निसर्गाला मनुष्याच्या हव्यासापासून वाचविणे गरजेचे – पर्यावरणतज्ञ प्रणाली राऊत

पालघर (प्रतिनिधी) : सोनोपंत दांडेकर महाविद्यालयात पर्यावरण जनजागृतीसाठी संपन्न झाल्या विविध स्पर्धा.जागतिक तापमान वाढ अपरीमित झाल्यास पृथ्वीवरील जीवसृष्टी अवघ्या तीस वर्षांमध्ये नष्ट होण्याचा धोका आहे असे प्रतिपादन सौ. प्रणाली राऊत यांनी सोनोपात दांडेकर महाविद्यालयात संपन्न झालेल्या कार्यक्रमात केले. जीवसृष्टीला वाचविण्यासाठी भारतीय जीवनशैली अंगीकारून गांधीजींनी सांगितल्याप्रमाणे गावा-खेडयांमध्ये राहून शहरी जीवनशैलीचा सर्वसंगपरित्याग केल्याशिवाय पृथ्वीवरील डोंगर टेकडया व त्यांवर वसलेली जंगले वाचणार नाहीत. पृथ्वीला आणि जीवसृष्टीला माणसाच्या हव्यासा पासून वाचवणे गरजेचे आहे असे म्हणताना माणूस म्हणजे इच्छेचे गाठोड आहे असे उद्गार त्यांनी काढले.

पर्यावरणासंदर्भात जनजागृती करण्यासाठी सोनोपंत दांडेकर महाविद्यालय नेहमीच पालघर परिसरात अग्रेसर ठरले आहे. जागतिक पाणथळ जागा संवर्धन दिवसानिमित्त सोनोपंत दांडेकर महाविद्यालयाच्या वनस्पतीशास्त्र व प्राणीशास्त्र विभागातर्फे भित्तिचित्र व टेरीरिअम स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते यात एकूण १२५ विद्यार्थ्यांनी भाग घेतला व महाविद्यालयाच्या भिंतींवर निसर्ग संवर्धनाचे संदेश देणारे देखावे काढले, तत्पूर्वी महाविद्यालयाच्या वनस्पतीशास्त्र विभागातर्फे बोटॅनिकल गार्डन येथे जाणारा रस्ता सुशोभित करण्यासाठी जलसंवर्धन हा विषय विद्यार्थ्यांना देऊन भित्तिचित्र स्पर्धांचे आयोजन केले होते. विद्यार्थ्यांमध्ये उत्साह निर्माण होण्यासाठी व त्याना प्रोत्साहित करण्यासाठी महाविद्यालयातर्फे बक्षीस वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महाविद्यालय आणि कॅम्लीन कोकुयो यांच्या संयुक्त विद्यमाने बक्षीस वितरण समारंभ पार पडला. या समारंभात मुलांच्या मनावर पर्यावरणाचे महत्व कोरले गेले पाहिजे त्यासाठी महाविद्यालयातर्फे पर्यावरण तज्ञ सौ.प्रणाली गिरीश राऊ त यांचे व्याख्यान ठेवले होते. सौ प्रणाली गिरीश राऊ त यांनी मुलांना जागतिक तापमान वाढी बद्दल अत्यंत महत्वाची माहिती दिली.

या प्रसंगी प्रमुख अतिथी कॅम्लीन कोकुयो चे व्यवस्थापक अजित राणे यांनी मुलांच्या उपक्रमशीलतेचे कौतुक करताना सोनोपंत दांडेकर महाविद्यालय अनेकविध क्षेत्रात देत असलेल्या बहुमोल योगदानाबद्दल महाविद्यालयाची प्रशंसा केली. तसेच आपल्या सुप्त गुणांचा विचार करून त्यांना वाव देण्याचा प्रयत्न करावा असाही सल्ला त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.

सदर कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून कॅम्लीन कोकुयो चे व्यवस्थापक अजित राणे व प्रख्यात पर्यावरणतज्ञ सौ प्रणाली गिरीश राऊत प्रमुख वक्ता म्हणून उपस्थित होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किरण सावे यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना केली. सोनोपंत दांडेकर शिक्षण मंडळीचे उपाध्यक्ष चंद्रकांत दांडेकर, सोनोपंत दांडेकर शिक्षण मंडळीचे सचिव प्रा. अशोक ठाकूर, प्राणीशास्त्र विभागाच्या विभाग प्रमुख प्रा. सीमा देशमुख, वनस्पती शास्त्र विभागप्रमुख प्रा.बी.एन.जयस्वाल, प्रा.अस्मिता राऊत, प्रा.भूषण भोईर आणि इतर शिक्षक वर्ग व विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!