नालासोपारा (रमाकांत वाघचौडे) : कोकण पर्व कोकण सर्व या महामहोत्सवातील कालची संध्याकाळ गाजविली ती नायगावकर समूहन्रुत्य कलाकारांनी. कोळी समाज संस्कृती दर्शन या सत्रात नायगावच्या मुला मुलींनी व महिला कलाकारांनी बहारदार कोळी डान्स, समई ग्रुप डान्स, बाल्या डान्स सादर केले. समई नाचाला तर उपस्थित रसिकांनी वन्स मोअरचा प्रतिसाद दिला.
अत्यंत सफाईने आपल्या कलेचे सादरीकरण करणाऱ्या या सर्व कलाकारांनी घेतलेले सराव परिश्रम कमालीचे होते. योगायोगाने याच वेळी आम.राजेश पाटील व महापौर प्रविण शेट्टी यांनी महोत्सवातील कला विभागाला भेट दिली होती. या दोघांनी नायगावच्या या कलाकारांचे कौतुक केले.
दुसऱ्या सत्रात कोकणातील प्रसिध्द देवगडच्या भगवती दशावतार नाटय मंडळाने मायाजाल हे दशावतारी नाटक सादर केले. या प्रयोगातील कलावंतांनी सुध्दा आपल्या भूमिका समरसून साकारल्या आणि रसिकांच्या टाळयांचा प्रतिसाद मिळवला. प्रत्येक पात्राचा वेष आणि आवेश, खणखणीत आवाजातील संवाद व शब्दफेक या मायाजाल प्रयोगाची लज्जत वाढविणारी होती. रसिकांना खिळवून ठेवण्यात ही नटमंडळी कमालीची यशस्वी ठरली.
कोकणचे ज्येष्ठ समाजसेवक सावंत व भजन गायक सामंत बुवा यांनी या प्रयोगासाठी प्रयत्न केले. मायाजाल मधील सर्व कलावंतांचा महोत्सव आयोजकांनी अनेक मान्यवरांच्या हस्ते सत्कार केला.