नायगांव-भाईंदर सहापदरी खाडीपुलाचे कामसुरु

वसई (प्रतिनिधी) : गेल्या पाच-सहा वर्षांपासून रखडलेल्या नायगांव-भाईंदर खाडीवर सहापदरी पुलाच्या कामाला सुरवात झाली असून,या कामाच्या निविदा प्रसिध्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे वसईकरांना आता लोकलवर अंबलवून न राहता थेट रस्त्याने मुंबईला जाता येणार आहे.

नायगांव, वसई, नालासोपारा, विरार या शहरांतून लाखो लोक दररोज कामनिमीत्त मुंबईला जात असतात. त्यात पेन्शनसाठी जाणाऱ्या वृध्दांचा आणि शिक्षणासाठी जाणऱ्या विद्यार्थ्यांचाही मोठया प्रमाणात समावेश आहे. या सर्वांना दुसरा मार्ग नसल्यामुळे लोकलवर अवलंबून रहावे लागत आहे. ही बाब लक्षात घेवून आमदार हितेंद्र ठाकूर यांनी या खाडीवरील जुना रेल्वे पुल भंगारात न काढता हलक्या वाहनांसाठी खुला करावा अशी मागणी सातत्याने केली होती.

मुंबईला जाण्यासाठी लोकल व्यतिरिक्त महामार्ग क्र.८ चा पर्याय आहे. मात्र,या मार्गाने जाण्यासाठी स्वतःच्या वाहनाशिवाय पर्याय नाही. तसेच इंधन,पैसा आणि वेळेचाही अपव्यय होत असल्यामुळे खाडीपुल हा जवळचा मार्ग असल्याचे हितेंद्र ठाकूर यांनी आपल्या मागणीत नमुद केले होते. अनेक वर्षे पाठपुरावा केल्यानंतर त्यांच्या या मागणीला यश येवून भाईंदर खाडीवरील तीन पदरी पुलाला एम.एम.आर.डी.ए.ने २०१५ साली मान्यता दिली होती.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या एम.एम.आर.डी.ए.च्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला होता. यावेळी या प्राधिकरणाचे सदस्य म्हणून वसई-विरारचे महापौर नारायण मानकर उपस्थित होते. या तीनपदरी पुलाच्या कामासाठी ८७५.५४ कोटी रुपयांचीही मान्यता देण्यात आली होती. तसेच हे कामतीन वर्षात कामपुर्ण करण्यात येणार होते. पुलासाठी ७१८.१२ कोटी रुपये आणि पाणजु बेटाकरिता बाहु रस्ता बनविण्यासाठी २.२५ कोटी रुपये तसेच भुसंपादन,सेवा वाहिन्यांचे स्थलांतर आणि इतर खर्च मिळून ८७५.५४ कोटी रुपये खर्च त्यावेळी अपेक्षीत होता. या योजनेअंतर्गत पुलाला समांतर दहिसर-भाईंदर, वसई-विरार असा रस्ताही तयार करण्यात येणार आहे.

या पुलाच्या बातमीमुळे संपुर्ण वसई तालुक्यात आनंदाचे  वातावरण निर्माण झाले होते. वसईकरांचे कधीही थेट रस्त्याने मुंबईला जाण्याचे स्वप्न पुर्ण होणार आहे. तसेच या पुलामुळे रेल्वेवरील ताणही कमी होणार आहे.

मात्र, दरम्यानच्या काळात तांत्रिक अडचणींमुळे या पुलाचे काममार्गी लागले नाही. आता या बाबी पुर्ण झाल्या असून, हा पुल तीन ऐवजी सहापदरी करण्यात येणार आहे. तसेच कामाला विलंब झाल्याने ही योजना आता पंधराशे कोटींवर गेली आहे. या पुलासाठी आवश्यक असलेल्या मॅन्ग्रोज, वनविभाग, मिठागरे, मुंबई मेरीटाईमबोर्ड, इनलॅन्ड वॉटरवेज आणि महाराष्ट्र कोस्टल झोन यांच्या परवानग्या घेण्याचे कार्य सुरु करण्यात आले असून, पुलाच्या कामाच्या निविदा प्रसिध्द करण्यात आल्या आहेत. येत्या चार वर्षात रेल्वेला समांतर अशा रोडवरून मुंबईला स्वतःच्या वाहनाने जाण्याचे वसईकरांचे स्वप्न पुर्ण होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!