पर्यावरण पुरक जीवनशैलीचा अंगीकार आवश्यक – ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ दिलीप कुलकर्णी 

वसई,दि. १७ (वार्ताहर) : राष्ट्रीय उत्पन्न वाढीच्या (जीडीपी) ध्यासात जगभरात निसर्गाचा गळा घोटला जात आहे. उत्पादन आणि विकासाच्या अतिरेकी हव्यासातून मर्यादित असलेले नैसर्गिक स्त्रोत संपवायला घेतले आहेत. पूढील पिढ्यांना जगणे सुसह्य व्हावे म्हणून आपण आज पर्यावरण पुरक जीवनशैली अंगीकारणे आवश्यक असल्याचे आग्रही प्रतिपादन ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ दिलीप कुलकर्णी यांनी आज वसईत बोलताना केले.
बॅसीन कॅथॉलिक सहकारी बँक आणि लोकसेवा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने बंगली येथील लोकसेवा मंडळ सभागृहात प्रत्येक रविवारी उपवासकालीन व्याख्यान मालेचे आयोजन करण्यात येत असून,या व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प आज दापोली येथील पर्यावरण तज्ज्ञ दिलीप कुलकर्णी यांनी गुंफले. त्यांनी दिलेल्या ‘पर्यावरण स्नेही जीवनशैली’ याविषयावरील अतिशय उदबोधक व्याख्यानाला श्रोते पुन्हा पुन्हा दाद देत होते.  सामाजिक कार्यकर्त्या लिला परेरा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास उद्योजक ऑल्वीन परेरा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या प्रसंगी सफाई कर्मचारी नंदा भोईर, जयेश हाडळ व सुनील भोईर यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
अधिक उत्पादन म्हणजे अधिक विकास या चुकीच्या संकल्पनेतुन पूढे जायच्या प्रयत्नात आपण अंतरिक समाधान हरवून बसलो आहोत,असे स्पष्ट करून, कुलकर्णी पूढे म्हणाले, पाणी,लाकुड व खनिजांसारखी नैसर्गिक संसाधणे भौतिक उपभोगासाठी संपवतांना भावी पिढ्यांची संधी आपण हिरावून घेत आहोत. देशात ३३ टक्के जंगल संपत्ती होती. ती गेल्या सत्तर वर्षात ओरबाडत आता केवळ ८ टक्के उरली आहे.उर्जा स्त्रोतांची बचत करतांनाच उपभोगावर मर्यादा आणल्या पाहीजे. बाह्य निसर्ग जोपासतांना अंतरिक पर्यावरणही जोपासले पाहिजे. समाधानाच्या अंगाने सात्वीक बदलातून मनशांती शोधली पाहिजे, असेही त्यांनी स्पष्ठ केले.
वसईतील बावखलांचे संरक्षण आणि संवर्धन होणे गरजेचे असून प्रत्येकाने स्वतःपासून अंतरिक बदलाचा शुभारंभ करावा. उपवासकाळात पर्यावरण विषयक जागृती करणारे लोकसेवा मंडळ कौतुकास पात्र आहे, असे गौरवोद्गार लीला परेरा यांनी यावेळी काढले. तर गरजेपोटी एक झाड कापणाराने आपले नैतिक कर्तव्य समजून दहा नवीन झाडे लावली पाहिजे, असे ऑल्विन परेरा यांनी यावेळी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक लेस्ली डिसिल्वा यांनी तर स्वागत गॉडफ्री कोरिया यांनी केले. पाहुण्यांची ओळख सौ.ब्रिनल डायस यांनी करुन दिली. सुत्रसंचलन भारती अथाईत यांनी तर आभार प्रदर्शन जोनस डायस यांनी केले. यावेळी माजी आमदार डॉमनिक घोन्सालविस, कार्डिनल ग्रेशस हॉस्पिटलचे अध्यक्ष फ्रांसिस कुटिनो, को.म.सा.प. वसईचे अध्यक्ष अनिलराज रोकडे, सेंट जोसेफ पतपेढीचे चेअरमन व्हॅलेरियन घोन्सालविस, पान मार्केटिंग सोसायटीचे अध्यक्ष रोहन घोन्सालविस, झेवियर परेरा, इवेट कुटिन्हो, टॉफलेस घोन्सालवीस इत्यादी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!