निवडणूक आयोगाकडून राजेंद्र गावित यांना क्लिनचिट

वसई (वार्ताहर) : पोट निवडणूकीत थकबाकीचा दाखला न जोडल्याचा मुद्दा न्यायप्रविष्ठ असल्यामुळे आणि सद्द निवडणूकीत दाखला जोडण्यात आल्यामुळे राजेंद्र गावित यांचे चारही उमेदवारी अर्ज वैध ठरवण्यात आल्याचा निकाल पालघर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिला आहे.

मागील वर्षी झालेल्या पोट निवडणूकीत राजेंद्र गावित यांनी थकबाकी नसल्याचा दाखल जोडला नव्हता,त्यामुळे त्यांची उमेदवारी अपात्र ठरवण्यात यावी.अशी हरकत बुधवारी छाननीत उमेदवार तथा काँग्रेसचे माजी खासदार दामोदर शिंगडा यांचे पुत्र सचिन शिंगडा यांनी घेतली होती.त्यामुळे याबाबतचा निकाल राखून ठेवण्यात आला होता.त्यानंतर अधिनियम विचारात घेवून गावित यांचा अर्ज वैध ठरवण्यात आला आहे.पोट निवडणूकीत गावित यांनी थकबाकी नसल्याचा दाखला जोडला नव्हता,हे प्रकरण न्याय प्रविष्ठ असल्यामुळे छाननीत तो मुद्दा विचारात घेतला जाणार नाही. आणि सद्द निवडणूकीत गावित यांनी थकबाकीचा दाखला जोडला असल्यामुळे त्यांचे चारही उमेदवारी अर्ज वैध ठरवण्यात येत असल्याचा आदेश निवडणूक निर्णय अधिकारी प्रशांत नारनवरे यांनी दिला आहे.

गावितांच्या अर्जावर हरकत घेणाऱ्या सचिन शिंगडा यांचा एक उमेदवारी अर्ज मात्र,अवैध ठरवण्यात आला आहे.शिंगडा यांनी काँग्रेस पक्षाचा एबी फॉर्म न दिल्यामुळे त्यांचा पक्षीय अर्ज बाद करण्यात आला असून,अपक्ष म्हणून ते रिंगणात आहेत.दाखल असलेल्या 32 अर्जांपैकी हा एकमेव अर्ज बाद झाल्यामुळे आता 21 उमेदवारांचे 31 अर्ज वैध ठरले आहेत.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!