नालासोपारा पूर्वेकडील तिकीट खिडकी रेल्वे परिसरात लवकरच शौचालयाची निर्मिती होणार ! – सचिन कदम

नालासोपारा (प्रतिनिधी) : मुंबई उपनगरीय पश्चिम रेल्वेवर जवळपास ३५ लाख प्रवासी प्रवास करतात. पश्चिम रेल्वेला २०१७-१८ मध्ये ८२५ कोटी ५२ लाख ९ हजार ७४५ रुपये उत्पन्न मिळाले आणि यामध्ये साधारण १९ कोटी ७८ लाख ५१ हजार रुपयांची भर पडली आहे. पश्चिम रेल्वेवरील चर्चगेट, मरीन लाईन्स, चर्नीरोड, ग्रॅण्टरोड, मुंबई सेंट्रल, महालक्ष्मी, लोअर परळ, प्रभादेवी या स्थानकांतील गर्दी ओसरत आहे.

तर दुसरीकडे पश्चिम रेल्वे मार्गावरील नालासोपारा हे अत्यंत महत्त्वाचे आणि गर्दीचे रेल्वे स्थानक आहे. सन २०१२-१३ मध्ये पश्चिम रेल्वे मार्गावरील नालासोपारा रेल्वे स्थानकातून सुमारे २,०२,९०३ प्रवाशी प्रवास करीत होते. आता सदर प्रवाशांची संख्या वाढून ४ लाखांहून अधिक प्रवाशी संख्या असलेले विरार रेल्वे स्थानकानंतरचे जलदगती मार्गावरील दुसरे क्रमांकावरील नालासोपारा रेल्वे स्थानक आहे. अधिकहून जास्त प्रवाशी हे विरार आणि चर्चगेट रेल्वे स्थानकातूनच तिकीट, पास काढत असल्यामुळे त्यांची नोंद नालासोपारा रेल्वे स्थानकात होत नाही.

नालासोपारा रेल्वे स्थानक परिसरात आणि आजूबाजूच्या वस्तीतील लोकसंख्या वेगाने वाढत आहे. परंतु तरीही प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वेने पुरेशी सोईसुविधा उपलब्ध नाहीत. रेल्वे स्थानक स्वच्छ ठेवण्यासाठी स्वच्छ भारत अभियानातर्फे रेल्वेला निधी दिला जातो. मात्र या निधीचा योग्यप्रकारे वापर करण्यात येत नाही. सदर रेल्वे स्थानकावर व रेल्वे स्थानक परिसरात नेहमीच घाणीचे साम्राज्य निर्माण झालेले असते. त्याचा प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

नालासोपारा पूर्वेकडे रेल्वे परिसरात एकही शौचालय उपलब्ध नसल्याने पुरुष हे ब्रिजखालच्या परिसराचा मुतारीसाठी वापर करतात. दिवसाढवळयाही मुतारीसाठी पुरुष मोठया संख्येने उभे असतात. त्यामुळे येथून ये-जा करणाऱ्या महिलांना मानखाली घालून जावे लागते. तसेच बाजूलाच तिकीट खिडकी असून सर्वत्र दुर्गंधीचे वातावरण असल्याने नाकावर रुमाल घेऊन प्रवाशांना तिकीट काढण्यासाठी उभे रहावे लागते व पादचाऱ्यांना ये-जा करावी लागते. तर शौचालय नसल्याकारणाने महिलांचीही कुचंबना होते.

याची गांभीर्याने दखल घेऊन नालासोपारा पूर्वेकडील तिकीट खिडकी रेल्वे परिसरात तातडीने शौचालयाची निर्मिती करण्याची मागणी दि.०१/०२/२०१९  रोजीच्या पत्राद्वारे मा.महाव्यवस्थापक पश्चिम रेल्वे चर्चगेट मुंबई, मा.मंडळ रेल्वे प्रबंधक पश्चिम रेल्वे मुंबई सेंट्रल, मा. स्टेशन प्रबंधक नालासोपारा रेल्वे स्थानक यांच्याकडेकरण्यात आलेली आहे.

त्यामुळे लवकरच नालासोपारा पूर्वेकडील तिकीट खिडकी रेल्वे परिसरात शौचालयाची निर्मिती होऊन सदर परिसर दुर्गंधी मुक्त तसेच महिलाची होणारी कुचंबना दूर होण्यास मदत होईल असे श्री.सचिन केशव कदम, अध्यक्ष नालासोपारा विधानसभा क्षेत्र राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!