न्यायालयातील प्रलंबीत दावे नियंत्रित करण्यासाठी समन्वयाचा पर्याय महत्वाचा – न्या. एम.पी.दिवटे

वसई, दि.११ (वार्ताहर) : न्याय पालिकांमध्ये वर्षानुवर्षे प्रलंबित असलेले विविध प्रकारचे खटले आणि दावे यांचा न्यायालयावरील सतत वाढता भार कमी करण्यासाठी मध्यस्त आणि समुपदेशातून वादी आणि प्रतिवादी यांच्यात समन्वयाद्वारे समेट घडवून आणणे, हा महत्वाचा पर्याय ठरणार असून, त्या अनुषंगाने प्रोत्साहन देण्यासाठी आपण लवकरच एका जनजागृतीपर माहितीपटाची निर्मिती करणार असल्याची घोषणा वसईच्या जिल्हा सत्र न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती एम पी दिवटे यांनी केली आहे.
‘वसई तालुका बार असोसीएशन’तर्फे नुकतेच वकील, न्यायाधीश आणि न्यायालयीन अधिकारी-कर्मचारी यांच्या संयुक्त सहभागातून स्नेहसंमेलनाचे आयोजन म. ग. परुळेकर हायस्कुल सभागृहात करण्यात आले होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून न्या.दिवटे बोलत होते. याप्रसंगी विशेष अतिथी म्हणून वसईतील जिल्हा सत्र न्यायालयासह विविध न्यायालयांचे न्या.आर. आर. भोसले, न्या.सुब्बाराव वडाळी, न्या. आर. डी. चव्हाण, न्या. एस. एन. भोसले, न्या. वाय. जी.दुबे, न्या.एस. बी. पवार, न्या. आर. व्ही. कदम, न्या. वाय. ए. जाधव इ. मान्यवर उपस्थित होते.
वकिली व्यवसायातील दैनंदिन ताण-तणाव सांभाळून वसईतील वकील मंडळी आप-आपली कला आणि व्यासंग उत्तमरीतीने जोपासत असून, अश्या संयुक्त कार्यक्रमामुळे वकील आणि न्यायाधीश यांच्या परस्पर संबंधातील सौहार्दपणा टिकून राहण्यास हातभार लागेल, असे गौरवोद्गार न्या. दिवटे यांनी यावेळी काढले.तसेच प्रस्तावित माहितीपट निर्मितीची जबाबदारी ‘वसई तालुका बार असोसीएशन’च्या उपाध्यक्षा ऍड साधना धुरी यांच्यावर सोपवीत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
या प्रसंगी प्रारंभी पुलवामा दहशतवादी हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर झालेल्या स्नेहसंमेलनात वकील आणि न्यायाधीश मंडळींनी गाणे, कविता, शेरो-शायरी,जोक्स, मिमिक्री, समूह नृत्य, समूह गायन, विविध राज्यांची परंपरा प्रदर्शित करणारा फॅशन शो असा वैविध्यपूर्ण सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला. अलीकडेच निवृत्त झालेल्या न्या.आर. आर. भोसले व न्या. वाय. जी.दुबे यांचा सत्कार करून, तसेच त्यांना भेट-वस्तू देऊन  निरोप देण्यात आला. स्नेहसंमेलनाचे नियोजन, तथा सूत्रसंचालन ऍड साधना धुरी आणि ऍड नयन जैन यांनी केले.  बार असोसिएशनचे अध्यक्ष ऍड पी एन ओझा, ऍड प्रीती तिवारी, ऍड अश्फाक हुसेन, ऍड सारिका कोडे आदी पदाधिकारी व वकील मंडळींनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!