंबईचे आद्यशिल्पकार नाना शंकरशेट यांच्या कार्याचा गौरव केला आहे. नाना शंकरशेट हे मुंबईचे सुमारे ४५ वर्षे अनभिषिक्त राजे होते. इंग्रजांना नानांच्या सल्ला व सहकार्याशिवाय मुंबईत कोणतीही योजना राबविता येत नव्हती. एवढा त्यांच्यावर जनमानसाचा पगडा आणि विश्वास होता.

भारतात रेल्वे सुरू करायची होती तेव्हा लोकांनी इंग्रजांविरोधात प्रचंड नाराजी व कडवा विरोध केला होता. नानांनी गिरगावात पहिली मुलींची शाळा सन १८४८ ला स्थापन केली. परंतु रूढी व अंधश्रध्देच्या विळख्यातील लोकांनी नवविचार आत्मसात करावे म्हणून नानांनी स्वत:च्या वाडयात मुलींची शाळा आणि रेल्वे ऑॅफिस सुरू केले त्यानंतर लोकांनी इंग्रजांच्या योजनांना पाठींबा देण्यास सुरुवात केली.

मा.उध्दवजी, हा सर्व शब्द प्रपंच करण्याचा उद्देश एवढाच की, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी व्हिक्टोरिया टर्मिनस (बोरिबंदर) रेल्वे स्टेशनला मुंबईचे आद्यशिल्पकार नाना शंकरशेट यांचे नाव द्यावे म्हणून अथक प्रयत्न केले. परंतु तत्कालीन रेल्वे मंत्री सुरेश कलमाडी यांनी काहीही थांगपत्ता लागू न देता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस नाव दिले. आता महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज आहेत, म्हणून ते नाव सर्वमान्य झाले, असो… आज महापुरुषांच्याबाबत काय आढळून येते राज्यात व केंद्रात काँग्रेस सरकार ५० हून अधिककाळ होते म्हणून जवाहरलाल नेहरू, संजय गांधी, इंदिरा गांधी, राजीव गांधी यांच्या नावाची मांदियाळी परंपरा राबविली. त्यानंतर प्रत्येक समाजाने देशाचे महान नेत्यांना समाजाची बिरुदे लावली. हे समाज राजकीय पक्षांसाठी वोट बँक आहेत. त्या महान पुरुषांचे स्मारक, पुतळे, महामंडळे सर्वत्र दिसत आहेत. परंतु नाना शंकरशेट यांच्या मागे वोट बँक नसल्याने त्यांचे स्मारक होऊ शकले नाही, ना मंत्रालयात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते फोटो पूजन होऊ शकले आणि ना त्यांच्या वाडयात असलेली १७० वर्षांची पहिली मुलींची शाळेचे जतन, इतके हे नाना शंकरशेट याबाबतीत ‘शापित यक्ष’ ठरले.

मा. उध्दवजी, आपल्याला नानांच्या अफाट सामाजिक कार्याबद्दल ठाऊक आहे. त्याची येथे मी उजळणी करणार नाही. पण एक गोष्ट आपल्या निदर्शनास आणू इच्छितो, ती म्हणजे मुंबई महापालिकेने नानांच्या स्मारकासाठी वडाळा येथे दोस्ती नगरच्या परिसरात फक्त नि फक्त १५०० स्क्वे. फूट जमीन दिली आहे आणि त्याचे भूमिपूजन पाच वर्षापूर्वी राज्यपाल श्री. विद्यासागर राव यांच्या हस्ते झाले. त्या कार्यक्रमाला आपणही प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होता. त्यावेळी नानांच्या स्मारकासाठी पालिकेने १५०० स्क्वे. फूट जागा दिल्याबद्दल आपण पालिका प्रशासनावर सडकून टीकाही केली होती. मुंबईचे आद्यशिल्पकार, अनभिषिक्त राजा नाना शंकरशेट यांनी समाजाच्या कल्याणासाठी स्वत:च्या मूल्यवान जागा दिल्या होत्या आणि पालिका प्रशासनाने फक्त १५०० स्क्वे. फूट जमीन दिली म्हणून आपण पालिका प्रशासनावर सडकून टीकाही केली होती. पण आज नानांचं स्मारक होण्यास पोषक व पूरक वातावरण आहे कारण मुख्यमंत्री म्हूणून तुम्हीच त्यांच्या स्मारकाला न्याय देऊ  शकता. विशेष म्हणजे वडाळाच्या भूमीपूजनानंतर आजतागायत एक वीटही लागली नाही. त्याला कारण ज्या सोनार समाजाला पालिकेने ही जागा सुपूर्द केली तो समाज मोरारजी देसाई यांच्या सुवर्ण नियंत्रण कायद्यामुळे उध्वस्त झाला आहे आणि त्यात आता बंगाली सुवर्णकार कारागिरांनी हा दागिन्यांचा व्यवसाय काबीज केल्याने मराठी सुवर्णकार विविध क्षेत्रात शिक्षण घेऊन सरकारी व खासगी प्रशासनाच्या कामात मग्न झाला आहे. या समाजाकडे हाताच्या बोटावर मोजण्या इतकेच सोन्याचे व्यापारी आहेत. नानांचं स्मारक उभारण्यासाठी १५ कोटींची गरज आहे. नानांनी एलफिन्स्टन महाविद्यालय उभारण्यासाठी मोलाचे योगदान दिले. त्या महाविद्यालयात बाळशास्त्री जांभेकर यांनी पदवी मिळवली. तेच त्या महाविद्यालयात प्राध्यापक म्हणूनही होते. महाराष्ट्रात पाहिले मराठी ’दर्पण’ दैनिक त्यांनी प्रसिध्द केले म्हणून त्यांना मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक म्हटले जाते. त्यांचे सिंधुदुर्ग येथील ओरस येथे स्मारक उभारण्यात आले आहे. त्यासाठी महाराष्ट्र शासनाने पाच कोटीचे सहाय्य दिले. परंतु नानांनी एल्फिन्स्टन महाविद्यालय उभारले म्हणून त्या महाविद्यालयातून मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक निर्माण झाले. मात्र नाना शंकरशेट यांचे वडाळा येथे स्मारक निधी अभावी उभारता येत नाही. याला काय म्हणावे? माझी माहिती अशी आहे की, वडाळा येथे नानांचे स्मारक दिलेल्या कालमर्यादेत उभारण्यात आले नसल्याने पालिका ती जागा स्वत:च्या ताब्यात घेणार असल्याचे समजते. जर ही जागा पालिकेच्या ताब्यात गेली तर मुंबईच्या आद्यशिल्पकाराची आणि राज्य सरकारची इभ्रत लयास जाणार यात शंका नाही. विशेष म्हणजे आपण स्वत: नानांच्या स्मारकाच्या भूमीपूजन कार्यक्रमाला उपस्थित होता, त्यामुळे तुमचीही राज्याचे मुख्यमंत्री म्हणून जबाबदारी वाढणार आहे, म्हणून हा पत्र प्रपंच. एक मात्र मान्य करावे लागेल, कदाचित नाना शंकरशेट यांचे स्मारक तुमच्याच हस्ते व्हावे असे नियतीला वाटत असेल. तसे घडल्यास शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनाच सर्वात मोठे समाधान मिळणार आहे.

    कळावे,

    लोभ असावा, लोभ वाढवावा !

जयंत करंजवकर (ज्येष्ठ पत्रकार व स्तंभ लेखक – ८३६९६९६६३९/jayant.s.karanjavkar@gmail.com)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: