पंडितांची लोकसेवा खरी ईश्वर सेवा- उध्दव ठाकरे

जव्हार (वार्ताहर)  : विवेक पंडित आणि त्यांची श्रमजीवी संघटना,श्री विठू माऊली ट्रस्ट कुपोषण या जिव्हाळयाच्या विषयावर करत असलेले काम उल्लेखनीय आहे, विवेक पंडित यांची लोकसेवा खऱ्या अर्थाने ईश्वर सेवा असल्याचे मत आज शिवसेना कार्यप्रमुख उध्दव ठाकरे यांनी व्यक्त केले. या छावणीसाठी मीरा भाईंदर येथील सफाई कामगारांनी दिलेले आर्थिक योगदान देखील वैशिष्टयपूर्ण असल्याचे त्यांनी सांगितले.आज ठाकरे यांनी जव्हार येथील कुपोषण बालकांसाठी उभारलेल्या बाल संजीवन छावणीला भेट दिली या प्रसंगी ते बोलत होते. अंतिम टप्यात असलेल्या बांधकामाबाबत त्यांनी काही महत्वाच्या सूचना देखील केल्या. शिवसेनेचे पालघर लोकसभा उमेदवार राजेंद्र गावित यांच्या प्रचार दौर्यादरम्यान उध्दव ठाकरे जव्हार येथे आले होते. यावेळी त्यांच्यासोबत आरोग्य मंत्री एकनाथ शिंदे,राजेंद्र गावित आणि इतर शिवसेना पदाधिकारीदेखील होते.

श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक पंडित यांच्या श्री विठू माऊली चॅरिटेबल ट्रस्टचे कुपोषणावर विशेष काम पालघर जिल्ह्यात सुरू आहे,पंडित यांच्या संकल्पनेतून जव्हार येथे कुपोषित बालकांना आणि त्यांच्या मातांना आवश्यक आहार आणि उपचार देणारी बाल संजीवन छावणी तयार करण्यात आली आहे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या छावणीच्या एका युनिटचे उदघाटन काही दिवसांपूर्वी केले होते. या छावणीच्या उभारणीसाठी जागा उपलब्ध नव्हती, मीरा भाईंदर महापालिकेतील श्रमजीवी कामगार संघटनेचे सफाई कामगार स्वत: पूढे आले, त्यांनी स्वत: वर्गणी काढून या ठिकाणी या उपचार आहार केंद्राला जागा खरेदी करण्यासाठी आर्थिक मदत केली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी देखील खासदार राजेंद्र गावित यांच्या मार्फत या छावणीच्या पूर्णत्वासाठी शासकीय निधीची उपलब्धता करून दिली होती. 100बालकांच्या आहार आणि प्राथमिक उपचाराची क्षमता असलेल्या या छावणीचे काम आता अंतिम टप्यात आहे.

आज राजेंद्र गावित यांच्या प्रचार दौर्यादरम्यान उध्दव ठाकरे यांनी या छावणीला आवर्जून भेट देत का कामाबाबत कौतूक केले. येत्या काळात या उपक्रमासाठी शिवसेना सदैव सोबत असल्याचेही ते म्हणाले. यावेळी श्रमजीवी संघटनेचे अध्यक्ष रामभाऊ वारणा, ज्ञानेश्वर शिर्के विजय जाधव, सुरेश रेंजड,हिंदप्रभा कर्वे ,स्नेहा घरत, दिलीप गोतारणे,, चेतन पाटील,मंगेश मोरे इत्यादी अनेक प्रमुख पदाधिकारी,मीरा भाईंदर चे सफाई कामगार प्रतिनिधी, संघटनेचे,श्री विठू माऊली ट्रस्ट चे पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!