ना.म.जोशी मार्ग बीडीडी चाळ प्रकल्प मार्गी ; चार इमारती डिसेंबर महिन्यात पाडणार

मुंबई (जयंत करंजवकर) : अनेक वर्षे रखडलेल्या बीडीडी चाळीच्या पुनर्विकास कामास  प्रारंभ होणार असून पहिल्या टप्प्यातील समावेश असलेल्या ना.म. जोशी मार्ग बीडीडी चाळीच्या दहापैकी चार इमारती पुढील डिसेंबर महिन्यात पाडण्यात येणार असल्याची माहिती म्हाडा मुंबई मंडळाचे सभापती मधु चव्हाण यांनी पत्रकारांशी बोलतांना दिली. हा प्रकल्प मार्गी लावताना अडसर ठरणा-या रहिवाशांवर म्हाडाकडून कारवाई केली जाणार असल्याचे स्पष्ट संकेत बुधवारी आयोजिलेल्या ना.म. जोशी मार्ग बीडीडी चाळ रहिवाशांच्या बैठकीत त्यांनी दिले. याप्रसंगी राहिवाशांनीही त्यास मान्यता दिली. 

भाजप-शिवसेना युती सरकाराच्या काळात नायगाव, वरळी आणि ना.म.जोशी मार्ग बीडीडी चाळ पुनर्विकास हा महत्वाकांक्षी प्रकल्प राबविण्याचे जाहीर करण्यात आले होते. त्यात ना.म.जोशी मार्ग चाळीचा समावेश आहे. या चाळीतील सुमारे २५० कुटुंबांचे पहिल्या टप्प्यात जवळच्या संक्रमण शिबिरात स्थलांतर करण्यात आले आहे. सुरवातीला या चाळीच्या पुनर्विकासात सात इमारतींचा समावेश होता. त्यानानंतर तीन इमारतींचा समावेश झाल्याने आता एकूण दहा चाळींचा पुनर्विकास होणार आहे.
मुंबई म्हाडा मंडळाकडून ना.म.जोशी मार्ग बीडीडी चाळीच्या राहिवाशांना संक्रमण शिबिरातील घरांच्या चाव्या देण्यात आल्या. परंतु पाच महिने झाल्यानंतरही २०० कुटुंबांचे स्थलांतर झाले नाही. त्यामुळे येथील रहिवाशांमध्ये चिंता निर्माण झाली होती. मात्र त्या संदर्भातील अडचणी लक्षात घेऊन सभापती मधु चव्हाण यांनी संबंधित अधिका-यांना आदेश देऊन आठवड्याभरात ही प्रलंबित कामे मार्गी लागली पाहिजेत, असे आदेश दिले आणि पुढील आठवड्यात रहिवाशांची कामे झाली की नाही याबाबत स्वतः या चाळींना भेट देण्याचे त्यांनी आश्वासन  उपस्थित बीडीडी चाळीच्या        पदाधिका-यांना दिले. या बैठकीत ‘पहिल्या टप्प्यात एकूण दहा इमारतीच्या पुनर्विकासाचा समावेश करण्यात आला असून , त्यातील ३,४,११ व १२ क्रमांकांच्या इमारती येत्या डिसेंबर महिन्यात पाडण्यात येतील’, असे सभापती मधु चव्हाण यांनी या बैठकीत स्पष्ट केले.
राष्ट्रपती राजवटीत पहिला महत्वपूर्ण निर्णय
महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवटीत प्रकल्प खोळंबणार अशी चिंता बीडीडी चाळींच्या रहिवाशांना वाटत होती आणि तशी ती त्यांनी बैठकीत व्यक्त केली. सभापती मधु चव्हाण यांनी या चिंतेचे निरसन करतांना ‘राष्ट्रपती राजवटीत प्रकल्प राबविले जाणार नाहीत, हा मोठा गैरसमज आहे. मंत्री मंडळ नसले तरी सरकारी अधिकारांच्या माध्यमातून या व अशा प्रकल्पाची कामे होत असतात. त्यामुळे पुढील डिसेंबर महिन्यात ना.म.जोशी मार्ग बीडीडी चाळीच्या चार इमारती पाडण्यात येतील व पुनर्विकासाच्या सुरवात होईल’, असे स्पष्ट केल्यानंतर उपस्थित रहिवाशांचे समाधान झाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!