
वसई (वार्ताहर) : वसई तालुका हा अनेक वर्षापासून कृषी संपन्न तालुका म्हणून ओळखला जात होता. वसईची केळी, वसईचा भाजीपाला, वसईची सोनचाफ्यासारखी अनेक प्रकारची फुले तसेच दुध दुभते यासाठी वसई तालुक्याचे संपूर्ण महाराष्ट्रात नाव होते व आहे. वसईकर भूमिपुत्र शेतकऱ्यांच्या वतीने त्याच्या प्रश्नांबाबतचे निवेदन सोमवार दि.३०.११.२०२० रोजी निर्मळ येथील उष:काल या सभागृहात खा.गावित यांच्यासोबत झालेल्या ‘शेतीनामा’ या शेतकऱ्याच्या संवादामध्ये देण्यात आले.
१) शेतकरी व शेतमाल याला लोकलने प्रवास करण्याची तात्काळ परवानगी मिळावी.
२) तालुक्यातील दुध, फुले व अन्य नाशवंत अश्या शेती उत्पादनासाठी सरकारी शित गृह तात्काळ निर्माण करण्यात यावे.
३) शेतमालाच्या विक्रीसाठी शासनाने तालुक्यात उपलब्ध करून दिलेल्या मार्केट यार्डाच्या जमिन मिळकतीचा तिढा तात्काळ सोडवून तेथे मार्केट यार्डाची आणि शेती उत्पादने साठवण्यासाठी गोडाऊनची निर्मिती करण्यात यावी.
४) शासकीय पातळीवर शेतीयुक्त जोड उत्पादनासाठी लघु-उद्योगाची निर्मिती होण्यासाठी शासनाच्या लघु उद्योजकाच्या वतीने तरुण शेतकऱ्याचा “लघु-उद्योजक रोजगार मेळावा” आयोजित करण्यात यावा.
५) लघु-उद्योगाच्या उभारणीसाठी शासकीय जमिनीची उपलब्धता करून देण्यात यावी आणि तेथे सर्व पायाभूत सुविधांची उभारणी करण्यात यावी.
६) तालुक्यातील ज्या शेतकऱ्यांना पावसाळ्याव्यतिरिक्त अन्य मोसमामध्ये शेती उत्पादने घेण्यासाठी पाण्याची व्यवस्था नाही त्यांना आवश्यक त्या माध्यमातून मुबलक पाणी शेती करता उपलब्ध करून द्यावे.
७) शेती लागवडी मध्ये उत्पन्न वाढीच्या दृष्टीने आणि उत्पादित मालाचा दर्जा सर्वोत्तम असण्याच्या दृष्टीने आणि उत्पादित मालाला उपलब्ध बाजार पेठ याचे नियमित मार्गदर्शन होण्यासाठी शासनाच्या कृषी विभागाकडून नियमित मार्गदर्शन मेळावे आयोजित करण्यात यावे.
८) शेतकऱ्यांच्या प्रश्नांची सोडवणूक होण्यासाठी तालुका उपविभागीय अधिकारी, तहसीलदार आणि कृषी अधिकारी यांचा सातत्याने संवाद व्हावा यासाठी कायम स्वरूपी व्यवस्था निर्माण करण्यात यावी.
९) तहसीलदार कोर्ट कायद्याअंतर्गत शेतीवर पाणी जाण्याचा मार्ग किंवा वहिवाटीचा मार्ग खुला करणेबाबत तसेच महसूल अधिनियमाअंतर्गत शेतकऱ्यांच्या विविध अधिकार हक्कांबाबत असलेले अनेक दावे वर्षानुवर्षे मा. तहसीलदार यांच्या कार्यालयात प्रलंबित असणेबाबत अनेक शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत त्याबाबत मा.तहीसालदार यांच्यासोबत दावे निकाली निघणेबाबत तातडीची बैठक बोलविण्यात यावी.
१०) तालुक्यातील अनिर्बंध बेकायदेशीर माती भराव व बांधकामामुळे पावसाळ्यात शेतामध्ये जमा होणारे प्रचंड पाणी यामुळे केळी आणि अन्य शेती लागवडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. त्यामुळे पावसाळी पाण्याचा मोठ्या प्रमाणात निचरा होण्याचे बंद झालेले मार्ग मोकळे होणेबाबत उचित कार्यवाही तसेच यापुढे अनिधकृत माती भराव होऊ नयेत तसेच झालेले माती भराव दूर करण्याची कारवाई अतिशिग्रतेने व्हावी म्हणून कायमस्वरूपी प्रशासकीय यंत्रणा उभी करून संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करणेबाबत मा.जिल्हाधिकारी, मा.तालुका उपविभागीय अधिकारी, मा. तहसीलदार आणि पालिका आयुक्त यांच्या सोबत बैठक लावून त्यात निर्णय घेण्यात यावेत.
११) शासकीय खत डेपो तात्काळ सुरू करावा.
१२) शेती अवजारे व अन्य बाबतीत शासकीय अनुदान मिळावे.
१३) Horticulture Zone ची निर्मिती करावी.
१४) नैसर्गिक आपत्तीची नुकसान भरपाई शेतकऱ्यांना विना विलंब मिळावी.
१५) सोपारा येथील १०० वर्षाचे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद असलेले मार्केट तात्काळ सुरू करावे.
सभेत अनेक शेतकऱ्यांनी आपले प्रश्न खासदरांसमोर मांडले. सोपारा येथील १०० वर्षाचे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद असलेले मार्केट याबाबत खा.गावीतांनी तेथूनच भ्रमण ध्वनीद्वारे महापालिका आयुक्त यांच्याबरोबर संवाद साधला. सदरहू मार्केट तात्काळ सुरू करण्याचे आश्वासन आयुक्त यांनी खा.गावित यांना दिले. तसेच अन्य प्रश्नांबाबत राज्याचे मा.कृषिमंत्री संबंधित विभागाचे अधिकारी यांच्याबरोबर तात्काळ बैठक लावून शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवले जातील असे सांगून जमलेल्या शेतकऱ्यांना त्यांनी आश्वासित केले.
सभेत शिवसेनेचे नेते विजय पाटील आणि शिवसेना, जिल्हा सचिव पालघर व मी वसईकर अभियानाचे अध्यक्ष मिलिंद खानोलकर यांनी मार्गदर्शन केले आणि गॉंडसन रॉड्रीक्स यांनी सर्वाचे आभार मानले.