पाणी कनेक्शन प्रक्रिया आता ऑनलाईन

वसई (वार्ताहर) : वसई पूर्वे पट्टीतील वाढते नागरिकीकरण आणि त्यात वसई-विरार शहर महानगरपालिका प्रशासनाकडून पुरवल्या जाणार्‍या अपुर्‍या सेवा-सुविधा यामुळे नागरिकांमध्ये रोष निर्माण झाला आहे. नायगाव पूर्वेतील जूचंद्र परिसरातील वाढते नागरिकीकरण आणि त्यात रस्ते, पाण्याची कमतरता असल्याने नागरिकांना मरणयातना भोगाव्या लागत आहेत. यासंदर्भात स्थानिक रहीवाशांनी आगरी सेनेचे कैलास पाटील व दि ग्रेट मराठा संस्थेचे मोहन पाटील यांच्या निदर्शनास सदर बाब आणून दिली. स्थानिक रहीवाशांनी केलेल्या तक्रारीनंतर दि ग्रेट मराठा संस्थेच्या पदाधिकार्‍यांनी खासदार राजेंद्र गावित यांची भेट घेऊन त्यांना परिस्थिती कथन केली. त्यानुसार गावित यांनी तात्काळ परिस्थिती लक्षात घेऊन रहीवाशांसह मनपा आयुक्तांची भेट घेतली व या समस्येवर उपाययोजना करण्याच्या सुचना केल्या.
खासदार राजेंद्र गावित यांनी केलेल्या सुचनेनुसार आयुक्तांनी सर्व सुचनांचे पालन करून येत्या दोन महिन्यात नायगाव पूर्वेतील जूचंद्र परिसरातील रस्ते, पाणी व इतर समस्या दूर करण्यासाठी महानगरपालिकेमार्फत प्रयत्न केले जातील अशी ग्वाही दिली. तसेच आता पाणी कनेक्शन प्रक्रिया ऑनलाईन केली जाणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. वाढत्या नागरिकीकरणाचा विचार करता वसई-विरार शहर महानगरपालिकेकडून स्तुत्य पाऊल उचलले जात असले तरी ही ग्वाही केवळ बोलण्यापुरतीच मर्यादीत राहू नये अशी सामान्य नागरिकांची भावना आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!