पर्यावरण दिनानिमित्त अर्नाळ्यातील गांधी स्मारकात वृक्षारोपण

वृक्ष संगोपनाची घेतली शपथ : बऱ्याचदा झाड लावण्यानंतर त्याकडे दुर्लक्ष होते. पाण्याअभावी अनेकदा झाडे सुकून जातात. आपण लावलेल्या झाडाचे संगोपन करण्यासाठी मी कटिबद्ध राहीन, अशी सामूहिक शपथ यावेळी घेण्यात आली. ‘माझा अर्नाळा गाव निसर्गरम्य गाव’ अशी शपथ घेऊन यात जास्तीत जास्त झाडे लावण्यासाठी इतरांना प्रोत्साहन देऊ असा संकल्प यावेळी उपस्थित नागरिकांनी केला.

विरार : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त अर्नाळा येथील महात्मा गांधी स्मारकात बुधवारी सकाळी वृक्षारोपणाचा कार्यक्रम जल्लोषात पार पडला. अर्नाळा युवा संस्था आणि अपंग कल्याणकारी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला अर्नाळ्यातील प्रसिद्ध क्रिकेटपटू विनायक भोईर, सुप्रसिद्ध डॉ. मीनल नाईक, सामाजिक कार्यकर्ते प्राध्यापक स्टीफन डिमेलो, अर्नाळा युवा संस्थेचे अध्यक्ष शमीम खान, नितीन वैती, अविनाश तांडेल आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी पाहुण्यांच्या हस्ते अर्नाळा ग्रामपंचायतीमधील स्वछता विभागात काम करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाची सुरुवात महात्मा गांधी यांच्या स्मृतीस्तंभाला पुष्पहार घालून त्यांच्या अभिवादनाने झाली. त्यानंतर पाहुण्यांनी मनोगत व्यक्त केले. “जगभर बेसुमार वृक्षतोडीने पर्यावरणाचा समतोल बिघडला आहे. पुढील १० वर्षात जागतिक तापमानात ४ अंश सेल्सिअसची वाढ होईल”, असे मत यावेळी डॉ. मीनल नाईक यांनी व्यक्त केले. त्या म्हणाल्या कि, वृक्षसंपदा जोपासण्यासाठी नागरिकांनी सामूहिक प्रयत्न करायला हवेत. यावेळी नितीन वैती यांनी सांगितले, कि एकदा सहज दुपारी मित्रांसोबत महात्मा गांधी स्मारकाकडे गेलो होतो, त्यावेळी तेथील अस्वछता पाहून मनाला वाईट वाटले. हा वारसा जपण्यासाठी आपणच पुढाकार घ्यावा या हेतूने गेली तीन महिने दररोज या ठिकाणी स्वेच्छेने सफाई सेवा करत आहोत, असे वैती यांनी सांगितले.
 गांधी स्मारकात स्वछता आणि पाणी पुरवठ्यासाठी नितीन वैती आणि अविनाश तांडेल यांचा मित्र परिवार नि:स्वार्थ मेहनत करत आहेत. अर्नाळ्यात लोकोपयोगी कामांसाठी युवा संस्था नेहमीच पुढाकार घेईल, ग्रामस्थांनी त्यात सहभागी व्हावे असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष शमीम खान यांनी यावेळी केले.आज स्मारकात गुलाब, सदाफुली, वड, पिंपळ, बदाम, साग, बकुळ, गुलमोहर, आदी झाडांची उपस्थित नागरिक आणि लहान मुलांच्या हस्ते लागवड करण्यात आली.  या कार्यक्रमाला दिलीप बेनबन्सी, संदेश आबा, विकास सालियन, देवेंद्र वैती, जमीर चाऊस यांचे सहकार्य लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!