पराभवाची चाहूल लागताच शर्मा बिथरले, पैसा पेरु लागले

नालासोपारा : मतदानाचा दिवस जस जसा जवळ येऊ लागला आणि युतीच्या उमेदवाराला पराभवाची चाहुल लागू लागली तस तसा युतीचा उमेदवार बिथरु लागला आहे. १३२ नालासोपारा मतदारसंघात युतीचे  चकमक फेम उमेदवार वेगळ्याच “अर्थाने” चमकू लागले आहेत.
तीन दिवसांपूर्वी सोपारा गावात वाझा मोहल्ला येथे मध्यरात्री उमेदवार प्रदीप शर्मा यांचे कार्यकर्ते पैसे वाटत असताना पकडले गेले होते तर काल रात्री सुद्धा निळेगावातील स्नेहा नगर, निर्माण नगर, दुबल वाडा भागात तोच प्रकार घडला आहे. रात्री उशिरा युतीचे उमेदवार प्रदीप शर्मा आपल्या निवडक  कार्यकर्त्यांना घेऊन निळेगावात आले. गाड्यांचा ताफा त्यांच्या दिमतीला होताच. शर्मा पैसे वाटत आहेत ही खबर पटकन गावात पसरताच बहुजन विकास आघाडी पक्षाचे कार्यकर्ते घराबाहेर पडले. पोलिसांनाही ही बाब समजताच तो ताफा निळेगावात पोहचला. आपण फसलो आहोत, अडचणीत सापडलो आहोत याची जाणीव होताच प्रदीप शर्मा यांनी पळ काढला. आपण पोलीस ठाण्यात जात आहोत असा बनाव करुन त्या संतप्त जमावातून ते निसटले खरे पण आता ते आपला बचाव करु शकणार नाहीत. कारण प्रचाराची वेळ संपल्यानंतरही शर्मा प्रचार करत होते. एवढेच काय पण मुंबई-ठाण्यातील गुंडांना बरोबर घेऊन पैसे वाटप अभियान राबवित होते.
एक पोलीस अधिकारी सेवानिवृत्त झाला की इतका बेजबाबदार व बिंधास्त होऊ शकतो ? जो निवडणूक काळात असा वागू शकतो तो एरव्ही कसा वागेल? जो आज आपल्या पहिल्याच निवडणुकीत आचारसंहितेचे तीन तेरा वाजवू शकतो तो पुढे काय दिवे लावणार आहे याचा अंदाज या आठवड्यात या शहराने घेतला आहे. या हरकती अशोभनीय आहेत. पैसा पेरुन निवडणूक जिंकता येत असेल तर आज कित्येक धनिक थैल्या घेऊन राजकारणात उतरले असते.
काल निळेगावातील निष्पाप नागरिक व कार्यकर्ते शर्मा यांच्या आगाऊपणाला बळी पडले. पोलिसांनाही सौम्य का होईना लाठीचार्ज करावा लागला. विरोधातच लढत शिवसैनिकांनाही ब.वि.आ.च्या कार्यकर्त्यांनी नेहमी मान दिला, ओळख दिली. गावकीचे आणि भाईचाराचे वातावरण कायम राखले. चांगले सामंजस्य वा राजकीय परिपक्वता दाखवली. मात्र काल राजकारण खेळायला उतरलेल्या प्रदीप शर्मा यांनी कमालीचा बालिशपणा दाखवून शिवसेना या पक्षाची प्रतिमा मलीन केली आहे.अशा शब्दांत आज दिवसभर हे शहर व्यक्त होताना दिसते आहे.
दरम्यान काल रात्रीच्या घटनेमुळे पालघर पोलीस अधीक्षक, उप अधीक्षक, अनेक पोलीस अधिकारी, शेकडो कर्मचाऱ्यांना जो त्रास झाला. जे चांगले वातावरण गढूळ व तणावाचे निर्माण झाले त्याला सर्वस्वी शिवसेनेचे उमेदवार प्रदीप शर्माच जबाबदार आहेत. म्हणून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे.
ब.वि.आ.चे ज्येष्ठ नेते उमेश नाईक यांनी रात्री एकच्या सुमारास नालासोपारा पोलीस ठाण्यात जाऊन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी या प्रकरणी चर्चा केली. अनेक कायदा कलमांचे उल्लंघन करणाऱ्या शर्मांवर कारवाई करण्यात आली पाहिजे अशी तक्रार केली आहे. तर खोट्या तक्रारी व चकमकी करण्यात “स्पेशालिस्ट” असलेल्या प्रदीप शर्मा आणि मंडळींनी सुद्धा आम्हाला मारहाण झाली, आमच्या गाड्या फोडल्या अशा तक्रारी केल्या असल्याचे समजते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!