नालासोपारात रिक्षाचालकांची संघटीत दादागिरी

वसई (वार्ताहर) : नालासोपारातील रिक्षाचालकांच्या संघटीत दादागिरीमुळे नागरिक हैराण झाले असून,अल्पवयीन रिक्षाचालकांनी एका तरुणासह त्याच्या वडीलांना बेदम मारहाण केल्याची घटना उघड झाली आहे.

२१ जुनला विनोद दोंतुल हा तरुण दुचाकीवरून वडीलांना घेऊन अलकापुरीरोड नालासोपारा पुर्व येथून आपल्या घरी जात असताना,एका रिक्षा चालकाने त्यांना त्यांच्या दुचाकीला धडक दिली. त्याचा जाब विनोदने विचारला असता,सदर रिक्षाचालक आणि तेथील त्याच्या काही रिक्षाचालक सहकाऱ्यांनी विनोदला आणि त्याचे वडील विजयकुमार यांनाही त्यांनी बेदम मारहाण केली.त्यावेळी हा प्रकार रस्त्याच्या पलिकडे असलेल्या विनोदच्या आईने पाहिला. त्यामुळे ती त्यांचा बचाव करण्यासाठी धावली असता,घसरून पडली.

या सर्व घटनेत विनोद आणि त्याच्या वडीलांना डोळयाखाली,गालाला आणि अंगाला मुका मार लागला.तर घसरून पडल्यामुळे विनोदच्या आईच्या पायाचे हाट तीन ठिकाणी मोडले.तीच्यावर महापालिकेच्या रुग्णालयात उपचार सुरु असून,त्यावर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.या मारहाणीची विनोदने तक्रार केल्यानंतर तुळींज पोलीस ठाण्याचे हवालदार भंवर घटनास्थळी गेले. तीथे मारहाण करणारे रिक्षाचालक हजर असतानाही त्यांनी कोणतीच कारवाई केली नाही.अर्ध्या चड्डीवर रिक्षा चालवण्याचा व्यवसाय करणाऱ्या १६-१७ वयोगटातील मुलांनी आपल्याला मारहाण केल्याचे विनोदने सांगूनही पोलीसांनी कोणतीच करावाई केली नाही.

याउलट तुला काय करायचे आहे.नस्त्या भानगडीत पडु नकोस असा दम पोलीसांनी दिला.तर इकडे येवू नकोस,अन्यथा पुन्हा तुला बेदम मारु अशी दमदाटी रिक्षाचालकांनी केल्याचे विनोदने सांगितले. अलकापुरी रोडवरील रिक्षाचालक नेहमीच नागरिकांना दादागिरी करतात.त्यातील अनेक जण अल्पवयीन आणि गुंड प्रवृत्तीचे आहेत.गणवेश न घालता,अर्ध्या चड्डीवर ते प्रवाशांची वाहतुक करीत असतात.या प्रकाराकडे पोलीसांची लक्ष वेधले असता,त्यांनी कानाडोळा केला.असा आरोप विनोदने केला.मारहाणीची इतकी मोठी घटना घडूनही पोलीसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल केला असून,या प्रकरणी न्यायालयात दाद मागण्याचा सल्ला दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: