पालघर जिल्हा परिषद त्रिशंकू अवस्थेत

वसई : अखेर पालघर जिल्हा परिषदेत सत्तापालट झाले असून भाजप हा तिसऱ्या क्रमांकावर फेकला गेला आहे. त्यांना केवळ १० जागांवर समाधान मानावे लागले आहे.सेनेने १८ जागा जिंकत प्रथम क्रमांकावर झेप घेतली आहे.त्यामागोमाग राष्ट्रवादी काँग्रेसने १५ जागा जिंकत सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे.
गेली ५ वर्षे सत्तेत असलेल्या युतीने जिल्हाविकासाकडे केलेले दुर्लक्ष,त्यांच्या चांगलेच अंगलट आले आहे. महाविकास आघाडी सत्तेत येते की सेना, भाजपशी हातमिळवणी करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सेनेने जर महाविकास आघाडीसोबत जायचे ठरवल्यास त्यांचे संख्याबळ ४४ इतके होते, आणि जर त्यांनी भाजपशी जवळीक केली तर त्यांचे संख्याबळ २८ होते. तरी १ जागा कमी पडते. त्यामुळे सेनेला महाविकास आघाडी सोबत जाण्याशिवाय गत्यंतर नाही. जिल्ह्यात सेनेचे, बहुजन विकास आघाडी व मार्क्स.कम्यु. या दोन पक्षाशी आजवर कधीही सूत जुळले नाही.पण समोर पर्याय नसल्यामुळे त्यांना आघाडी सोबत जावे लागणार आहे. निवडणुकीचे एकंदरीत निकाल लक्षात घेता महाविकास आघाडीतील काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस,बविआ मार्क्स.कम्यु. या चार घटक पक्षांनी आपापले गड शाबूत राखले आहेत.वसई तालुक्यात मात्र सेना व भाजपला जिल्हा परिषदेत खाते उघडता आले आहे.वसई पंचायत समितीमध्येही या दोघांनी चांगली कामगिरी केली आहे.
जिल्हा परिषदेत महाविकास आघाडीची सत्ता स्थापन होण्याची शक्यता आहे.गेल्या वेळी सत्ता संपादन करणाऱ्या भाजपवर विरोधात बसण्याची नामुष्की आली आहे. यामागे युतीची निष्क्रियता व या दोन्ही पक्षांची “एकला चलो रे” भूमिका कारणीभुत ठरली आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने जे यश मिळवले ते नक्कीच कौतुकास्पद आहे. कारण जिल्ह्यात पक्षाचे अस्तित्व नगण्य असताना विक्रमगड विधानसभा व जिल्हा परिषदेच्या १० जागा जिंकणे हे दोन्ही विजय इतर पक्षाना विचार करण्यास लावणारे आहेत. काँग्रेस मात्र अद्याप सावरू शकलेला नाही. त्यांना केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले.संघटनात्मक दृष्टीने काँग्रेस आजही आपल्या अस्तित्वासाठी धडपडत आहे.मार्क्स.कम्यु.पक्षाने मात्र डहाणू व तलासरी तालुक्यावरील आपली पकड ढिली पडू दिली नाही. त्यांचे सहा उमेदवार चांगल्या फरकाने निवडून आले.गेल्या विधानसभा निवडणुकीत डहाणू विधानसभेची जागा भाजपकडून खेचून घेतल्यानंतर जिल्हा परिषद निवडणुकीतही त्यांनी नेत्रदीपक कामगिरी केली आहे. जर सेनेने भाजप व आघाडीही नको,अशी भूमिका घेतली तर राष्ट्रवादी-१५, मार्क्स.कम्यु.-०६, बविआ-०४, अपक्ष-३ व काँग्रेस-१ याची गोळाबेरीज २९ इतकी होते. पण काठावरच बहुमत किती काळ टिकेल, हाही एक प्रश्न आहे. त्यामुळे सध्या तरी जिल्हा परिषदेत सत्तेची मोट बांधणे सर्वच पक्षाना जरा कठीणच आहे.
राज्यस्तरावर तुटलेल्या युतीचे पडसाद जिल्हा स्तरावर उमटत असून पालघर जिल्हा परिषद, हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. जिल्ह्यात सेना व भाजपची झालेल्या पिछेहाटीस त्यांच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांची निष्क्रियता कारणीभूत ठरली आहे.गेल्या पाच वर्षात जिल्हा विकासासंदर्भात भरीव कामगिरी होऊ शकली नाही. प्रचंड आर्थिक निधी मिळूनही, शिक्षण, आरोग्य, कुपोषण, कृषीक्षेत्र दुष्काळ व पाणी,या विषयी सत्ताधारी पक्षाच्या उदासीनतेमुळे आजही अनेक प्रश्न प्रलंबित आहेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!